“ज्यासी अपंगिता नाही त्यासी जो धरि हृदयी तोचि साधु ओळखावा देव तेथेचि जाणावा”
हे संत तुकारामांचे वचन सार्थ करणारा लोक कल्याणकारी राज राजर्षी छ. शाहू यांनी जीवनभर केलेल्या कार्याचे स्मरण आणि चिंतन केल्या नंतर खरोखरीच बहुजनांसाठी जीवन जगणारा व लोकहितार्थ कष्टणारा राजा बहुजनांचा महानायक म्हणुन आपल्याला प्रेरणा देतो. ब्राह्मणेत्तर सर्व समाज म्हणजे बहुजन समाज ही धारणा द्दढमुल करणारा आणि ब्राह्मण्यांच्या जोखडातून या समाजाला धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक सांस्कृतिक, आर्थिक मुक्त करण्यासाठी हर एक प्रकारचे प्रयत्न करणारा एवढेच नव्हे तर आपल्या संस्थाना मध्ये कायदे करून त्याची अंमलबजावणी करणारा जगातील एकमेव राजा म्हणुन राजर्षी छ. शाहु यांचा अभिमानाने व गौरवाने उल्लेख करवा असे छ. शाहू यांचा अभियानाने व गौरवाने उल्लेख करता असे त्यांचे उत्तुंग, विलोभनीय आणि आदर्श असे व्यक्तिमत्व आहे.
वर्ण व्यवस्था आणि जातीव्यवस्था यांचे निर्मुलन केल्याशिवाय भारतीय समाजाचा विकास संभवत नाही अशी मनोमन खात्री पटल्यानंतर राजर्षी शाहुनी आपल्या राजेपणाची आणि पदाची सर्व शक्ती रंजल्या गांजल्या, दीन दुखीतांचे अश्रू पुसण्यासाठी व त्यांना सामाजिक न्याय प्राप्त करून देण्यासाठी प्रस्थापीत तथाकथित धर्म मार्तंडाच्या ब्राह्मण्याच्या विरोधात सामाजिक परिवर्तनाच्या कार्यात पणाला लावली. विविध परिषदा, समारंभा मधुन त्यानी ऐतिहासिक प्रबोधनातून काया, वाचा व मनाने प्रखर आणि ओजस्वी विचारांची पेरणी केली. नाशिक, जळगांव, पुणे, सातारा व इतर ठिकाणी स्थापन झालेल्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्था या पेरणीचे फलित म्हणून पाहावयास मिळतात.
शिक्षणांचे बहुजन समाजाला मुक्तद्वार खुले व्हावे यासाठी त्यांनी बहुजनांच्या विद्यार्थ्यांसाठी “विद्यार्थी वसतिगृहांची स्थापना केली.” या वसतीगृहा मध्ये राहून शिकलेल्या कर्मवीर भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातुन महाराष्ट्रभर बहुजन समाजातील विद्यार्थांच्या शिक्षणाचा काळजी तर माहितीच परंतु “कमवा व शिका' हा महानमंत्र त्यांच्या अंगी जाणवून श्रमाधिष्ठित शिक्षणाचे महत्व विशद केले. शाहू महाराजांच्या विचार प्रेरणेतून त्यानी निर्माण केलेल्या विद्यार्थी वसतिगृहा मध्ये शिकून महाराष्ट्र राज्याच्या जडण घडणी मध्ये व शैक्षणिक विकासामध्ये मोलाचे योगदान देणारे दिवगंत. यशवंतरावजी चव्हाण, दिवगंत. बाळासाहेब देसाई यांचे चिरंतन स्मारक म्हणुन कोल्हापुर येथे मोठ्या दिमाखात उभे असणारे शिवाजी विद्यापीठ बहुजनांच्या शिक्षणाचे प्रेरणा केंद्र झाले आहे.
नाभिक वस्तिगृहा मध्ये राहुन शिकलेले कृ. गो. सूर्यवंशी शाहूंच्या विचार प्रेरणेने महाराष्ट्र राज्याचे शिक्षण संचालक म्हणुन आदर्शवत कार्य करते झाले. शाहूंच्या विचाराने प्रेरित झालेल्या सामाजिक कार्य कर्त्यांनी सहकार, उद्योग, आदि संस्थामध्ये नेत्रदीपक कार्य केले. नाभिक सामाजातील माधवराव सुर्यवंशी यानी सुरेश काळे व इतर सहकाऱ्यांच्या सहकार्याने कोल्हापूर मध्ये सत्यशोधक सहकारी बँकेची स्थापना करून सर्व समाजासाठी आर्थिक विकासाच्या दिशा प्रकाशमान केल्या.
गुणवत्तेचा संबंध जन्माने प्राप्त होणाऱ्या वर्ण, जात, कुल व प्रतिष्ठा या सारख्या गोष्टींशी नसते, गुणवत्तेचा संबंध व्यक्तीला मिळणाऱ्या संधीशी असतो. ज्या व्यक्ती संधी न मिळाल्यामुळे अडाणी, दरिद्री वगैरे राहिलेल्या असतात त्या व्यक्ती साठी संधीची द्वारे खुली असता त्यांची प्रतिभा उमलते, फुलते, बहरतते आणि सुरवंटाचे फुलपांखरात रूपांतर व्हावे त्याप्रमाणे अडाण्याचे विद्वानामध्ये, अप्रतिष्ठिचे प्रतिष्ठे मध्ये रूपांतर होऊ शकते . हे राजर्षी शाहूंच्या सामाजिक तत्वज्ञानाचे सार होते. हे तत्वज्ञान प्राप्ती कृतीशील राहून व्यवहारात आणले.
इतर मागास वर्गीयासाठी, बलुतेदारासाठी भटक्या विमुक्तासाठी त्यानी केलेल कार्य आजच्या काळात ही आपल्याला मार्गदर्शक ठरावे इतके आदर्शवत असे आहे. आरक्षण विषयक त्यांचे धोरण त्यांच्या उत्तुंग मानवतेचे निदर्शक आहे. अल्पसंख्य जातींना त्यांनी दिलेले बळ व त्यांना दिलेला आत्मविश्वास इतर मागास वर्गीय संघटनेने अंमलात आणावा. संख्येने मोठा असणारा समाज अल्पसंख्याकांकडे दर्लक्ष करण्याची लोकशाही मध्ये शक्यता अधिक संभवते अशा वेळी प्राप्त अल्पसंख्य जातीतून नेतृत्व निर्माण वहावे. अल्पसंख्य व इतर मागास वर्गीयावर होणाऱ्या अन्यायाचा सनदशीर मार्गाने प्रतिकार व्हावा . देशाची अखंडता व ऐक्यभाव वृद्धिंगत होण्यासाठी सकारात्मक भुमिका घेऊन सहमती व सहकार्यांचा मार्ग प्रशस्त व्हावा.
लेखक विचारवंताना, कवीनां राजर्षी शाहूनी ज्याप्रमाणे सहकार्य करून त्यांची उमेद वाढविली त्याप्रमाणे इतर मागासवर्गीयांच्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अशा साहित्यकांना उमेदीने लिहिण्याचे बळ प्राप्त व्हावे असे संकेत मिळणे त्यांची दखल घेतली गेली एवढी झाले तरी ते आज महत्वाचे आहे.
डॉ. सुरेश गायकवाड
Satyashodhak, obc, Rajarshi Chhatrapati shahu maharaj, dr Babasaheb Ambedkar