साहित्याच्या रणमैदानात ५२ टक्क्यांनी रणशिंग फुकले आहे.
तात्यासाहेब म. फुल्यांच्या पुण्यनगरीत ओबीसी साहित्य संघटीत होत आहे.
- : भुमिका :-
आमच्या देशीचे अतुल स्वामी वीर ।। होते रणधीर ।। स्मरू त्यास।।धृ.।।
बळीस्थानी आले शूर भैरोबा ।। खंडोबा जोतीबा ।। महासुभा ।।१।।
सद्गुणी पुतळा राजा मूळ बळी ।। दसरा दिवाळी ।। आठवीती ।।२।।
क्षेत्रीय भार्या "इडा पीडा जावो || बळीराज्य येवो” अशा कां बा ? ||३||
आर्यभट आले सुवर्ण लुटीले ।। क्षेत्री दास केले ।। बापमत्ता ।।४।।
वामन का घाली बळी रसातळी ।। प्रश्नजोती माळी ।। करी भटा ||५||
महात्मा फुले समग्र वाड:मय, पान ५०५
महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेली सुधारित आवृत्ती, १९८८
साहित्य म्हणजे समाजजीवनाचा अविष्कार ! समाज जीवनाचा इतिहास, वर्तमान व भविष्याचे प्रतिबंब साहित्यातून दिसत असते. त्यातून समाजाच्या विकासाचा व अधोगतीचाही आलेखही स्पष्ट होतो. समाजाच्या समस्यांची मांडणी साहित्यातून प्रभावीपणे होते. समाजातील रूढी, परंपरा यांचा विधायकपणे वापर करीत संस्कृतीची मांडणी व निर्मिती करण्याची क्षमता साहित्यात प्रभावीपणे होते. माणसाला रानटी अवस्थेतून बाहेर पडतांना त्याला माणूसपणाचे भान देणाऱ्या ज्या संघटित कृती त्या काळी तो करीत होता, त्यात त्याची साहित्यकृती अग्रगण्य होती.
कोणताही समाज एकात्म नसतो तो वंश, वर्ण, जात या व्यवस्थांच्या पायावर दुभांगलेला असतो. या शोषणाच्या व्यवस्था असल्यामुळे हे दुभांगलेपण पायाभुत असते. आणि त्यांचे साहित्यही वगवेगळे असते. भारतात मुख्यतः वर्ण, जात, वंश अशा व्यवस्थेच्या पायावर समाज विभागलेला आहे. उच्चभ्रू ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य दडपण्यासाठी जशी मैदानावरच्या युद्धातील शस्त्रास्त्रे वापरली गेली तशी सामाजिक क्षेत्रातील अस्त्रेही वापरली गेलीत.
भारतीय संदर्भात विचार करता कनिष्ठ जातींना दडपण्यासाठी साहित्याचा सगळ्यात जास्त दुरूपयोग झाला. सर्वसामान्य कष्टकरी जनता उत्सफुर्तपणे कथा, पोवाडे, भारूडे या माध्यमातून साहित्यनिर्मिती करीत असते. हे साहित्य प्रवाही असल्याने त्यातून पुढे लोककथा, लोकगिते निर्माण होतात. हे साहित्य केवह मनोरंजनासाठी नसते, तर , त्यात आपला इतिहास गुंफण्याचा व तो जतन करण्याचा उद्देश असतो. याच साहित्यातून आपले जीवनाचे तत्त्वज्ञान कोणते व जीवनाचे मुल्ये कोणती याची आग्रही मांडणी केलेली असते. या आग्रहातून मग पुढे मिथके व कर्मकांड निर्माण होतात. शोषणव्यवस्था विरहित एकसंघ समाजात हा साहित्याचा प्रवाह खळखळत निर्मळपणे वाहत असतो. परंतू शोषणाची व्यवस्था निर्माण होताच समाज दुभंगतो आणी रणमैदानावरच्या युद्धाप्रमाणे धर्म, संस्कृती, साहित्य आदी क्षेत्रातही संघर्ष सुरू होतो. प्राचीन काळी जे साहित्य शुद्रादिअतिशुद्र वर्ण जातींनी निर्माण केले होते, त्या साहित्याचे उच्चभ्रूनी ब्राह्मणीकरण केले. वेद , रामायण, महाभारत, स्मृती, श्रुती या साहित्या द्वारे बहुजनांची गुलाम मानसिकता घडविण्यात आली. त्यातून वर्ण जातीव्यवस्था अधिक दृढ करण्याचा प्रयत्न झाला.
