सत्यशोधक समाज आणि समविचारी सामाजिक संघटना वर्धा जिल्हा एकत्रितपणे 'सत्यशोधक कट्टा' हा उपक्रम गेली तीन चार महिने सातत्याने राबवित आहे. या महिन्यात २९ जून २०२५ रविवारी, हनुमान मंदिर, (गव्हाळे यांच्या घरासमोर) जुनी म्हाडा कॉलनी, आय टी आय जवळ, वर्धा याठिकाणी सत्यशोधक कट्टा अंतर्गत वारकरी वारीला समर्पित 'बहुजन समाजाचे शिक्षण व वर्तमान स्थिती' या विषयावर खुली चर्चा घेण्यात आली.

सत्यशोधक कट्टा हा सर्जनशील सत्यशोधकी आकलनाचा नाविन्यपूर्ण प्रबोधनाचा प्रभावी प्रकार आहे. थेट लोकांमध्ये जाऊन लोकांचे मूलभूत प्रश्न घेऊन शोषण व्यवस्थेच्या खोलवरपर्यंत चर्चा करताना या माध्यमातून लोकांशी आंतरिक संवाद घडून येतो. बेरोजगारी, शिक्षण, शेती, आरोग्य, दारिद्र्य, धर्मांधता, जातीयता, कर्मकांड, स्त्रियांच्या शोषणाचे मूलाधार, दैनंदिन भेडसावणाऱ्या समस्याची सार्वजनिक चर्चा, सामाजिक सांस्कृतिक लढे, ऐतिहासिक संघर्ष,महामानवांनी समाजासाठी दिलेले योगदान,सांस्कृतिक अधिष्ठान वगैरेची सार्वजनिक ठिकाणी चर्चा करणे हा या उपक्रमाचा गाभा होय.
मंदिर, चावडी, नगर- गावातील चौकातील पाळावर लोक एकत्र येऊन विविध विषयांवर बोलत असतात. आपल्या भावभावना, सुखदुःख, गावगाडा मोहल्यातील खबरबात पासून तर देशविदेशातील घडामोडींची चर्चा या ठिकाणी अगदी निर्भीडपणे आणि हक्काने होत असते. एका अर्थाने लोकभावनेच्या अभिव्यक्तीचे हे विचारपीठ, सर्वांना आपल्या हक्काचे वाटावे, अशी ही जागा कित्येक वर्षे लोक अनुभवत असतात.

अशा मोक्याच्या ठिकाणी जाऊन दरवेळी नवनवीन विषयांवर मंथन करून मांडणी करुन जनमानसातील अभिव्यक्ती होणे खरं म्हणजे सत्यशोधक कट्ट्याचे एकमेवाद्वितीय वैशिष्ट्ये ठरते. हा प्रयोग अतिशय परिणामकारक, नाविन्यपूर्ण आणि अतिशय प्रभावी पद्धतीने लोकमानस घडवणारा ठरत असल्याचे सिद्ध होत आहे. विभिन्न विषयांवर अनेक नवनवीन ठिकाणी वेगवेगळ्या गाव शहरात याप्रकारे आयोजन करुन सत्यशोधक कट्टा हा नवप्रबोधनाचा नवा आविष्कार निशंकपणे ठरु शकेल.
सत्यशोधक चळवळ स्त्रिशुद्रातिशुद्रांचे हिताची वैचारिक मांडणी करुन खेड्यापाड्यांत तळागाळातील लोकांपर्यंत पोहचलेली लोकचळवळ ठरली. २४ सप्टेंबर १८७३ ला सत्यशोधक समाजाची स्थापना झाल्यानंतर अल्पावधीतच झपाट्याने वेगवेगळ्या ठिकाणी सत्यशोधक समाजाच्या शाखा स्थापन होऊन, सत्यशोधक समाजाच्या तत्वानुसार सातत्याने कार्यक्रम होऊ लागले. सत्यशोधक विधीनुसार लग्ने लावून देणे, शूद्रातिशूद्र मुलांना विद्येची गोडी लावणे, पुरोहिताशिवाय दशपिंड करणे, धर्मभोळ्या बनावट चाली बंद करणे, ब्राम्हणभोजनांऐवजी पंगू अंध थोटे लुळे अशा लोकांस भोजनदान , सत्यशोधक विधीनुसार वास्तुशांती, गरीब होतकरू विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप, गावोगावी विद्यालये स्थापन करणे,गंभीर व ज्वलंत विषयांवर निबंध व वक्तृत्व स्पर्धा आयोजित करणे असे अभूतपूर्व आणि स्त्रीशूद्रातिशूद्र समाजाला आत्मभान देणारे कार्यक्रम राबविण्यात येत असत. सत्यशोधक जलसा या लोककला प्रकाराचा खुबीने वापर, सत्यशोधकी साहित्यिक, विविध ठिकाणी सुरू केलेली नियतकालिके, पत्रव्यहार,दौरे सभा,बैठका अशा लोकसंग्रह वाढवणाऱ्या साधनांचा वापर करून सत्यशोधक चळवळ खऱ्या अर्थाने महाराष्ट्र भूमित लोकांपर्यंत पोहोचणारी पहिली लोकचळवळ ठरली. त्यामुळे लोकप्रबोधनाचा आलेख चढत जाऊन महाराष्ट्रातील सांस्कृतिक शैक्षणिक सामाजिक राजकीय जनजीवन व्यापून टाकत प्रत्येक क्षेत्रात ओबीसी दलित आदिवासी आणि स्रियांचा सहभाग वाढत गेला. प्रबोधनाच्या या वेगवेगळ्या कार्यक्रमात स्त्रिशुद्रातिशुद्र घटक लक्षस्थानी राहिला. त्यांच्यात मिसळून, प्रत्यक्ष त्यांना विविध प्रकारे सहभागी करून अब्राम्हणी तत्वज्ञान विविध कृती कार्यक्रमातून रुजवले जाऊ शकतात याची नितांत सुंदर प्रचिती सत्यशोधक चळवळीच्या वाटचालीतून येते. आणि म्हणून सत्यशोधक कट्टा या सत्यशोधकी प्रबोधन परंपरेला उज्वल करणारा, ऐतिहासिक आणि आधुनिकतेला सांधणारा महत्वपूर्ण दुवा ठरेल.
