छत्रपती संभाजीनगर, १५ जुलै २०२५ : छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकात आंबेडकरवादी पक्ष आणि संघटनांनी जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात तीव्र आंदोलन करत विधेयकाची प्रती जाळली. सोमवारी दुपारी १:३० वाजता झालेल्या या निषेध सभेत कार्यकर्त्यांनी विधेयक रद्द करण्याची मागणी केली आणि जोपर्यंत ही मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत सर्व आघाड्यांवर लढा सुरू ठेवण्याचा इशारा दिला. आंबेडकरवादी नेत्यांनी या विधेयकाला ‘भाजप सुरक्षा बिल’ संबोधत, यामुळे सरकारला सामाजिक संघटना आणि आंदोलनकर्त्यांवर अंकुश ठेवण्याचे अनियंत्रित अधिकार मिळतील, असा आरोप केला.

या आंदोलनात आंबेडकरवादी नेते आणि कार्यकर्त्यांनी ठामपणे आपली भूमिका मांडली. त्यांच्या मते, दहशतवाद, नक्षलवाद आणि देशविघातक शक्तींना आळा घालण्यासाठी सध्याचे चार कायदे पुरेसे असताना नवीन जनसुरक्षा विधेयकाची गरज नाही. हे विधेयक संविधानाच्या मूलभूत तत्त्वांना धक्का लावणारे आहे आणि सामान्य नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारे आहे. यामुळे सामाजिक चळवळींना दडपण्याचा सरकारचा डाव असल्याचा दावा कार्यकर्त्यांनी केला. या आंदोलनात दिनकर ओंकार, प्रकाश निकाळजे, मिलिंद दाभाडे, गौतम खरात, गौतम लांडगे, बंडू कांबळे, कृष्णा बनकर, विजय वाहूळ, पंकज बनसोडे, विशाल इंगळे, आणि अरविंद कांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले. त्यांनी सरकारच्या या कृतीविरुद्ध एकजुटीने लढण्याचा संकल्प व्यक्त केला.
हा निषेध कार्यक्रम आंबेडकरवादी चळवळीच्या सामाजिक न्याय आणि संविधान रक्षणाच्या लढ्याचा एक भाग आहे. कार्यकर्त्यांनी समाजातील सर्व वर्गांना, विशेषतः वंचित आणि बहुजन समाजाला, या अन्यायकारक विधेयकाविरुद्ध एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. येत्या काळातही अशा निषेध सभा आणि आंदोलने आयोजित करून जनजागृती केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. हा कार्यक्रम छत्रपती संभाजीनगरातील सामाजिक चळवळींना नवे बळ देणारा ठरला असून, संविधानाचे रक्षण आणि सामाजिक समतेच्या लढ्यासाठी आंबेडकरवादी कार्यकर्ते कटिबद्ध असल्याचे दिसून आले.
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan
फुले - शाहू - आंबेडकर