जळगाव: चाळीसगाव येथील हंस चित्रपटगृहात नुकताच महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीमाई फुले यांच्या प्रेरणादायी कार्यावर आधारित चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने समाजसुधारणेचा एक अनमोल वारसा रसिक प्रेक्षकांसमोर मांडला. कार्यक्रमाचा शुभारंभ जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाचे संचालक प्रमोद बापू पाटील यांच्या हस्ते प्रतिमापूजनाने झाला. यावेळी त्यांच्यासह सतीश महाजन, प्रा. गौतम निकम, उद्धव महाजन, आणि गोकुळ पाटील यांनी उपस्थितांना संबोधित करत फुले दांपत्याच्या कार्याचा गौरव केला.

प्रा. गौतम निकम यांनी प्रेक्षकांना महात्मा जोतीराव फुले, सावित्रीमाई फुले आणि सिंधिया फरार यांच्या कार्याचा परिचय करून देणारी पुस्तके सप्रेम भेट दिली. या पुस्तकांमुळे प्रेक्षकांना फुले दांपत्याच्या सामाजिक क्रांतीच्या योगदानाची सखोल माहिती मिळाली. चित्रपटातून महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षण, जातिव्यवस्थेविरुद्ध लढा, आणि सत्यशोधक समाजाची स्थापना यांसारख्या कार्यांचा प्रभावीपणे चित्रण करण्यात आले आहे. यामुळे प्रेक्षकांना सामाजिक प्रबोधनाची नवी प्रेरणा मिळाली, असे उपस्थितांनी व्यक्त केले.
या प्रसंगी प्रा. चंद्रकांत ठाकरे, मुकेश शेतकरी, अमोल मोरे, प्रा. एस. डी. महाजन, मिलिंद भालेराव, भीमराव खलाणे, योगेश्वर राठोड, अशोक राठोड, सुनील गढरी, भगवान रोकडे, आप्पा महाराज, उल्हास पाटील, आणि टाकळी प्रचारचे माजी सरपंच कविता महाजन यांच्यासह अनेक रसिक प्रेक्षक उपस्थित होते. प्रेक्षकांनी चित्रपटातील ‘शेतकऱ्याचा आसूड’ आणि ‘गुलामगिरी’ यांसारख्या साहित्यकृतींच्या आधारावर मांडलेल्या सामाजिक संदेशाचे कौतुक केले.
हा चित्रपट फुले दांपत्याच्या सत्यशोधक चळवळीचा आणि त्यांच्या क्रांतिकारी विचारांचा गौरव करतो. चित्रपटाने समाजातील प्रत्येक स्तरातील प्रेक्षकांना सामाजिक समता आणि शिक्षणाच्या महत्त्वाची जाणीव करून दिली. अशा चित्रपटांमुळे नव्या पिढीला महात्मा फुले यांच्या विचारांचा वारसा समजण्यास मदत होईल, अशी आशा उपस्थितांनी व्यक्त केली.
Satyashodhak, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan
फुले - शाहू - आंबेडकर