या उच्चभ्रू मनूवादी साहित्याला शह देण्यासाठी व बहुजनांना वर्णजाती व्यवस्थेच्या मानसिक गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी बहुजन बुद्धिजीवींनीही साहित्य निर्मिती केली. बहुजनांच्या साहित्यालाही इतिहास आहे. त्यांत चार्वाक, बुद्ध, संत परंपरा यांना मोठ्या प्रमाणात साहित्य निर्मिती केली. संत नामदेव, संत गाडगे महाराज, संत सावता, संत चोखोबा, संत तुकाराम या संत परंपरेने मोलाची कामगीरी केली आहे.
अर्वाचिन काळात तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुले यांनी शूद्रातिशूद्रांना लढ्याची प्रेरणा मिळावी म्हणून साहित्य निर्मिती केली. शेतकऱ्यांचा आसूड, सत्सार ब्राह्मणांचे कसब, तृतीय रत्न आदी साहित्य ब्राह्मणी साहित्यावर आसूड ओढणारे होते. या साहित्याने कुळवाडी कुळभुषण छत्रपती शिवाजी, शेतकऱ्याचा राजा बळीराजा आदी समतावादी प्रतिके उभी केलीत. हे बहुजन साहित्य दडपून टाकण्यासाठी उच्चभ्रू मनूवाद्यांनी भरमसाठ साहित्य निर्मिती करून गोब्राह्मण प्रतिपालक शिवरायांचे व गणपतीचे प्रतीक उभे केले.
कोणत्याही घटकाला प्रदिर्घ काळापर्यंत गुलाम करायचे असेल तर, त्या समाजघटकावर आपली (जेत्यांची) मुल्ये लादली पाहिजेत, हे सूत्रे जगभराच्या सत्ताधारीवर्गांनी अमलात आणले आहे. परंतू या सूत्रानुसार २००-४०० वर्षांपेक्षा जास्त काळ सत्ता टिकविणे शक्य होत नाही. आपल्या बळीस्थान देशातील ब्राह्मणसत्ताधारीवर्ग जगातील इतर कोणत्याही देशाच्या सत्ताधारीवर्गांपेक्षा जास्त चालाख व धुर्त आहे. कारण त्याने बहुजनांवर ५,००० वर्षांपेक्षाही जास्त काळ सत्ता टिकवून ठेवली आहे. त्यासाठी त्याने कोणते वेगळे सूत्र वापरले, याचे उत्तर शोधले पाहीजे. कोणत्याही समाजाची मुल्ये रूजविण्यासाठी किंवा लादण्यासाठी साहित्यनिर्मिती आवश्यक असते. परंतू तरीही ज्या समाजघटकाला गुलाम बनवायचे असेल त्या समाजघटकाचे स्वतःचे साहीत्य निर्माण होत राहीले तर, अशा वेळी विद्रोह- बंड करण्याच्या प्रेरणा जिवंतच राहतात. म्हणून बळीस्थानातील मुलनिवासी जनतेला कायमचे व एकतर्फी गुलाम करायचे असेल तर त्यांना साहित्यनिर्मितीपासून वंचित केले पाहिजे, हे जगावेगळे सूत्र या देशातील उच्चवर्णीयांनी शोधून काढले व ते प्रभावीपणे राबविले.
