- हिरालाल पगडाल, संगमनेर
भारतात अनेक स्त्री राज्यकर्त्या होऊन गेलेल्या आहेत, परंतु त्यापैकी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या एकमेव अशा राज्यकर्त्या होत्या की, ज्यांनी शस्रांचा कमीतकमी वापर व जास्तीतजास्त लोककल्याणकारी कार्य केले. अहिल्याबाईंना 'पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर' या नावाने संबोधले जाते.

पुण्यश्लोक अहिल्याबाई यांचा जन्म ३१ मे १७२५ रोजी चोंडी ता. जामखेड, जिल्हा अहमदनगर येथे झाला. त्यांचे वडील माणकोजी शिंदे हे चोंडीचे पाटील होते. पेशव्यांचे सुभेदार मल्हारराव होळकर चोंडी मार्गे पुण्याला जात असतांना आठ वर्षाची चिमूरडी अहिल्या त्यांना दिसली. तिचा चुणचुणीतपणा व बाणेदारपणा त्यांना भावला. त्यांनी आपला मुलगा खंडेरावाकरिता माणकोजीकडे अहिल्येसाठी मागणी घातली. वयाच्या आठव्या वर्षी १७३३साली अहिल्याबाईचे लग्न खंडेराव होळकरांसोबत झाले.
सुभेदार मल्हारराव होळकर व त्यांची पत्नी गौतमीबाई यांनी अहिल्याबाईतील गुणवत्ता व कर्तबगारी हेरली होती. त्यामुळे त्या उभयतांनी तिला खूप प्रेम दिले, प्रोत्साहन दिले, तिला राज्यकारभारातही सामावून घेतले. अहिल्याबाई यांचे पती खंडेराव होळकर यांच्या कर्तुत्वाचे पुरावे इतिहासात फारसे आढळत नाहीत. खंडेराव व अहिल्याबाई यांना एक मुलगा व एक मुलगी असे दोन अपत्ये झाले. मुलाचे नाव मालेराव व मुलीचे नाव मुक्ताबाई होते. राघोबा दादा पेशवे यांनी मुघल बादशहा शाहआलमची बाजू घेऊन सुरजमल जाटाचा बंदोबस्त केला. त्यासाठी कुंभेरीच्या किल्ल्याला वेढा घातला. त्यात राघोबा दादा यांच्याबरोबर सुभेदार मल्हारराव होळकर आपल्या फौजेनिशी सहभागी होते. सुरजमला जाट वाटाघाटीला तयार झाला, त्याने चाळीस लाखाची खंडणी देऊ केली, परंतु राघोबादादा मुत्सद्देगिरीत अपुरे पडले. त्यांनी एक कोटीच्या लालसेपायी वेढा चालूच ठेवला. वाटाघाटी फिस्कटल्या, युद्ध झाले आणि युद्धात १९ मार्च १७५४ रोजी अहिल्याबाईंचे पती खंडेराव होळकरांना बंदुकीची गोळी लागली व त्यात त्यांचे निधन झाले. होळकरांवर आकाश कोसळले. दौलतीचा एकुलता एक वारस हरपला. खंडेराव होळकरांसोबत त्यांच्या इतर बायका सती गेल्या. अहिल्याबाई देखील सती जाण्यास निघाल्या परंतु मल्हारराव होळकरांनी तिला रोखले, "तूच माझा खंडू आहेस, बाई मला उन्हाळा करतेस की काय" असे भावनिक आवाहन करून त्यांनी अहिल्याबाईला सती जाण्यापासून परावृत्त केले.
मल्हारराव होळकरांकडे उत्तरेची सुभेदारी होती. त्यानिमित्त त्यांना सतत मुलुखगिरी करत फिरावे लागे. त्यांच्या गैरहजेरीत दौलतीचा सर्व कारभार अहिल्याबाई कडे सोपवण्यात आला होता. अहिल्याबाई करारी होत्या. त्यांनी लोकाभिमुख कारभार केला. त्यांना सासू गौतमीबाई आणि सासरे मल्हारराव यांचा भक्कम पाठिंबा होता. सुभेदार मल्हारराव होळकर वेळोवेळी लेखी पत्र पाठवून अहिल्याबाईंना योग्य त्या सूचना देत होते. सरकारी आज्ञापत्रही अहिल्याबाईंच्या नावाने निघत होते. दोन मुलांचा सांभाळ व दौलतीचा कारभार यात अहिल्याबाई गुंतून गेल्या होत्या तोच त्यांच्यावर पुन्हा एक संकट आले मातेसमान प्रेम करणारी सासू गौतमीबाई यांचे २९ सप्टेंबर १७६१ रोजी वयाच्या ६६ व्या वर्षी निधन झाले. अहिल्याबाईंना परम दुःख झाले. त्यानंतर पाच वर्षांनी २० मे, १७६६ रोजी सुभेदार मल्हारराव होळकर यांचे वृद्धापकाळाने वयाच्या ७३ व्या वर्षी देहावसान झाले, अहिल्याबाईचे छत्रच उडून गेले. मुलगा मालेराव यांना पेशव्यांनी सुभेदारीची वस्त्रे दिली. मालेराव एकांगी पध्दतीने कारभार करू लागले. दासीशी संबंध आहेत अशा संशयावरून जरीकाम करणाऱ्या एका कारागिराला त्यांनी देहांताची सजा केली. आपले हे कृत्य चुकले या भ्रमातच त्यांचा मनस्ताप वाढला. त्यांची मनःशांती ढळली. २७ मार्च १७६७ रोजी अवघ्या २२ व्या वर्षी मालेराव मरण पावले. होळकर दौलतीपुढे नवे संकट उभे राहिले. दौलतीला पुरुष वारस नव्हता. मोठा पेच उभा राहिला, परंतु दौलतीची जनता व सैन्य यांच्या मागणीनुसार पेशव्यांनी दौलतीचा कारभार अहिल्याबाई कडे सोपवला. अहिल्याबाईंनी तुकोजी होळकर यांना आपला सेनापती नेमला व दौलतीचा कारभार स्वतः पाहू लागले. त्यांनी कारभार हाती घेतला तेव्हा ७४ लाख वार्षिक उत्पन्नाचा मुलुख व १६ लाख रोकड धनाची मालकी त्यांच्याकडे आली.
