दि. ९ आणि १० सप्टेंबर २००६ रोजी भारताच्या इतिहासात प्रथमच ओ.बी.सी. साहित्य संमेलनाचे आयोजन केले जात आहे. त्यानिमित्ताने माझे ओ.बी.सी. संबंधीचे विचार येथे मांडत आहे. सामाजाच्या विकासासाठी हे संमेलन महत्वाचे ठरावे अशी अपेक्षा आहे.
समाजाच्या विकासासाठी सर्वानी एकत्र येणे प्रश्न आणि समस्या संबंधी विचार - विनिमय करणे ही घटनाच महत्वाची असते. या प्रश्नासंबंधी न्याय भूमिकेसबंधी, अन्यायाच्या प्रतिकारासंबंधी सर्व स्तरावर प्रभावीपणे जागरूकता निर्माण करणे आणि समाजाच्या प्रत्येक घटकात तशी जाणीव निर्माण करणे हे महत्वाचे आहे. त्यासाठी किर्तन, जलसे | पोवाडा या लोकांच्या अभिरूचीच्या माध्यमांचा वापर करावा लागतो कवी - साहित्यकांच्या लेखनाचा उपयोगही करावा लागतो. त्यातून लोकमानस घडत जाते. हे जागरूक लोकमानस भविष्यात संघर्षाला उपयोगी पडते . ओ.बी.सी.च्या मनोभूमिका तयार करण्याचे त्यातून समाजाच्या विकासाचे नवे मार्ग शोधण्याचे काम यातून घडले. हे सर्वच समाजाच्या बाबतीत लागू पडते. उदाहरण द्याचे झाल्यास हिंदूस्थनातील हिंदू समाजाच्या अनिष्ट रूढीवर इथल्या संतानी आपल्या अभंगाद्वारे, किर्तनाद्वारे, प्रवचनाद्वारे आसुड ओढले आहेत. आणि हिंदू समाज जागृत करण्याचा प्रयत्न केला. त्यात संत तुकाराम, संत एकनाथ, संत सेना महाराज, संत गोरा कुंभार, संत चोखामेळा, संत नामदेव, संत तुलसीदास, संत कबीर असतील जे जे म्हणून संत झाले त्यांनी सामान्यातला सामान्य माणूस आपल्या अभंगातून दोह्यातून, किर्तनातून जागृत करण्याचा प्रयत्न केला. शिक्षणास प्राधान्य द्या अनिष्ट प्रथा सोडून द्या असे सांगणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज किंवा गाडगेबाबा असतील किंवा माधवबाबा मोळवणकर असतील किंवा भगवानबाबा हे आणि यासारखे किती तरी संत या राज्यात या देशात आयुष्यभर समाजजागृती साठी झिजत राहिले. रंजल्या गांजल्यांना मदतीचा हात देत राहिले. त्याचा परिणाम हिंदू समाज थोडासा जागृत झाला. तो शिक्षण घेऊ लागला त्यातून त्याला या देशातले चांगले काय आहे व वाईट काय आहे कळू लागले हे काम सोपे नव्हते. या संतानी शतकानुशतके हे कार्य सुरूच ठेवले. त्यामुळे या धर्मातील कष्टकरी, शेतकरी, कुंटूंबातील मुलं-मुली थोड्या फार फरकाने शिक्षण घेत आहेत. आता कुठे या कष्टकरी समाजाच्या विकासाची पहाट झाली आहे. त्यानंतर विकासाचे तांबडे फुटले मग फटफटेल, उजाडेल मग न्याहरीची वेळ होईल आणि विकासाची दपार येण्यासाठी आणखी बराच अवधी जावा लागणार आहे. त्यासाठी अशा साहित्य संमेलनाचे फार मोठे योगदान लाभणार आहे.
