स्मारक उभारणीची भीमसैनिकांची मागणी
भीमा - कोरेगाव २०२५: छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्येनंतर त्यांचे अवयव एकत्रित करून स्वतःच्या जागेत अंत्यसंस्कार करणारे शूर योद्धा गोविंद गोपाळ गायकवाड यांच्या ३६६ व्या जयंतीनिमित्त पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील वढू (बुद्रुक) येथील त्यांच्या समाधीस्थळी अभिवादन सभा आयोजित करण्यात आली. शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपरत्न गायकवाड आणि गायकवाड कुटुंबीयांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. त्रिशरण पंचशील ग्रहण करून मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. या वेळी भीमसैनिकांनी गोविंद गायकवाड यांच्या स्मारकाच्या उभारणीसाठी गती देण्याची मागणी शासनाकडे केली, जेणेकरून त्यांच्या शौर्याचा वारसा पुढच्या पिढ्यांना प्रेरणा देत राहील.

बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष किरण शिंदे यांनी सांगितले की, संभाजी महाराजांच्या हत्येनंतर कोणीच पुढे येण्याची हिंमत दाखवली नाही, परंतु गोविंद गायकवाड यांनी निर्भयपणे त्यांचे अवयव एकत्रित करून वढू येथे अंत्यसंस्कार केले. प्रा. वेताळ यांनी शिवशाहीचे पेशवाईत झालेले रूपांतर आणि १ जानेवारी १८१८ रोजी भीमा-कोरेगाव येथे महार सैनिकांनी पेशवाईचा पराभव करून क्रांती साकारल्याचे विशद केले. इतिहास संशोधक अशोक नगरे यांनी सांगितले की, शिवकालात महार सैनिकांनी स्वराज्यासाठी प्रामाणिक सेवा दिली, आणि छत्रपती राजाराम महाराजांनी गोविंद गायकवाड यांच्या कुटुंबाला समाधीस्थळाच्या देखरेखीसाठी इनाम आणि सनद प्रदान केली.
राज्य सरकारने छत्रपती संभाजी महाराज यांच्या तुळापूर (बलिदान स्थळ) आणि वढू (समाधीस्थळ) येथील विकासासाठी १७.१ कोटी ५० लाख रुपयांचा आराखडा मंजूर केला आहे, परंतु गोविंद गायकवाड यांच्या समाधीस्थळाकडे दुर्लक्ष झाल्याची खंत व्यक्त करण्यात आली. विधानसभेचे उपाध्यक्ष आणि पिंपरी-चिंचवडचे आमदार अण्णा बनसोडे यांनी ३१ मार्च २०२५ रोजी वढू आणि तुळापूर येथे भेट देऊन गोविंद गायकवाड यांच्या स्मारकाचा समावेश विकास आराखड्यात करावा, असे निर्देश दिले होते. दररोज हजारो पर्यटक आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते भीमा-कोरेगाव विजयस्तंभ आणि वढू येथील समाधीस्थळांना भेट देतात. भीमसैनिकांनी गोविंद गायकवाड यांच्या स्मारकाच्या विकासासाठी तातडीने पावले उचलण्याची मागणी केली आहे. या कार्यक्रमात पांडुरंग गायकवाड, संदीप गायकवाड, जयेश गायकवाड, कैलास गायकवाड, रमेश गायकवाड, नितिन गायकवाड, विकास ओव्हाळ, भूषण गायकवाड, जितेंद्र वाढवे यांच्यासह अनेक भीमसैनिक उपस्थित होते.
Satyashodhak, dr Babasaheb Ambedkar, Bahujan
फुले - शाहू - आंबेडकर