अहिल्याबाईचा राज्यकारभार हा आदर्श राज्य कारभाराचा एक नमुना आहे. त्यांनी जास्तीतजास्त लोककल्याणकारी कामे केली. अहिल्याबाईंना आत्मस्तुती आवडत नसे. त्यांची स्तुती करणाऱ्या हरिपंत नावाच्या कवीला त्यांनी फटकारले आणि ईश्वर स्तुती, समाजाची सुख दुःख यासाठी आपली प्रतिभा खर्ची घाला असे सुनावले.
अहिल्याबाई सर्व जाती धर्माच्या लोकांशी समान न्यायाने वागल्या. त्यांचा विश्वास संपादन केला. अहिल्याबाईच्या कारभारामध्ये नियोजन व सत्ता विकेंद्रीकरणाचे सूत्र होते. गोविंदपंत नातू , विसाजी शामराव देशपांडे, नारोशंकर रांझेकर, शिवाजी गोपाळ, शरीफभाई, भारमल दादा होळकर इत्यादी कडे त्यांनी निरनिराळी खाती सोपवली.
त्यांच्या काळात इतर राजे मुलुखगिरी करून युद्ध करून खंडणी मिळवीत किंवा दुसऱ्याच्या राज्यातील प्रजेची लूट करून संपत्ती जमा करीत, परंतु हा मार्ग अहिल्याबाईंनी स्वीकारला नाही त्यांनी आपल्या प्रजेचे परकीय शत्रूपासून संरक्षण केले. राज्यात शांतता व व्यवस्था ठेवण्यात धन्यता मानली. सर्व जाती-धर्माच्या लोकात विश्वास निर्माण करून राज्यात उद्योग व व्यवसायाला प्रोत्साहन दिले, न्याय्य व लोकांना परवडेल असा कराचा दर आकारला. भिल्ल व गोड जातीचे लोक लुटालूट करून पोट भरत, त्यांना प्रवाशांकडून राज मार्गाने 'भिलकवडी' नावाचा कर वसूल करण्याचा अधिकार दिला. त्यांना शेतजमिनीचे पट्टे मालकी हक्काने देऊन एका ठिकाणी स्थिर केले व त्यांचे पुनर्वसन केले.
गावोगावी न्यायदानाची व्यवस्था, पोलीस व्यवस्था, पोस्टाची व्यवस्था, रस्ते, वृक्षलागवड, पाणवठे, धर्मशाळा यांची व्यवस्था करून लोकाभिमुख कारभार केला. अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकातील इतिहासाची पाने चाळली तर त्यांना 'गंगाजल निर्मळ मातोश्री अहिल्याबाई होळकर' या नावाने संबोधले जात होते.
पारंपरिक पध्दतीने विचार केला तर राज्यकर्त्यांची जबाबदारी त्यांच्या राज्यापुरती सिमीत असते. अहिल्याबाईंनी लोककल्याणकारी कार्य करतांना आपल्या राज्याच्या सीमा कधीच आडव्या येऊ दिल्या नाहीत. त्यांनी संपूर्ण भारतात दक्षिणेकडील रामेश्वर पासून उत्तरेकडील केदारनाथ पर्यंत, पश्चिमेकडील सोरटी सोमनाथपासून पूर्वेकडील आसामच्या कामाख्या मंदिरापर्यंत लोककल्याणकारी कामे केली. त्यांनी चारी धाम, बारा ज्योतिर्लिंग या शिवाय शेकडो तीर्थक्षेत्रात आवश्यक तेथे मंदिरांचा जीर्णोद्धार केला. देशात सर्वदूर हजारो खेड्यापाड्यात, शहरात, तीर्थक्षेत्री असंख्य विहिरी खोदल्या, तलाव, बंधारे ,बारव बांधले,देशातील छोट्या मोठया नदी काठी घाट बांधले. त्यात काशी नाशिक, उज्जैन, हरिद्वार या चारही कुंभमेळा तीर्थस्थळांचा समावेश आहे. अनेक ठिकाणी रस्ते बांधले, रस्त्याच्या कडेला झाडे लावली, धर्मशाळा बांधल्या. सुमारे अडीचशे तीनशे वर्षांपूर्वी बांधलेल्या या विहिरी, बारव, बंधारे, घाट, देऊळ,धर्मशाळा इ. आजही चांगल्या आणि मजबूत स्थितीत आहेत, हि सगळी कामे अहिल्याबाईंच्या लोकोपयोगी, कल्याणकारी आणि दर्जेदार कामाची प्रचिती देत आहेत. हि कामे करतांना त्यांनी होळकरांच्या राजकोशातून फुटकी कवडी देखील खर्च केली नाही. सगळा खर्च त्यांनी आपल्या खाजगीतून केला.