हिंदू समाजात विविध जाती आहेत. त्या जातीमध्ये पोटजाती आहेत त्या पोटजातीच्या उपपोटजाती आहेत. त्यामध्ये जसे उच्चवर्णीय आहे, तसेच मागास जातीचे सुद्धा आहे. यामधील बऱ्याच प्रमाणात उच्च वर्णीयामध्येच जागृती आहे. त्याच प्रमाणे अनुसुचीत जाती मधील नवबौद्धा मध्ये बऱ्या प्रमाणात जागृती होत आहे. त्याचे कारण म्हणजे त्या समाजाने म्हणा किंवा समुहाने म्हणा आपल्या समाजाची प्रगती करावयाची असेल तर शिकले पाहिजे. हे या अशिक्षित समाजामध्ये विविध प्रचार व प्रसार माध्यमाद्वारे पटवून देण्यास सुरूवात केली. त्यामध्ये त्यांनी जलशाचा वापर केला. छोट्या - छोट्या वर्तमानपत्राचा वापर केला साप्ताहिकाचा, वगनाट्याचा आणि नाटकाचा व पोवाड्यांचाही वापर केला. त्यामुळे समाजातील मुलांनी शिकले पाहिजे असे वाटू लागले. त्यामुळे या समाजात शिक्षणाचा प्रसार झाला. त्यातून कवी जन्माला आले. आणि त्यामुळे समाजजागृती झाली समाजातील अनिष्ट रूढीवर या शाहिरांनी कोरडे ओढण्यास सुरूवात केली. साहित्यीकांनी आपल्या साहित्यामधून आपला समाजावर होणाऱ्या अन्यायाच्या संदर्भात कथा लिहिली कविता लिहिल्या. जो कोणी अन्याय करतो त्यावर आपल्या लेखणीतून कोरडे ओढले. जो हा अन्याय सहन करतो त्या समाजातील लोकांनाही कोरडे ओढले. व हा अन्याय उपटून टाका. असे अव्हान समाजातील साहित्यिक आणि कलावंतानी केले. त्याचा परिणाम हजारो वर्षापासून या समाजावर अन्याय दूर करण्यासाठी इथल्या राज्यकर्त्यांना काही नियम करावे लागले. काही कायदे करावे लागले. त्यामुळे समाजाला फार मोठा नाही मिळालेला तरी काही प्रमाणात काही होईना न्याय मिळाला. या समाजाच्या विकासाची सकाळ झाली जो काही न्याय मिळाला त्याचे श्रेय त्या समाजातील साहित्यकांना कलावंताना, सामाजिक कार्यकर्त्यांना आणि राजकीय कायकर्त्यांना आणि वेगवेगळ्या माध्यमातून समाजजागृती करण्याच्या प्रयत्नांना द्यावे लागते. त्याचबरोबर अन्यायाच्या विरूद्ध पेटून उठून संघर्ष करण्याची उर्मी या वरील विचारकर्त्यांनी दिली.
प्रसंगी वरील सर्व माध्यमांना एका व्यासपीठावर आण्याचा प्रयत्न केला. त्यातूनही विचार मंथन करून समाजाच्या विकासाच्या वाटा शोधण्याचा प्रयत्न केला. याला तोड नाही. हे जलसे नवबौद्धांनी केले . तसे त्यांच्यातील इतर जाती समुहामध्ये अध्यापपर्यंत झाले नाही. अनुसूचीत जमाती तर अजूनही विकासाच्या कोसो दूर आहे. या हिंदू समाजात फार मोठ्या प्रमाणात (ओ.बी.सी.) हा मागास प्रवर्ग आहे. या देशातील एकूण लोकसंख्येच्या निम्म्या हून अधिक आहे. खरे तर या एवढ्या मोठ्या लोकसंख्या असलेल्या प्रवर्गाचे प्रश्न चुटकी सारखे सुटावयास पाहिजे. पण ह्याच वर्गाचे प्रश्न देश स्वतंत्र झाल्यापासुन आज ६० वर्षापर्यंत पडून आहेत. याचेच मला आश्चर्य वाटले. या समाजात सर्वात जास्त संत निर्माण झाले. त्यांनी समाज जागृती केली. रूढी, परंपरावर हल्ले केले. शिक्षण घेतले पाहिजे असे सांगितले पण या संतानी या देशातील समाजासाठी प्रयत्न केले. मग तो हिंदू असो वा मुस्लिम, शिख असो व अन्य धर्मीय. सर्व एक आहेत. त्या सर्वांचा विकास झाला पाहिजे असे सांगितले पण या देशातील उच्च वर्णीयांनी या समाजाला जाणीवपूर्वक, सुत्रबद्ध पद्धतीने परंपरा व रूढीमध्ये अडकून ठेवण्याचा पद्धतशीरपणे प्रयत्न केले. जाती - जातीत अंतर ठेवण्याचा प्रयत्न केले. त्यांच्यात