दोन प्रसिद्ध उदाहरणे देऊन हे सिद्ध करता येईल. पहिले उदाहरण बळीराज. या देशाला बळीस्थान हे नाव होते, असे तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुले आपणास सांगतात. यावरून बळीराज हा या देशातील मुळ रहीवासांचा सर्वाधिक लोकप्रिय महापुरूष होता, हे सिद्ध होते. या आवडत्या महापुरूषाची आठवण आजही ग्रामीण भागातील बहुजन काढतात. प्रत्येक दिवाळी दसऱ्याला इडापीडा जावो | बळीचे राज्य येवो || असे एकमेकांना सांगत त्याची आठवण काढतात. हा बळीराजा बहुजनांचा महानायक होता व बहुजनांनी आपल्या साहित्यनिर्मितीत त्याला सर्वोच्च स्थान दिले. परंतू ही साहित्यनिर्मिती बंद पाडण्यासाठी शोषक उच्चवर्णियांनी बहुजनांची शिक्षण बंदी करून वाचन - लेखन खंडित केले. दुसरीकडे ब्राह्मण बुद्धीजीवींनी भरमसाठ साहित्य निर्मिती सुरू केली. श्रुत्या, स्मृत्या, पुराणे, पोथ्या यांचा सुळसुळाट झाला. या प्रत्येक साहित्यातून त्यांनी बळीराजा व तत्सम महापुरूषांची भरपूर बदनामी केली. हे सर्व साहित्य धार्मिक पवित्र ग्रंथ म्हणून पुढे करण्यात आले. बहुजनांची साहित्यनिर्मितीची प्रक्रिया बंद पडली नसती तर बहुजन बुद्धीजीवींनी ब्राह्मण साहित्याला शह देणारे स्वतःचे साहित्य निर्माण केले असते व बळीराजाला या बदनामीपासून वाचविले असते.
माणसाचे इतिहासाशी असलेले नाते अतूट आहे . आपला गौरवशाली इतिहास, प्रेरणादायी संघर्ष व त्या संघर्षाचे महानायक यांचे जतन करण्याचा त्याचा प्रयत्न सतत चालू असतो. त्यासाठी प्रसंगी तो जीवघेणा संघर्ष ही करायला तयार होतो. साधानहीन शोषित जनता आपला इतिहास जतन करून ठेवण्यासाठी रूढी - परंपरा व कर्मकांडांचे स्वरूप देते. काळाच्या ओघात मग हा इतिहास नेणीवेचा भाग बनतो. निऋतिसारख्या मातृदेवतांचा व बळीराज्यासारख्या महान योद्यांचा संघर्षशील इतिहास अशाच प्रकारे बहुजनांच्या नेणीवेचा भाग बनले. बौद्ध साहित्यकांनी व संत साहित्यकांनी बळीराजाला पाताळातून वर काढण्याचा प्रयत्न केला. परंतू नंतरच्या बहुजनांची वाचन-लेखन-चिंतन प्रक्रिया बंद पाडली गेल्याने साहित्याच्या रणांगणावरील या युद्धात बहुजन छावणी युद्ध सुरू होण्याआधीच हरली. या प्रदिर्घ पराभवाच्या परंपरेचे परिणाम आज दिसत आहेत. ज्या शेतकऱ्याला आजबळीराजा म्हटले जाते, त्याचेवर आज आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्यायच राहीला नाही. युद्ध सुरू होण्यापुर्वीच शत्रूला आत्महत्या करायला लावणाऱ्या या ब्राह्मणी धोरणाचा मुख्य धागा साहित्याच्या युद्धापर्यंतपर्यंत जाऊन पोहचतो.
