वाशीम येथे वंचित बहुजन आघाडीच्या (VBA) संवाद यात्रेच्या निमित्ताने फंक्शन हॉल येथे एक भव्य सभा उत्साहात संपन्न झाली. या सभेत वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या अंजलीताई आंबेडकर यांनी वंचित समूहांना एकजुटीचे महत्त्व पटवून देताना सांगितले, “येणारा काळ अत्यंत आव्हानात्मक आहे. वंचित समूहांनी एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही. जर आपण आता एकजूट दाखवली नाही, तर भविष्यात आपला कोणी वाली राहणार नाही.” त्यांनी जन सुरक्षा कायद्यावर परखड भाष्य करताना वाशीम शहरातील मूलभूत समस्यांवर प्रकाश टाकला.

या सभेचे अध्यक्षस्थान वाशीम विधानसभा मतदारसंघ निरीक्षक आणि प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. तुषार गायकवाड यांनी भूषवले, तर विशेष अतिथी म्हणून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय सचिव आणि वाशीम जिल्हा निरीक्षक, माजी आमदार नतिकोद्दीन खतीब उपस्थित होते. मंचावर वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्ष किरणताई गिहें, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष ज्योतीताई इंगळे, अभिजीत राठोड, महासचिव रंगनाथ धांडे, मार्गदर्शक दत्तराव गोटे, असलम सिद्दिकी, नबी कुरेशी, आयताज भाई मणियार, बाबा भाई, जमील भाई, फिरोज भाई पठाण, आणि जिल्हा प्रवक्ता व बाजार समिती संचालक संदीप सावळे, तसेच युवा तालुकाध्यक्ष गोपाल पारीसकर, गौतम खाडे, आणि भारत भगत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मुस्लिम समाज बांधवांची आणि वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती या सभेला विशेष महत्त्व प्राप्त करून देणारी ठरली.
अंजलीताई आंबेडकर यांनी वाशीम शहरातील गंभीर समस्यांवर भाष्य केले. त्यांनी सांगितले, “नगर परिषद आणि जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडत आहेत, तर खाजगी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळा वाढत आहेत. रस्त्यांची दुरवस्था, पाण्याचा अभाव, आणि स्वच्छतागृहांच्या कमतरतेसारख्या मूलभूत समस्यांविरोधात आवाज उठवण्याची गरज आहे. बुरुजी धरणाची उंची वाढवणे आणि गाळ काढणे आवश्यक आहे, पण प्रशासनाकडून याबाबत कोणतीच हालचाल नाही.” त्यांनी धनदांडग्यांनी जागा बळकावल्याचा मुद्दाही उपस्थित केला आणि या समस्यांविरुद्ध लढण्यासाठी वंचित समूहांनी एकत्र येण्याचे आवाहन केले.
नतिकोद्दीन खतीब यांनी सांगितले की, प्रकाशभाऊ आंबेडकर आणि अंजलीताई आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत (जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद, नगरपंचायत) विजय मिळवण्यासाठी कटिबद्ध आहे. त्यांनी संवाद यात्रेला जिल्हाभरात मिळणारा प्रचंड प्रतिसाद अधोरेखित केला. डॉ. तुषार गायकवाड यांनी अध्यक्षीय भाषणात मुस्लिम समाजाला आवाहन करताना सांगितले, “खुल्या मनाने वंचित बहुजन आघाडीसोबत या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांवर आपली सत्ता प्रस्थापित करूया.” विद्वत्तसभा मुख्य समन्वयक भास्कर भोजने यांनीही समयोचित विचार मांडले.
या सभेचे आयोजन आगामी निवडणुकीच्या तयारीसाठी करण्यात आले होते. गतवेळी वाशीम नगरपरिषदेच्या थेट नगराध्यक्ष निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी काट्याची टक्कर दिली होती, परंतु अल्प मतांनी पराभव स्वीकारावा लागला. यावेळी पक्षाच्या रणनीतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सभेचे सूत्रसंचालन ज्योतीताई इंगळे यांनी प्रभावीपणे केले, तर किरणताई गिहें यांनी उपस्थितांचे आभार मानले. या सभेने वाशीममधील वंचित समूहांमध्ये एकजुटीची आणि सामाजिक बदलाची नवी प्रेरणा निर्माण केली.
Satyashodhak, dr Babasaheb Ambedkar, Bahujan
फुले - शाहू - आंबेडकर