नागपूर, ३० ऑगस्ट २०२५: राष्ट्रीय ओबीसी महासंघाने मराठा समाजाला इतर मागासवर्गीय (ओबीसी) कोट्यातून आरक्षण देण्याच्या कोणत्याही प्रयत्नाला ठाम विरोध दर्शवला आहे. "आमचे २७ टक्के ओबीसी आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत लढू. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या, पण आमच्या हक्काला धक्का लावू नका," असा कठोर इशारा महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी शनिवारी नागपुरातील संविधान चौकात सुरू झालेल्या साखळी उपोषणादरम्यान सरकारला दिला.

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी मुंबईत आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रीय ओबीसी महासंघाने नागपुरात साखळी उपोषणाची सुरुवात केली आहे. डॉ. तायवाडे यांनी सांगितले की, "जर सरकार जरांगे यांच्या दबावाला बळी पडून ओबीसींच्या कोट्यातून मराठ्यांना आरक्षण देण्याचा प्रयत्न केला, तर त्याचे परिणाम संपूर्ण महाराष्ट्रात उमटतील. ओबीसी समाज हा लोकसंख्येच्या ६० टक्के आहे आणि आम्ही आमच्या हक्कासाठी एकजुटीने लढू. चार दशकांच्या संघर्षातून मिळालेले हे आरक्षण आम्ही कोणाच्याही दबावाखाली हिसकावून घेऊ देणार नाही."
त्यांनी पुढे मागणी केली की, सरकारने प्रथम जातिनिहाय जनगणना पूर्ण करावी आणि लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षणाचे धोरण ठरवावे. "मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही, पण ते स्वतंत्र कोट्यातून द्यावे. ओबीसींच्या कोट्याला हात लावणे आम्हाला मान्य नाही," असे त्यांनी ठामपणे सांगितले.
या उपोषणाला विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळत आहे. भाजपचे आमदार डॉ. परिणय फुके यांनी सांगितले, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत ओबीसींच्या मागण्या पोहोचवल्या जातील. मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याच्या मागणीमुळे ओबीसी समाजात अस्वस्थता आहे. मी वैयक्तिकरित्या हमी देतो की, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही."
भाजपचे आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी जरांगे यांच्या आंदोलनावर टीका करताना म्हटले, "मराठा समाजाला स्वतंत्र १० टक्के आरक्षण देण्यासाठी सरकारने आधीच पावले उचलली आहेत. जरांगे यांचा ओबीसी कोट्यावर दावा करणे अन्यायकारक आहे. त्यांचे आंदोलन राजकीय प्रेरित आहे आणि निवडणुकीच्या वेळी असे आंदोलन उभे केले जाते."
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरद पवार गटाचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनीही महासंघाच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवला. "मराठा समाजाला आरक्षण मिळावे, पण ते ओबीसींच्या हिस्स्यातून नको," असे त्यांनी स्पष्ट केले. शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, गडचिरोली-चिमूरचे खासदार डॉ. नामदेव किरसान, आमदार अभिजित वंजारी, माजी आमदार सुधाकर कोहळे, अशोक धवड, सेवक वाघाये, माजी जिल्हा परिषद सदस्य उज्ज्वला बोढारे, दिनेश चोखारे, महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी आमदार सुधाकर देशमुख यांनी उपोषणस्थळी भेट देऊन पाठिंबा जाहीर केला.
साखळी उपोषणाला पोलिसांनी परवानगी दिली असून, हे आंदोलन सरकारकडून लेखी आश्वासन मिळेपर्यंत सुरू राहील, असे महासंघाने जाहीर केले आहे. जर मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर आंदोलन तीव्र करून मुंबईत मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन करण्याचा इशाराही डॉ. तायवाडे यांनी दिला आहे.
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan, Mandal commission
फुले - शाहू - आंबेडकर