दुसरे उदाहरण कुळवाडी कुळीभुषण शिवरायांचे ! तात्यासाहेब म. फुल्यांनी हे शिवराय जनमानसात रूजविण्यासाठी ३५ पानी पोवाडा लिहीला . अनेक अखंड लिहीलेत. बहुजन साहित्यकांनी हाच धागा पुढे नेत साहित्य निर्मिती केली असती तर, आज जनमानसात चूकीचा शिवाजी रूजविला गेला नसता. तात्यासाहेबांच्या कुळवाडी कुळभुषण शिवरायांना पराभूत करण्यासाठी ब्राह्मण साहित्यिक युद्धात उतरलेत. त्यांनी गोब्राह्मण प्रतिपालकाचे अस्त्र उगारले. परंतू अर्ध्या हळकुडांने पिवळे झालेले सत्यशोधक ब्राह्मणांना शरण गेलेत.केवळ राजकीय सत्तेला हापापलेल्या या लोकांनी गोब्राह्मण प्रतिपालक शिवाजी स्विकारून ब्राह्मणांशी युती केली. युद्ध सुरू होण्यापूर्वीच आत्महत्या करण्याचा हा नवा प्रकार ! गेल्या ६० - ७० वर्षात शिवरायांना गोब्राह्मण प्रतिपालक बनविण्यासाठी व ते जनमानसात रूजविण्यासाठी ब्राह्मण साहित्यकांनी व विचारवंतांनी जिवतोड मेहनत घेतली. कोणी इतिहासग्रंथ लिहीलेत. कोणी कादंबऱ्या,पोवाडे, कोणी नाटके, सिनेमे तर कोणी शाहीरी जलसे काढलेत. हे सर्व साहित्य त्यांनी केवळ पुस्तक - ग्रंथात काही नाही ठेवले. ते त्यांनी शाळा-कॉलेजात अभ्यासक्रम स्वरूपात आणून बालमनांवर व युवकांवर रूजविले.
या सर्वा एकतर्फी युद्धाचा परीणाम काय होणार ? जनमानसच गोब्राह्मण प्रतिपालक बनले. तुमचा शिवाजीसारखा पराक्रमी राजाच जर, ब्राह्मणांची सेवा करीत असेल तर, तुम्ही मतपेटीतून निवडून दिलेले राजेही गोब्राह्मण प्रतिपालकच असले पाहीजे. परीणामी ब्राह्मणांना नको असलेला ओबीसींचा कालेलकर व मंडल आयोग सत्ताधाऱ्यांनी दडपून टाकला. बौद्धांना, आदीवासींना दडपणारे हेच राजकीय सत्ताधारी. हे सर्व त्यांनी का केले ? कारण यातूनच ब्राह्मणसेवा घडणार होती ? आणी अशी ब्राह्मणसेवा केली तरच त्यांच्या डोक्यावरचा गोब्राह्मण प्रतिपालकचा राजमुकूट कायम रहाणार होता. आजही त्यांच्या ब्राह्मणसेवेत कोठेही खंड पडलेला नाही. साडेतीन टक्क्यांच्या ब्राह्मणी साहित्य संमेलनाला २५ लाख व ५२ टक्क्यांच्या ओबीसी साहित्य संमेलनाला फक्त २ लाख रूपये !