वाद निर्माण केले. त्यांना त्यांच्या पारंपारिक व्यवसायात गुंतवून ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्यासाठी खोट्या समजुती तयार केल्या. उदा. उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी आणि बारा बलुतेदारांना त्यांच्या व्यवसायात गुंतवून ठेवण्यात ते यशस्वी झले. देश स्वतंत्र झाला या देशातील घटनाकारांनी या देशातील मागास जातींच्या विकासासाठी घटनात्मक तरतूद केली. अनुसूचित जाती जमातींना १९५० पासूनच त्यांच्या फायदा मिळण्यास सुरूवात झाली १९५३ साली अन्य मागास वर्गीयांना देशाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काकासाहेब कालेलकरांनी आपला अहवाल १९५५ ला पंतप्रधानाकडे सादर केली. आणि स्वत:ची पत्र सोबत जोडले की, जातीच्या आधारावर सवलती देऊ नये. त्यामळे हा अहवाल पंडित नेहरूंनी ठेवला. खरे तर पंडित नेहरूंना हे लक्षात यावयास पाहिजे होते की, या देशातील हिंदू धर्मातील कोणताही माणूस जन्म घेतो तो कुठल्यान कुठल्या जातीतच घेतो. या देशात जातीशिवाय माणूस जन्म घेऊच शकत नाही. हे कठोर सत्य आहे. प्रचंड गाडे अभ्यासक पंतप्रधान पंडित नेहरूंना समजण्याइतके अवघड निश्चितच नव्हते. त्या काळातल्या राजकारण्यांनी एक निश्चित धोरण ठरवून घेतले असावे असे मला वाटते की जर हा ५२ टक्के समाज जागृत झाला तर आपल्या हातातून मताच्या जोरावर सत्ता हिसकावून घेईल. आपणास सत्तेच्या सिंहासनावरून खाली उतरावे लागजे. त्यासाठी त्यांनी सवलती मागीतल्या तरच देऊन त्यासाठी बरीच वर्ष त्यांना लढा देण्यास घालवून नंतर सवलती दिल्याशिवाय जमनारच नाही. तर मग पुढे टप्या - टप्याने सवलती देण्याचा प्रयत्न करून असा एखादा विचार त्या वेळच्या राजकारणी लोकांच्या मनात असावा असे मला वाटते नाहीतर १९५५ सालीच अन्य मागास वर्गीयांना सवलती लागू केल्या असत्या आणि आज ५९ ते ६० वर्षात या वर्गातील समाजाने विकासाचे एक टोक गाठले असते. त्यवेळी तो अहवाल बासनात गुडाळून ठेवल्यामुळे या समाजाच्या विकासावर गंभीर परिणाम झाले ते अत्यंत नुकसानकारक आहेत. अनुसूचीत जाती जमातीच्या मुलांनी शिक्षण घेऊन नोकरीत येण्यासाठी कायदेशीर तरतूद असल्यामुळे त्यांनी उच्चवर्णीयांनी काही प्रमाणात छोट्या मोठ्या पदावर नोकरीत घेण्यास सुरूवात केली. पण काही समाजात उच्च शिक्षित नसल्यामुळे मोठ्या अधिकाराच्या जागा उच्च वर्णीयांनीच घेतल्या जस जसे अनुसूचीत जाती जमातीत मुले शिकू लागली तस तसे अधिकार पदावर येऊ लागली. त्याच काळात या देशातील भांडवलदारांनी देशातील बाराबलुतेदारांचेजे व्यवसाय होते. ते व्यवसाय आपल्या ताब्यात घेतले. उदा. लोहार, सुतार, चांभार, तेली, कासार, विनकर इ. चे तांत्रीक व शास्त्रशुद्ध कारखाने काढले त्यामुळे मोठ्या प्रमाणात उत्पादन बाजारात येऊ लागले. आणि चांगल्या प्रतीचे व कमी पैशात मिळू लागले परिणामी या लोकांचे पारंपारिक धंदे बसले याच काळात शिक्षणाचा प्रसार काही प्रमाणात सुरू झाला. या ही वर्गाची मुले शिकू लागली. दहावी, पदवीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर नोकऱ्यासाठी विविध कार्यालयात जाऊन अर्ज करून लागली नोकरीवर घेण्यासाठी जो अधिकारी होता ते त्या अन्य मागास वर्ग नोकर तरूणांना सांगू लागला तुम्हाला नोकरी देता आली असती पण या अनुसूचीत जातीच्या लोकांना कायदेशीर नोकरीवर घेणे असल्यामुळे