नंदुरबार, २०२५: सत्यशोधक शेतकरी सभा आणि सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या संयुक्त विद्यमाने नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील कामोद येथे ९ ऑगस्ट २०२५ रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्त एक भव्य रॅली आणि प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात हजारो आदिवासी बांधव, शालेय विद्यार्थी, वनहक्क कार्यकर्ते आणि दावेदार सहभागी झाले. ढोल आणि शिवलीच्या तालावर नाचत, संविधान आणि आदिवासी साहित्य हातात घेऊन काढलेल्या रॅलीत “संविधान बचाव, आदिवासी बचाव,” “जन सुरक्षा कायदा रद्द करा,” “वन कायदा २०२३ रद्द करा,” आणि “आदिवासींच्या जमिनी भांडवलदारांना देणे बंद करा” अशा घोषणा देत आदिवासी समाजाने आपले हक्क आणि संविधानाचे संरक्षण करण्याचा निर्धार व्यक्त केला. कामोद गावातून नवी दिल्लीपर्यंतच्या या प्रतीकात्मक रॅलीने आदिवासी एकजुटीचा संदेश दिला.

कार्यक्रमाला सुरुवात शेतीचा शोध लावणाऱ्या देवमोगरा माता आणि आदिवासी क्रांतिकारकांना फुलहार अर्पण करून झाली. महात्मा ज्योतीराव फुले यांच्या सत्याच्या अखंडाच्या प्रेरणेने शीतल गावीत, गेवाबाई गावीत आणि रंगुबाई मावची यांनी गीत गाऊन वातावरण उत्साही केले. संविधान विश्लेषक आयु. अनंत भवरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानातील पाचव्या आणि सहाव्या अनुसूचींनी आदिवासींना विशेष हक्क दिले आहेत, परंतु गेल्या ७५ वर्षांपासून मनुवादी सरकारांनी हे हक्क नाकारले आहेत. त्यांनी सर्व आदिवासींना एकजुटीने संविधानाचे रक्षण करण्याचे आवाहन केले. कॉ. आर. टी. गावीत यांनी प्रास्ताविकात सांगितले की, भाजप आणि आरएसएस आदिवासींची एकजूट तोडून त्यांच्या जमिनी भांडवलदारांना देण्याचा कट रचत आहेत. मेघा इंजिनिअरिंगसारख्या कंपन्यांमुळे कामोद, दापूर, बोरपाडा, खोकसा परिसरातील हजारो आदिवासी भूमिहीन होत असून, डी-लिस्टिंगद्वारे आदिवासींच्या सवलती काढून घेण्याचा प्रयत्न होत आहे. येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये आदिवासींनी एकजुटीने या षड्यंत्राला प्रत्युत्तर द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमात १६ ठराव मंजूर करण्यात आले, ज्यात वनहक्क कायद्याची काटेकोर अंमलबजावणी, वनजमिनींचा ७/१२ उतारा देणे, अपात्र दावेदारांच्या दाव्यांची फेरतपासणी, आदिवासी स्वायत्त राज्य (भिल प्रदेश) घोषित करणे, डी-लिस्टिंग बंद करणे, जन सुरक्षा कायदा आणि वन कायदा २०२३ रद्द करणे, स्थानिक बोलीभाषेत शिक्षण, आणि अवैध दारू-सट्टा बंद करण्याच्या मागण्या समाविष्ट होत्या. आदिवासी साहित्यकार भीमसिंग वळवी, रजित गावीत, दिलीप गावीत, शीतल गावीत, रामसिंग गावीत आणि कारणसिंग कोकणी यांनी मार्गदर्शन केले, तर जलमसिंग गावीत यांनी सूत्रसंचालन केले. कामोद गावचे पोलीस पाटील, इसऱ्या गावीत, सुदाम गावीत, पालजू गावीत, संताबाई गावीत, संदीप गावीत, राजेश गावीत, बाल्या गावीत आणि गोवजी गावीत यांनी स्थानिक सहकार्य केले. ढोल आणि शिवलीच्या तालावर कार्यक्रमाचा समारोप झाला, ज्याने आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी लढण्याचा दृढनिश्चय अधोरेखित केला.
Satyashodhak, dr Babasaheb Ambedkar, Bahujan
फुले - शाहू - आंबेडकर