आज बहुजन - ओबीसीत खूप पायलीचे पंधरा साहित्यिक आहेत. परंतू त्यांना बळीराजावर चार ओळीही नाही (चारोळी नाही) लिहाव्याशा वाटत ! याचे कारण बहुजन साहित्यकांची साहित्यकृती केवळ जाणीवेवर आधारीत आहेत. माणसाची कोणतीही कृती जाणीवपूर्वक असली तरी नेणीवेच्या प्रेरणेनेही तो नकळतपणे काही कृती करीत असतो ! वाचन, लेखन व बोधन या कृती जाणीवपूर्वक असतात. जातीव्यवस्थेने त्यांवर बंदी आणल्यावरही ग्रामीण बहुजन साहित्यकांनी बळीराजाच्या कथा रचल्या, मातृदेवतेची गाणी गायिली. या साहित्यिक कृती नेणीवेतून आल्यात. माणसाच्या मनात (मेंदूत) जाणीव जाणीव, नेणीव असे दोन कप्पे असतात. याचा शोध फ्राईड या संशोधकाने लावला. परंतु आर्नोल्ड टॉईनबी व दैसाकू इकेडा या दोन तज्ञांनी या शोधाचे श्रेय बौद्ध तत्त्वज्ञानाला दिले आहे. तत्कालीन बौद्ध तत्त्वज्ञानी व साहित्यिक असलेल्या वसुबंधू, दिग्नाग व धर्माकिर्ती यांनी जाणीव व नेणीव या दोन्ही ज्ञानसाधनांचा उपयोग करीत नवे साहित्यशास्त्र व नवे सौंदर्यशास्त्र निर्माण केले . त्यामुळे तत्कालीन बौद्ध साहित्य हे क्रांतीकारी निपजले. या क्रांतीकारी साहित्याच्या प्रबोधनातून जनतेची क्रांतीकारी मानसिकता घडविली गेली. आणी या प्रबोधित जनतेने वर्णव्यवस्था नष्ट कराणरी अहिंसक क्रांती केली, ती अखंडपणे ७०० वर्षे विकसित होत गेली. कॉ. शरद पाटील यांनी | सौदर्य शास्त्राचा आधुनिक संदर्भात विकास केला असून बहुजन साहित्याकांनी त्याचा मूळातूनच अभ्यास केला पाहीजे. या नव्या सौंदर्यशास्त्राचा आधार घेऊन बहुजन साहित्यिकांनी ज्ञानसाधना केली तर त्यांना बळीराजासारखे व मातृदेवतेसारख्या नव्या नायक - नायिका आपल्या साहित्यासाठी सहज सापडतील आपल्या गौरवशाली परंपरा, आपल्या अस्मितेची प्रतिके यांची ओळख झाल्यावर बहुजनांची स्वतःची ओळख (Identity) होईल. त्यातून मग मनुवाद्यांनी त्यांच्यावर लादलेली गुलाम, शूद्र , कनिष्ठ या हीन ओळखीतून मुक्त होण्याचा त्यांचा संघर्ष सुरू होईल. बळीराज, मातृदेवता या त्याच्या लढ्याच्या प्रेरणा राहतील. यातूनच वर्णजातीव्यवस्था नष्ठ करणाऱ्या क्रांतीचे रणशिंग फुकले जाऊ शकेल. वर्ण व्यवस्था नष्ट करणाऱ्या बौद्धक्रांतीप्रमाणे आजची जातीअंताची क्रांतीही अहिंसक व्हावी असे वाटत असेल तर, उपरोक्तप्रमाणे भरमसाठ साहित्यनिर्मितीच्या कामाला बहुजन साहित्यकांनी जुंपून घेतले पाहीजे.
आजचे बहुसंख्य बुहजन साहित्यक हे कमी अधिक प्रमाणात ब्राह्मणी मानसिकतेचे बळी आहेत. बहुस्तरसत्ताक पद्धत फक्त राजकीय क्षेत्रात नाही, सर्वोच्च ब्राह्मणीसत्ताधारी आपल्या दलालांची नियुक्ती फक्त राजकीय क्षेत्रातच करत नाहीत तर, साहित्य, इतिहास, अर्थ तत्तवज्ञान, शिक्षण आदी सर्वच क्षेत्रात ते दलालांची नियुक्ती करीत असतात. ओबीसी -बहुजनातील सुमार दर्जाचे साहित्यिक, विचारवंत, इतिहासतज्ञ हे सत्ताधाऱ्यांची दलाली करायला मिळावी म्हणून रांग लावून उभे राहतात. जो सत्ताधारींची सर्वात जास्त चांगली सेवा (दलाली) करील त्यास त्या प्रमाणात पुरस्कार, महामंडळ वगैरे मिळते. (अर्थात यास काही सन्माननीय अपवादही आहेत.) उच्चजातीय सत्ताधाऱ्यांची सेवा करण्यासाठी जे ओबीसी - बहुजन रांगेत उभे असतात, त्या रांगेतील सुमार दर्जाच्या लोकांना साहित्यक, समिक्षक म्हणून त्यांना मोठ्या दैनिकांमधून प्रसिद्धी मिळते. या दोन - चार दैनिकात जे छापून येते त्यालाच ब्रह्मवाक्य म्हणून मान्यता दिली जाते. हीच तथाकथित ब्रह्मवाक्ये प्रमाण मानून स्थनिक प्रसारमाध्यमे आपले पोटे भरतात. त्यामुळे ही ब्रह्मवाक्ये बहुजनांवरही रूजविली जातात. याचा परिणाम असा होतो की, बहुजनातील खरे साहित्यिक, लेखक, तज्ञ व खरे राजकीय - सामाजिक नेते दडपले जातात. विविध गैरमार्गानी आमच्यावर लादलेले सर्व क्षेत्रातले हे खोटे नेते बसतात. युद्ध सुरू होण्यापूर्वीच शत्रूला नेतृत्वहीन करण्याचा (आत्महत्त्येचा) हाही एक नवा प्रकार !
