मुंबई, जुलै २०२५: “धार्मिक कट्टरता दूर केल्याशिवाय समाजात सलोखा आणि शांतता प्रस्थापित होणे अशक्य आहे,” असे ठाम मत प्रसिद्ध साहित्यिक आणि ‘मजबुती का नाम महात्मा गांधी’ या पुस्तकाचे लेखक चंद्रकांत झटाले यांनी व्यक्त केले. मूलभूत अधिकार संघर्ष समिती (मास) यांच्या वतीने मुंबईतील ताडदेव येथील जनता केंद्रात आयोजित धार्मिक सलोखा परिषदेत ते बोलत होते. या परिषदेच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ उपस्थित होते.

झटाले यांनी सर्व धर्मांतील कट्टरतेवर भाष्य करताना सांगितले की, धार्मिक द्वेष रोखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. “हिंदू धर्म धोक्यात आहे, असा प्रचार करून समाजाचे मन भटकवले जात आहे. मुघलांनी ७०० वर्षे आणि ब्रिटिशांनी २०० वर्षे राज्य केले, तेव्हा धर्म धोक्यात आला नाही. मग आज, जेव्हा सर्व महत्त्वाच्या पदांवर हिंदूच आहेत, तेव्हा धर्म धोक्यात कसा येऊ शकतो?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. हा केवळ समाजात तेढ निर्माण करणारा प्रचार आहे, असेही ते म्हणाले.
परिषदेच्या अध्यक्षीय भाषणात हर्षवर्धन सपकाळ यांनी शाहू-फुले-आंबेडकर यांचा समतावादी विचार आणि वारकरी संप्रदायाच्या संत परंपरेचा दाखला देत खऱ्या हिंदू धर्माचा गौरव केला. “खरा हिंदू धर्म हा संत परंपरेचा आहे, आणि हे आपण ठामपणे सांगितले पाहिजे,” असे त्यांनी नमूद केले. त्यांनी बहुजन समाजातील संतांनी दिलेल्या समतेच्या संदेशावर भर देत सामाजिक एकतेचे आवाहन केले.
या परिषदेची प्रस्तावना आणि सूत्रसंचालन मूलभूत अधिकार संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष दिनेश राणे यांनी केले, तर उपाध्यक्षा चित्रा राणे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समितीचे अध्यक्ष गिरीश कटारिया, सचिव संग्राम पेटकर, खजिनदार डॉ. यु. व्ही. महाडकर, निरंजनी शेट्टी आणि कार्यकारी मंडळाने विशेष परिश्रम घेतले. या परिषदेने धार्मिक सलोखा आणि सामाजिक एकतेचा संदेश प्रभावीपणे पोहोचवला असून, समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी प्रेरणा दिली आहे.
Satyashodhak, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan
फुले - शाहू - आंबेडकर