अंजनगाव सुर्जी : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मरणार्थ अंजनगाव सुर्जी येथे भव्य शिवसृष्टी उभारण्याची मागणी जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी केली आहे. ६ जून रोजी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी ही मागणी आमदार गजानन लवटे यांच्याकडे निवेदनाद्वारे मांडली. अंजनगावासारख्या मोठ्या शहरात शिवरायांचा भव्य पुतळा किंवा स्मारक नसल्याने शिवजयंती आणि इतर शिवप्रेरित कार्यक्रमांवेळी शिवप्रेमींना अभिवादनासाठी योग्य जागा उपलब्ध नाही, याकडे जिजाऊ ब्रिगेडने लक्ष वेधले. ही बाब शिवप्रेमींसाठी दुर्दैवी असल्याचे त्यांनी नमूद केले.

जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा सीमा बोके यांनी सांगितले की, शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करून सामाजिक समता आणि स्वाभिमानाचा आदर्श निर्माण केला. त्यांचा हा वारसा जपण्यासाठी अंजनगावात शिवसृष्टी आवश्यक आहे. सध्या अंजनगाव पंचायत समितीची जुनी इमारत रिकामी असून, त्या जागेवर भव्य शिवस्मारक किंवा शिवसृष्टी उभारण्याची मागणी त्यांनी केली. यामुळे स्थानिकांना आणि पर्यटकांना शिवरायांच्या कार्याची प्रेरणा मिळेल, असे त्यांचे म्हणणे आहे. आ. गजानन लवटे यांनी ही मागणी अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगत ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
या प्रसंगी जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश सदस्य स्मिता घोगरे, विभागीय कार्याध्यक्ष मीना कोल्हे, तालुकाध्यक्ष सारिका मानकर, दहिगाव अध्यक्ष सारिका धामोळे, पांढरी अध्यक्ष सुषमा कोकाटे, वैशाली बोडखे, विद्या अरबट, जयश्री देशमुख, अलका बारब्दे, सुनंदा सरोदे, छाया सपाटे, आणि अर्चना दाते उपस्थित होत्या. जिजाऊ ब्रिगेडने शिवसृष्टीच्या उभारणीसाठी स्थानिक नागरिक आणि प्रशासनाच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. ही मागणी शिवप्रेमींमध्ये उत्साह निर्माण करणारी ठरली असून, यामुळे अंजनगावात शिवरायांचा गौरवशाली वारसा जपला जाईल, अशी आशा व्यक्त होत आहे.
Satyashodhak, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan
फुले - शाहू - आंबेडकर