तुम्हाला मदत करता येत नाही. त्यामुळे शिक्षण घेऊन बेकार झालेला व त्याचा पारंपारिक धंदाही बसलेल्या असल्यामुळे या वर्गाच्या तरूण मनामध्ये कारण नसताना अनुसूचीत जातीच्या प्रवर्गाबाबत तेढ निर्माण झाली. या प्रवर्गामुळे आम्हाला नोकरीपासून वंचित रहावे लागत आहे. त्यामुळे अनुसूचीत जातीजमाती चव बाराबलुतेदार अन्य मागास प्रवर्गात तेढ निर्माण झाली. अनुसूचित जातीच्या मुलामध्ये जस जसी शैक्षणिक चळवळ वाढत व रूजवत गेली त्यामुळे त्यांनी आपल्या हक्कासाठी एकत्र येऊन संघर्ष करण्यास सुरूवात केली. या चळवळीला साहीत्यीक उजाळा दिला. त्यामुळे एक गाव एक पाणवठा असेल किंवा परंपरेने चालत आलेली कामे सोडून देणे असेल, किंवा देवळात प्रवेश करणे असेल यासाठी हा प्रवर्ग पेटून उठला. आणि त्यांच्या विरोधात प्रथम जर कोणी पुढे येऊ लागला तर हा अन्य मागास वर्गीयच या दोघातच गावा-गावात, शहरा-शहरात संघर्ष घडू लागला त्यातून अनेक वेळा दलित वसत्या जाळल्या. दोन्ही समाजाची डोकी फोडा फोडी झाली. पोलीसात तक्ररारी झाल्या अनुसूचित जाती विरूद्ध सर्वात पुढे मागासवर्गीयांची नोंद असे कारण की यांच्यामुळे आमची मुले बेकार रहात आहेत यांच्यामुळे आमच्या मुलाच्या नोकऱ्या मिळत नाहीत. हे सुत्र उच्च वर्गीयांनी त्यांच्या डोक्यात भरवून दिलेले होते. अनुसूचित जाती जमातींना मिळणाऱ्या सवलती बंद करण्यासाठी पेटून उठला तरच तुमचे कल्याण होईल , तुम्हाला नोकऱ्या मिळतील असे सातत्याने उच्च वर्णीय ओबीसींच्या मुलांना त्यांच्या पालकांना शिस्तबद्ध पद्धतीने सांगत राहिले. त्यामुळे अन्य मागास वर्गीयांच्या मनामध्ये अनुसूचित जातीबद्दल एक घृणा, तिरस्कार, तेढ निर्माण झाली व त्यांना मिळणाऱ्या सवलती बंद करा. इथपर्यंत हा रोष प्रकट झाला. ज्या वेळी पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंह अन्यमागासवर्गीयांसाठी मंडल आयोगाच्या शिफारश लागू केल्याचे जाहीर केले. त्यावेळी अन्य मागासवर्गीयानां असे वाटले की, आगोदरच अनुसूचित जातींना मोठ्याप्रमाणावर सवलती मिळतात. त्यात आणखी मंडल आयोगाच्या शिफारशी मुळे अधिक सवलती त्यांनाच मिळतील व आपणास नोकरीच मिळणार नाही म्हणून अन्य मागासवर्गीयातील बरीच मंडळींनी या आयोगाच्या आंमलबजावणीवर मोठा विरोध केला. ज्याच्या विकासासाठी हा आयोग स्वीकारला त्यांनीच त्याला विरोध केला हे कशातून घडले त्याचे कारण वर सांगितलेच आहे. अन्य मागसवर्ग (ओ.बी.सी.) आजही मोठ्या प्रमाणात अशिक्षित आहे. तो आजही जाती - जातीत व जातीतील उपजातीत व गटात विभागला आहे. अन्य मागासवर्गीय कश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत देशातील सर्व राज्यात बहुसंख्येने आहे. आज अन्य मागासवर्गीय मध्ये थोड्या फार फरकाने का होईना तरूण शिकलेली आहेत. ओ.बी.सी.तील या सर्व जाती - जमाती, गट - उपगट यांना एकत्रीत करणे आवश्यक आहे. त्यासाठी या समाजातील मानसीकता जागृत करणे गरजेचे आहे. आम्ही ५२ टक्के किंवा त्यापेक्षा संख्येने अधिक आहोत. घटनेने आमच्यासाठी कायदेशीर काही अधिकार दिलेले आहेत. त्या अधिकाराचा वापर करून अम्हाला न्याय मिळाला पाहिजे, मंडल आयोगाने ज्या ज्या शिफारशी केलेल्या आहेत. त्या त्या शिफारशी जशाच्या तशाच त्वरीत या प्रवर्गाच्या हितासाठी राबविल्या पाहिजेत. त्याही टप्या-टप्याने नव्हते तर एकदाच लागू कराव्यात.
