पुरंदर तालुक्यातील विविध संविधान प्रेमी व्यक्ती आणि संघटना एकत्र येऊन क्रांती दिनांचे औचित्य साधून शनिवार दि. ९ ऑगस्ट २०२५ रोजी सासवड नगरपालिकेसमोर निषेध सभा आयोजित करण्यात आली होती. संपूर्ण देशभर ९ ऑगस्ट हा क्रांती दिन वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. याच दिवशी इंग्रजांना चले जाव म्हणत सर्व भारतीय इंग्रज सरकारच्या जुलमी सत्तेच्या विरोधात एकत्र आले होते. लोकांच्या आंदोलनातून हा देश स्वतंत्र होऊन या देशात संविधान अंमलात आले. नागरिकांना संविधानिक हक्क मिळाले. मात्र सध्या देशात अन्याय, अत्याचार तसेच धार्मिक जातीय द्वेषाचे वातावरण निर्माण केले जात आहे. यामुळे देशाच्या एकात्मतेला आणि संविधानाला धोका निर्माण झाला आहे. त्या विरुद्ध महाराष्ट्रात विविध ठिकाणी आंदोलने चालू आहेत. सध्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी होत असलेल्या असंविधानिक गोष्टींचा निषेध करण्यासाठी पुरंदर तालुक्यातील विविध संविधान प्रेमी व्यक्ती आणि संघटना एकत्र येऊन क्रांती दिनांचे औचित्य साधून निषेध सभा आयोजित करण्यात आली होती.

'पुणे शहरातील कोथरूड पोलिसांनी तीन दलित मुलींना जातिवाचक शिवीगाळ आणि छळ केला त्याबद्दल संबंधित पोलिस कर्मचार्यांवर अॅट्रोसिटी अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात यावी. सध्या महाराष्ट्रात धार्मिक, जातीय सलोख्याचे वातावरण बिघडवून दंगली घडवून आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. संबंधित समाजकंटकांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.भारतीय संविधान आणि राष्ट्रध्वज यांचा अवमान करणार्या संभाजी भिडे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी. विकासाच्या नावाखाली सामान्य शेतकरी कष्टकरी यांचे शोषण आणि विस्थापन करणार्या विध्वंसक प्रकल्पांना आळा घालून त्यांचा सन्मानाने जगण्याचा हक्क अबाधित राखण्यात यावा. संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधने लादणारा जन सुरक्षा कायदा ताबडतोब रद्द व्हावा.' या मागण्या आजच्या या निषेध सभेमध्ये कार्यकर्त्यांनी मांडल्या.
तसेच देशामध्ये लाखोंच्या संख्येने मतदान चोरी झाल्याचे समोर आले तरी याबद्दल न्याय व्यवस्थेने कोणतेही भूमिका घेतली नाही त्यामुळे हा एक मोठा प्रश्न उभा राहत आहे. महाराष्ट्रातील १८ हजार शाळा बंद होणार आहेत म्हणजे आदिवासी जमातीचे डोंगर खोर्यातील मुले शिक्षणापासून वंचित राहणार. सार्वजनिक आरोग्याची स्थिती फारशी वेगळी नाही स्वातंत्र्यानंतर ज्या व्यवस्था मजबूत होणे गरजेचे आहे, त्या सर्व व्यवस्था खिळखिळ्या करून त्याचे खाजगीकरणाच्या दिशेने वाटचालीचे धोरण सरकारकडून स्पष्ट होताना दिसून येत आहे.
मात्र विकासाच्या मुद्याऐवजी धार्मिक द्वेषाचे वातावरण निर्माण करणाऱ्यांवर सरकार आणि प्रशासनाने योग्य ती कायदेशीर कारवाई करून या देशातील संविधानिक हक्कांचे व मूल्यांचे तसेच सामाजिक शांतता आणि सलोखा यांचे रक्षण करावे यासाठी आज वेगवेगळ्या लोकांनी एकत्र येऊन आपले मनोगत मांडले.
यामध्ये काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रदीप पोमण, सचिन दुर्गाडे, आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय कड, संविधान अभ्यासक श्रीकांत लक्ष्मी शंकर, राष्ट्र सेवा दलाचे आतिश जगताप, बाळासाहेब गायकवाड, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे पंकज धिवार, राष्ट्रवादी पक्षाचे रमेश पवार, टेकवडी गावचे उपसरपंच सुरज गदादे, विवेकी युवा मंचचे योगेश धेंडे, देवानंद भालेराव, सामाजिक कार्यकर्त्या साधना महामुनी, जयश्री नलगे तसेच विमानतळविरोधी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्या वैशाली कुंभारकर या सर्वांनी महाराष्ट्रात घडत असलेल्या सर्व संविधानविरोधी घटनांचा निषेध करीत मनोगत मांडले.
Satyashodhak, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan
फुले - शाहू - आंबेडकर