आजही समस्त बहूजन समाज या उच्चभ्रू मनूवादी साहित्याने व त्यातून प्रसारित केलेल्या ब्राह्मणी मुल्यांनी दडपला गेला आहे. त्यामुळे स्वातंत्र्य मिळाल्यावरही ओबीसींचा कालेलकर आयोग दडपण्यात सत्ताधाऱ्यांना सहज यश आले. त्यामुळे ओ.बी.सी. जाती राजकीय, सामाजीक दृष्ट्या मागासलेल्या राहिल्या. परंत सत्तरीनंतर उच्चजातीयवर्गीय सत्ताधारी वर्गात राजकीय सत्तेसाठीच मतभेद वाढत गेलेत. या मतभेदातन मंडल आयोग आला. याच मतभेदा विस्तार होत मंडल आयोगाचे आंदोलन उभे झाले. त्यामुळे ओबीसी जातींना भान आले. सत्वाची जाणीव झाल्यावर ओ.बी.सी. जातीतील अनेक बुद्धीजीवींनी साहित्य निर्मिती केली. अर्थात त्याआधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील दलित चळवळीने जो संघर्ष उभा केला, त्यांच्या परिणामी दलित साहित्य निर्माण झाले. त्यातून तात्यासाहेब महात्मा फुले यांचे दडपले गेलेले साहित्य उजेडात आले. फुले आंबेडकरी प्रेरणेतून आज ओ.बी.सी. जातींचा विद्रोही रस्त्यावर येत असतांना ओ.बी.सी. साहित्याचा अविष्कार होणे स्वाभाविक आहे.
ओ.बी.सी. साहित्याचा हा विद्रोह संघटीत करण्यासाठी व त्याला दिशा देण्यासाठी आम्ही ओ.बी.सी. साहित्य संमेलन घेण्याचा निर्णय घेतला आहे. हे देशातील पहिलेच ओ.बी.सी. संमेलन आहे. साहित्याची परंपरा असलेल्या पुण्यनगरीत हे संमेलन होत आहे.