महाराष्ट्र राज्यात अन्य मागासवर्गीयांत २७टक्के जागा ओ. बी.सी. साठी राखीव आहेत. त्यात ११ टक्के भटके विमुक्त, धनगर, वंजारी, जमातीसाठी त्यातही अ, ब, क, ड अशी विभागणी केलेली आहे. ही विभागणीही बरोबर नाही. या देशात कायद्याने ५२ टक्के हा प्रवर्ग आहे, तर ५२ टक्के राखीव जागा या प्रवर्गासाठी ठेवण्यात याव्यात याला कारण दिले जाते की, सर्वोच्च न्यायलयाने ५० टक्के पेक्षा जास्त आरक्षण असू नये. शहाबानु प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने पोटगी संदर्भात निर्णय दिला होता. या देशातील सर्व मुस्लीमांनी या निर्णयाच्या विरोधात लढा उभा करावा. दबाव गट निर्माण करावा. त्याबरोबर या देशातील खाजगी उद्योग धंद्यात अन्य मागास वर्गीयांसाठी ५२ टक्के नोकरीत आरक्षण लागू करण्यासाठी, थर्ड शडूल्ड लागू करण्यासाठी म्हणजेच, विधानसभा, विधानपरिषद लोकसभा, राज्यसभा यामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधीत्व मिळावे म्हणून, क्रिमी लिअरची अट रद्द करावी म्हणून या समाजातील साहित्यकांनी आणि कलावंतानी समाज जागृत करण्यासाठी आपली कला, आपले साहित्य निर्माण करावीत मी या समाजाच्या जागृतीसाठी सादर करावीत, या समाजाच्या विकासासाठी, स्पष्ट भुमिका घेऊन छाती ठोकून, पुढे येऊन मांडवीत कुणाचीही तमा न बाळगता या प्रवर्गातील अनिष्ठ रूढी व परंपरेवर आसुड मारावेत. या प्रवर्गातील जे दुःख आहेत तो आपल्या साहित्याद्वारे आपल्या कलेद्वारे, आपल्या नाटकातून, कवितेतून, गीतातून या देशातील शासनकर्त्या समोर मांडवेत या प्रवर्गासमोर मांडवेत त्यांना आपल्या न्याय हक्कासाठी एकत्र येण्यासाठी या साहित्य संमेलनाचा उपयोग व्हावा. येथे आलेल्या व न आलेल्या साहित्यकांनी या पुढे निद्रीत समाजजागृत करण्यासाठी आपले लेखणी पाजळावी
य मागण्या व मंडल आयोग जसाच्या तसा लागू कसा करून घेता येईल यासाठी, या विखुरलेल्या समाजात संघर्षाची ज्योत पेटविण्यासठी व त्यातून उग्र संघर्ष निर्माण करून न्याय हक्क पदरात पाडून घेण्यासाठी या देशातील तमाम ओबीसी तील साहित्यकांनी आणि कलावंतानी आपले साहित्य निर्माण करण्यासाठी शपथ घेवूनच बाहेर पडले तरच ह्या साहित्य सम्मेलनाचा हेतू साध्य होणार आहे.ज्या साठी संयोजकांनी हे साहित्य संमेलन अनेक अडचणीतून साकार केले, त्याचाही हेतू साकार होणार आहे.या इतर मागासवर्गीयांच्या साहित्य संमेलनास माझ्या हार्दिक शुभेच्छा.
प्रा. ज्ञानोबा सीताराम मुंढे, सरचिटणीस ओबीसी संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य
|| जय ज्योती, जय क्रांती ।।
Satyashodhak, obc, Rajarshi Chhatrapati shahu maharaj, dr Babasaheb Ambedkar