नांदेड, दि. ६ सप्टेंबर २०२५: महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी २ सप्टेंबर २०२५ रोजी काढलेल्या शासकीय ठरावाच्या (जी.आर.) विरोधात नांदेड जिल्ह्यातील ओबीसी समाजाने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. या निर्णयामुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणात घुसखोरी होऊन त्यांचे शिक्षण आणि नोकरीतील हक्क हिरावले जातील, असा आरोप करत ओबीसी समन्वय समिती आणि विविध ओबीसी संघटनांनी गुरुवारी (४ सप्टेंबर २०२५) जी.आर.च्या प्रतीची होळी करून जोरदार आंदोलन केले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सामाजिक न्याय विभागाच्या सचिवांना निवेदन सादर करून हा जी.आर. तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली.

आंदोलकांनी हा जी.आर. बेकायदेशीर, असंवैधानिक आणि ओबीसी समाजावर अन्याय करणारा असल्याचे सांगितले. मराठा समाजाला गाव, नाते किंवा कूळ यांच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्याचा सरकारचा निर्णय संविधानाच्या अनुच्छेद १५(४) आणि १६(४) चे उल्लंघन करणारा आहे, जे केवळ सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीयांसाठी आरक्षणाची तरतूद करतात. या निर्णयामुळे ओबीसी समाजातील सुमारे ४०० हून अधिक जातींच्या शिक्षण आणि रोजगारातील प्रतिनिधित्वावर गंभीर परिणाम होईल, अशी भीती व्यक्त करण्यात आली. गावपातळीवर असंवैधानिक समित्या स्थापन करून एका विशिष्ट समाजाला लाभ देणे हा इतर समाजांवर अन्याय आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले.
नांदेड जिल्हा ओबीसी समन्वय समिती, विश्वकर्मा प्रतिष्ठान, गोल्ला-गोलेवार समाज संघटना, महाराष्ट्र नाभिक महामंडळ, स्वाभिमानी कुंभार समाज संघटना, बेलदार समाज विकास मंडळ, अखिल भारतीय समता परिषद, सावता परिषद आणि वडार क्रांतीसेना यांनी संयुक्तपणे मागणी केली की, सरकारने हा जी.आर. तत्काळ रद्द करावा आणि ओबीसी समाजाचे आरक्षण, हक्क आणि प्रतिनिधित्व संरक्षित ठेवण्यासाठी ठोस धोरण जाहीर करावे. जर मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर संपूर्ण जिल्ह्यात तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनाने ओबीसी समाजाच्या एकजुटीचा आणि हक्कांसाठी लढण्याच्या दृढनिश्चयाचा संदेश दिला.
या आंदोलनात ओबीसी समन्वय समितीचे प्रदेशाध्यक्ष नामदेवराव आयलवाड, जिल्हाध्यक्ष गोविंद फेसाटे, ओबीसी नेते अविनाश भोसीकर, साहेबराव बेळे, सतीशचंद्र शिंदे, विजय देवडे, नागनाथराव लोहगावकर, नंदकुमार कोसबतवार, गोविंदराम सूरनर, महेंद्र देमगुंडे, माधवराव अमृतवाड, पी.पी. बंकलवाड, प्रभू वाघमारे, व्यंकटराव रानसेवार, दैवशाला पांचाळ, बाळू राऊत, राजेश केंद्रे, संतोष तेलंगे, शिवकुमार देवकते, सुनील शिंदे, राम आचेमवाड, अंबुरे यांच्यासह ओबीसी समाजाचे अनेक कार्यकर्ते आणि संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Satyashodhak, obc, dr Babasaheb Ambedkar, Bahujan, Mandal commission
फुले - शाहू - आंबेडकर