या साहित्य संमेलनात ओबीसी बुद्धीजीवींना साहित्याची प्रेरणा मिळावी व त्यातून आपल्या अस्मितेची साहित्य निर्माण करावे, या उद्देशाने विविध विषयावर चर्चा ठेवली आहे. ओबीसी साहित्याचे महानायक बळीराजा ते मांड्याचा राजा परीसंवादाचा विषय याच उद्देशाने ठेवला आहे. नरकासूरापासून बाणासूरापर्यंतचे बळीवंशातील राजे, सम्राट चंद्रगुप्ता, सम्राट अशोक, राजा शिवाजी, संभाजी, शाहूराजे हे ओबीसींच्या साहित्याचे महानायक असू शकतात. आजच्या बळीस्थानच्या लोकशाही क्रांतीचा जाहीरनामा असलेला मंडल आयोग ब्राह्मणी पाताळातून वर काढणारा मांड्याचा राजा व्हि.पी. सिंग. बहुजनांचा साहित्याचा महानायक का होऊ शकत नाही ? खाऊजा “धोरण - बहुजनांचे मरण” “ग्रामीण-ओबीसी व संत साहित्यातून मिळते जातीअंताची प्रेरणा” यासारखे विषय ओबीसी साहित्यिकांनी निश्चितच अस्मितेचे भान देतील. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कामगारांची उध्वस्तीकरण, भोगवादी संस्कृतीचे आक्रमण आदी प्रश्नांच्या उत्तरात धोरणाची चिकित्सा या परीसंवादात होईल. “ओबीसींचे धर्म : मनुधर्माच्या गुलामगिरीतून मुक्ती मिळविण्याची धडपड” या विषयात ओबीसींनी बौद्ध, जैन, शाक्त, नवनाथ, शिख आदी धर्म स्थापन केलेत ? त्यानंतर मुस्लीम, ख्रिश्चन यासारखे परकीय धर्मही का स्विकारले ? ओबीसीतील जातीअंताची प्रेरणाच त्यांना हे सर्व धर्मकारण करण्यास भाग पाडत होती काय ? आदी महत्वाच्या मुद्यांवर व परीसंवादात चर्चा होईल. या संमेलनात अनेक महत्वपूर्ण ठराव होणार आहेत. या शिवाय संमेलनात एकपात्री नाटिका , वारकरी प्रवचन , लोकनाट्य तमाशा, काव्यसंमेलन, शाहीर जलसा आदी कार्यक्रमांची भरपूर रेलचेल आहे. एकूण या संमेलनात ओबीसी बुद्धीजीवींना भरपूर वैचारिक व मनोरंजनाची मेजवाणी मिळणार आहे.
हे संमेलन म्हणजे केवळ हवशा-नवशा-गवशांची यात्रा नाही. हे या भुमिकेवरून लक्षात येईल. तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुले यांनी गेल्या ५ हजार वर्षांच्या संघर्षशील इतिहास जो आलेख आपल्याला सांगीतलेला आहे, त्याचाच एक भाग म्हणजे हे संमेलन आहे. मनुवादी साहित्य-संस्कृतीच्या विरोधात तात्यासाहेबांना जे रणशिंग फुकले होते, त्याचा जाहीरनामा त्यांनीच पत्रस्वरूपात लिहून ठेवला आहे. १८८५ साली झालेय पहील्या मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रण न्या महादेव गोविंद रानडे यांना तात्यासाहेबांनी पत्ररूपाने दिले आहे , ते पत्रच ओबीसी साहीत्यिक संमेलनाच्या जाहीरनामाचा आधार भुत पाया आहे.
या साहित्य संमेलनास राजकीय सामाजिक, साहीत्यिक क्षेत्रातील मान्यवर येतील. परंतू ओबीसीतील बुद्धीजीवीवर्ग व कार्यकर्तावर्ग यांच्या समन्वयाने ओबीसी चळवळ निश्चितच पुढच्या टप्प्यावर जाण्यास मदत होईल. अर्थात पहीलेच साहित्य संमेलन असल्याने ते शंभर टक्के यशस्वी होण्याची खात्री कोणी बाळगू नये. परंतू तरीही मोठ्या संख्येने ओबीसी या संमेलनास हजर राहतील . याची खात्री आहे. आपल्या गावाकडील माय - बापाची व बहीण - भावाच्या मतेची नाळ ज्यांची अजूनही तुटलेली नाही, ते सर्व या संमेलनास निश्चितच हजेरी लावतील यात शंका नाही. या संमेलनाच्या निमित्ताने सर्व फुले-शाहू-आंबेडकरी प्रेमींनी एकत्र येऊ या आणी इडा पीडा जाओ, बळीचं राज्य येवो या आमच्या गावाकडील आया - बहिणींची आर्त हाक आता जयषोघ स्वरूपात आसमंतात दुमदुमून टाकूया !
प्राध्यापक श्रावण देवरे
Satyashodhak, obc, Rajarshi Chhatrapati shahu maharaj, dr Babasaheb Ambedkar