ओबीसी आरक्षण....भाग-2
लेखक - इंजि. राम पडघे अध्यक्ष श्री संताजी शैक्षणिक व सामाजिक विकास संस्था सातारा महा
ओबीसी आरक्षण या विषयावर काल 'महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ओबीसीच्या आरक्षणाचा बळी जायला नको" यासंदर्भात एक लेख लिहिलेला होता. या लेखाला दिलेला आपण प्रतिसाद निश्चितच ओबीसी बांधव जागरूक, सावध व या विषयावर बारीक लक्ष ठेवून आहेत याची जाणीव मला झाली. या लेखामध्ये स्पष्ट नमूद केलेले होते की आज ओबीसी आंदोलनाला एका प्रभावी नेत्याची निश्चितच आवश्यकता आहे. आज जे नेते या संदर्भात काम करत आहेत ते निश्चितच आपापल्या परीने अत्यंत उत्कृष्ट काम करत आहेत तथापि एक राज्य पातळीवरील प्रभावी नेता म्हणून छगन भुजबळ साहेबांना सर्व मान्यता आहे. आणि यामध्ये भुजबळ साहेबांनी ताकतीनिशी सहभागी होणे हे नितांत गरजेचे आहे. भुजबळ साहेबांनी अत्यंत योग्य वेळी पत्रकार परिषद घेऊन ओबीसी समाजाची ताकद व एकता दर्शवून दिली यासाठी त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद .

कालच्या पत्रकार परिषदेमध्ये भुजबळ साहेबांनी व त्यांच्यासोबत असलेल्या ओबीसी नेत्यांनी ओबीसी समाजाची भूमिका अत्यंत चांगल्या प्रकारे स्पष्ट केली . ओबीसी आरक्षणाला सध्या न्यायालयाने दिलेले निकाल अत्यंत मजबूतपणे चौकट म्हणून उभे आहेत. त्यामुळे ओबीसीचे आरक्षण सहजासहजी पळवता येणार नाही हे खरे असले तरी सावध असणे काळाची गरज आहे.
कालच्या पत्रकार परिषदेमध्ये न्यायालयाचे दाखले देऊन ओबीसी आरक्षणामध्ये राज्य पातळीवर राज्य सरकारला ओबीसी आरक्षणात कोणालाही समाविष्ट करता येत नाही हे अत्यंत ठळकपणे नमूद केले. वेगवेगळ्या ठिकाणची गॅझेटर्स उपलब्ध करून त्या योगे आपला मुद्दा रेटण्याचा मनसुबा दिसत असला तरी यामध्ये मराठा व कुणबी अशी स्वतंत्र आकडेवारी दिलेली आहे.हे दोन्ही प्रवर्ग वेगवेगळे आहेत असे म्हणण्याला वाव आहे असे कालच्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट नमूद केले आहे. तरीही न्यायालयासमोर ही गॅजेटि अर्स जातील त्यावेळी वेगवेगळ्या पद्धतीने याची तपासणी होऊन या मधला निश्चित निष्कर्ष काढला जाईल. त्यावेळी मात्र आम्ही अधिक तत्पर असण्याची आवश्यकता आहे.
आता सुरू असलेले मराठ्यांचे आंदोलन इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये होईल अशी अपेक्षा ओबीसी नेत्यांना नसावी आणि सरकारलाही नसावी . त्यामुळे ओबीसी समाजाच्या आंदोलनासाठीची पूर्वतयारी करण्यात आल्याचे दिसून येत नाही. तथापि मराठी समाजाच्या आंदोलनाने हे मोठे स्वरूप प्राप्त केल्यानंतर त्याला तेवढ्याच ताकतीने उत्तर देण्यासाठी ज्या पद्धतीने सध्या ओबीसी नेते उभे राहिलेले आहेत ते निश्चितच कौतुकास्पद व अभिनंदननीय आहे. इतक्या कमी वेळामध्ये त्यांनी आपल्या आंदोलनाला निश्चित चांगले स्वरूप दिलेले आहे. मुंबईमध्ये झालेल्या कालच्या बैठकीला बहुसंख्य ओबीसी नेते उपस्थित असल्याचे दिसत होते. तथापि वेगवेगळ्या पक्षातले ओबीसी आमदार किंवा खासदार हे मात्र या ठिकाणी दिसले नाहीत, ही ओबीसीसाठी मोठी सामाजिक कमतरता आहे. मराठी समाजाने जे आंदोलन उभे केले आहे त्याचे स्वरूप पाहता याच्या विरोधात आपण जायला नको अशी राजकीय गणित साधण्याची भूमिका आमदार आणि खासदार मंडळींनी घेतले चे दिसून येत आहे.
कालच्या पत्रकार परिषदेमध्ये अत्यंत आवर्जून नमूद करावा असा एक मुद्दा माननीय भुजबळ साहेबांनी परत परत ठासून सांगितलेला आहे. जर का ओबीसी समाजाच्या आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न झाला किंवा दिले गेले तर दुसऱ्या दिवशी आम्ही आपल्या विरुद्ध कोर्टामध्ये हजर आहोत याची सरकारने नोंद घ्यावी.
आजच्या घडीला जरी मराठा समाज एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलन करत असले तरी कायदेच्या दृष्टीने आम्ही निश्चितच वरचढ आहोत हे सत्य आहे. तरीही कायदा बदलण्याची ताकद सरकारमध्ये असल्याने सावध राहणे आवश्यक आहे. हे सर्व खरे असले तरी सर्व ओबीसी बांधवांनी या आंदोलनामध्ये आपला सहभाग नोंदवणे आवश्यक आहे.
एखाद्या आंदोलनाला दिशा देण्याचे काम नेतेमंडळी करत असली तरी या आंदोलनाला गती देणे व ते अखंड चालू ठेवणे, त्याच्यामध्ये ऊर्जा भरणे यासारखे महत्वपूर्ण टप्पे तरुणांच्या खांद्यावर असतात. यासाठी ओबीसी समाजातील तरुण वर्गाला जागे करणे. एकत्रित करणे , आजच्या घडीला ओबीसी आरक्षणाचे महत्त्व त्यांना समजून सांगणे व आपल्यातला जातीचा वेगळेपणा बाजूला ठेवून एकजुटीने ओबीसी म्हणून उभे राहणे हे आपले कर्तव्य आहे हे त्यांच्यापर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे.
लेखक - इंजि. राम पडघे अध्यक्ष श्री संताजी शैक्षणिक व सामाजिक विकास संस्था सातारा महा
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan, Mandal commission
फुले - शाहू - आंबेडकर