यावेळी वर्धा शहरात स्थानिक जुनी म्हाडा कॉलनी येथील हनुमान मंदिरात दिनांक २९ जून २०२५ रोज रविवारला सत्यशोधक समाज आणि समविचारी संघटनांच्या वतीने आयोजित केलेल्या सत्यशोधक कट्टा या कार्यक्रमात 'बहुजन समाजाचे शिक्षण व वर्तमान स्थिती' या विषयावर मांडणी करतांना मा.बाबा बिडकर म्हणाले की, शिक्षण म्हणजे फक्त नोकरी मिळविण्याचे साधन नसून चांगले वाईट याची जाण,योग्य अयोग्य याची निवड करण्याचे सामर्थ्य मानवात निर्माण करण्याची किल्ली आहे. आपल्या हक्कासाठी लढण्याचे बळ शिक्षणातून निर्माण झाले पाहिजे. लोकसंख्या प्रमाणात सर्व जातींच्या समान समावेशाचा म्हणजेच खऱ्या समतेचा आग्रह धरण्याचे धाडस शिक्षणातून मिळाले पाहिजे. शिक्षणाने आपला आत्मसन्मान जागृत व्हावा यासाठी महात्मा फुले यांनी शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाचा पाया घातला. शोषण व्यवस्थेच्या विरोधात संघर्ष करणारे मुक्ता साळवे, ताराबाई शिंदे,तानुबाई बिरजे यांच्या सारखे व्यक्तित्व शिक्षणातून निर्माण व्हावेत असे त्यांना अपेक्षित होते. संवेदनशील व्यक्तिमत्त्व निर्माण करून विषमतावादी व्यवस्था नष्ट करणे हा शिक्षणाचा उद्देश आहे.१९८६ च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या गाभाभूत घटकात याची नोंद आहे. शहरी ज्ञानाला अधिक महत्त्व देणारी शिक्षणव्यवस्था ग्रामीण शेतकरी, कामगार मुलांना मागे ठेवण्यास कारणीभूत ठरते. म्हणून बुद्धीमत्ता तपासताना ग्रामीण ज्ञानाचा शिक्षणात पन्नास टक्के समावेश असला पाहिजे, असेही ते याप्रसंगी म्हणाले.
कार्यक्रमाची भूमिका मांडताना मा.अनुज हुलके यांनी बहुजनांच्या शिक्षणाला सत्यशोधक वारसा असून, महात्मा फुलेंनी बहुजनांच्या शिक्षणाला सुरुवात केली.शिक्षण सक्तीचे व मोफत करण्याच्या मागणीपासून तर शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरण टप्प्यापर्यंतच्या वाटचालीत सत्यशोधक चळवळीचे अमूल्य योगदान आहे. तर राजर्षी शाहू महाराजांनी ब्राम्हणेतरांकरीता पन्नास टक्के आरक्षण सुरू केले व शिक्षणाची आवड निर्माण व्हावी म्हणून प्रयत्न केले. सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला. जे पालक मुलांना शाळेत पाठवणार नाही, त्यांना दंड व शिक्षेची तरतूद केली. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचा मूलभूत अधिकार राज्यघटनेच्या तरतुदीनुसार मिळवून दिला,असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले प्रा.शेख हाशम सर म्हणाले की नवीन शैक्षणिक धोरणात जीवनाशी निगडीत बाबींना दुय्यम स्थान आहे तर ज्याचा जीवनाशी दूर दूर पर्यंत संबंध नाही अश्या गोष्टींना प्राधान्य देण्यात आले आहे. हे समजून घेण्यासाठी आज या विषयावर विचारमंथन झाले ही खूप महत्वाची बाब आहे. उपस्थित बंधुभगिनींनी हा विचार समजून घ्या असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे संचालन मा.कपिल थुटे यांनी केले. तर आभार प्रदर्शन अॅड.नंदकुमार वानखेडे यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन डॉ.अशोक चोपडे, प्राचार्य जनार्दन देवतळे, राजेंद्र कळसाईत, पदंम ठाकरे, अशोक सावरकर, प्राचार्य मिलिंद सवाई, गुलाबराव गव्हाळे, अर्चना भोमले, सोनाली कोपुलवार, रवींद्र सातोकर, प्रा.सतीश धवड, मनोज कोरडे, रवींद्र लवणे, अभिजित भेंडाले यांनी केले.कार्यक्रमाला परिसरातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते.
सत्यशोधक कट्टा हा उपक्रम यापुढेही दरमहा वर्धा शहरात सुरु राहिल. नजिकच्या काळात इतर शहरांमध्ये आणि विविध ठिकाणी सत्यशोधक कट्टा विस्तारत जाईल. यासंबंधी विचारमंथन सुरू झालेले आहे. ही अभिनंदनीय बाब आहे. सत्यशोधक कट्टा आयोजकांबद्दल कृतज्ञता आणि आभार...!
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan
फुले - शाहू - आंबेडकर