कोल्हापूर, दि. ३ सप्टेंबर २०२५: ओबीसी समाजाच्या आरक्षण संरक्षणासह विविध ज्वलंत समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि आगामी आंदोलनाची रणनीती ठरविण्यासाठी येत्या ९ सप्टेंबर २०२५ रोजी कोल्हापुरात सर्वपक्षीय ओबीसी नेते आणि कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. हा निर्णय रविवारी (दि. १ सप्टेंबर) ओबीसी जनमोर्चा आणि ओबीसी बहुजन आघाडीच्या संयुक्त बैठकीत एकमताने घेण्यात आला. बैठकीचे अध्यक्षस्थान ओबीसी जनमोर्चाचे जिल्हाध्यक्ष शिवाजी माळकर यांनी भूषवले. यासोबतच, ओबीसी समाजाच्या प्रलंबित मागण्यांबाबत राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांना निवेदन सादर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.

कोल्हापूर येथील मंगळवार पेठेतील दैवज्ञ बोर्डिंग येथे आयोजित या बैठकीत ओबीसी नेते दिगंबर लोहार यांनी राज्यातील सध्याच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर सविस्तर चर्चा केली. त्यांनी ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी एकजुटीने लढण्याचे आणि योग्य दिशेने पावले उचलण्याचे आवाहन केले. येत्या काही दिवसांत राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना भेट देऊन मुख्यमंत्र्यांना ओबीसी समाजाच्या समस्यांबाबत निवेदन सादर करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या निवेदनातून ओबीसी आरक्षणाचे संरक्षण, शैक्षणिक आणि आर्थिक समस्यांचे निराकरण, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसींना योग्य प्रतिनिधित्व मिळावे, यासारख्या मागण्या पुढे केल्या जाणार आहेत.
मंगळवार, दि. ९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या मेळाव्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतही सखोल चर्चा होणार आहे. या निवडणुकांमध्ये ओबीसी समाजाला त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी आणि आरक्षण टिकवून ठेवण्यासाठी रणनीती आखली जाणार आहे. याशिवाय, ग्रामीण भागातील ओबीसी समाजात संविधानिक हक्कांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी 'संविधानिक न्याय्य हक्क जागरण यात्रा' सर्व तालुक्यांत आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या यात्रेद्वारे ओबीसी समाजाला त्यांच्या हक्कांबाबत शिक्षित करणे आणि सामाजिक एकता बळकट करण्याचे उद्दिष्ट आहे.
या बैठकीत ओबीसी बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष एकनाथ कुंभार यांनी ओबीसी समाजाच्या शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपणावर प्रकाश टाकला, तर चंद्रकांत कोवळे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलनाची गरज अधोरेखित केली. अनिल खडके, पंडित परीट, सुधाकर सुतार आणि मीनाक्षी डोंगरसाने यांनीही आपली मते मांडली. बैठकीला अजय अकोलकर, नंदकुमार बेलवलकर, सुधाकर सुतार, सिंधू बडवे, सुनील महाडेश्वर, मनाली कुलकर्णी, किशोर लिमकर, दत्तात्रय सातार्डेकर, मोहन हजारे, सुखदेव सुतार, संजय काटकर, तानाजी मर्दाने यांच्यासह अनेक ओबीसी कार्यकर्ते उपस्थित होते. या मेळाव्यामुळे ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी एकजुटीने लढण्याचा संदेश राज्यभर पोहोचेल, अशी अपेक्षा आहे.
Satyashodhak, obc, dr Babasaheb Ambedkar, Bahujan, Mandal commission
फुले - शाहू - आंबेडकर