अहिल्याबाईंनी स्त्री सबलीकरण महत्वाचे मानले, त्यांनी हुंडा पध्दतीला विरोध केला. त्यांनी मुलींना लष्करी शिक्षण दिले. स्रियांची लष्करी तुकडी उभी केली. विधवा स्रियांना दत्तक विधान करण्यास मुक्तपणे परवानगी दिली. पडदा पध्दती बंद करण्याचा प्रयत्न केला. अहिल्याबाईंनी अंधश्रद्धा आणि श्रध्दा यात फरक केला. श्रध्दा बाळगतांना अंधश्रध्दा बळावणार नाही याची काळजी घेतली.
अहिल्याबाई प्रजाहितदक्ष राज्यकर्ती होती, प्रजेच्या हितातच राज्याचे हित असते,याची त्यांना जाणीव होती म्हणून दुष्काळात प्रजेला सरकारी कोषातून मदत केली. रिकाम्या हातांना काम, जनावरांना चारा, पक्षांना दाणा, वाटसरूंना निवारा यासाठी प्रयत्न केला.
अहिल्याबाईंनी पेशवे आर्थिक अडचणीत असतांना पेशव्यांना आर्थिक रसद पोहचवणे आपले कर्तव्य आहे अशी भूमिका घेतली . त्याच पेशव्यांनी जेंव्हा महेश्वरवर सशस्त्र चाल करण्याचा छुपा प्रयत्न केला तेंव्हा अहिल्याबाईंनी राघोबादादा पेशवे यांना ज्या भाषेत ताकीद दिली त्यात अहिल्याबाईंची मुत्सद्देगिरी दिसून आली.
होळकरांची राजधानी इंदूरहून महेश्वरला हलवली. महेश्वर नगर वसवले. लोकांना कामधंदा मिळावा यासाठी महेश्वरमध्ये कापडाची बाजारपेठ वसवली, विणकाम उद्योगास प्रोत्साहन दिले. बाहेरून कुशल प्रशिक्षक व नवीन तंत्रज्ञान आणले. महेश्वरची साडी आजही जगात प्रसिध्द आहे. निरनिराळ्या क्षेत्रातील कारागिरांच्या अडचणी सोडवण्यासाठी पुढाकार घेतला. राज्यात कायदा व सुव्यवस्था चोख ठेवली. गुन्हेगारी करणाऱ्यांना हक्काचा रोजगार देऊन त्यांना गुन्हेमुक्त जगण्याची व्यवस्था केली. अनेक कलावंत,शाहीर यांना आश्रय दिला. संगमनेरचे सुप्रसिद्ध कवी अनंत फंदी यांनाही त्यांनी राजाश्रय दिला.
अहिल्याबाई कुशल प्रशासक होत्या. त्यांनी दौलतीचे उत्पन्न ७४ लाखाहून एक कोटी पर्यंत नेले. अहिल्याबाई दिसायला साध्या होत्या, सावळ्या रंगाच्या होत्या, त्यांच्या चेहऱ्यावर तेज होते, त्यांचे डोळे तेजस्वी होते. राज्यकर्ती असूनही त्यांची राहणी साधी होती. त्या घोंगडीवर बसून राज्यकारभार करीत असत. त्यांनी अंगावर दागदागिने घातले नाहीत. साधी पांढरी साडी नेसून कारभार केला. त्या प्रजेला सहज उपलब्ध होत होत्या. आपण स्त्री असल्याचा कोणताही न्यूनगंड त्यांच्या मनात नव्हता. त्या परखड होत्या. राघोबा दादा पेशवे, महादजी शिंदे, गंगोबातात्या चंद्रचूड यांसारख्या दिग्गजांना त्यांनी मुत्सद्देगिरीच्या बळावर नमवले. आपला सेनापती तुकोजी यालाही त्यांनी कधी मनमानी करू दिली नाही, त्यालाही नियंत्रणात ठेवले. फौजेच्या सहाय्याने रामपुऱ्यांचे चंद्रावंतांचे बंड मोडून काढले. मनरूपसिंग डाकूला फाशीची शिक्षा दिली. प्रसंगी हातात शस्त्र घेण्यास त्या कचरल्या नाहीत. त्यांचा नातू मुलीचा मुलगा नथोबा क्षयरोगामुळे वयाच्या २३ व्या वर्षी १५ नोव्हेंबर १७९० रोजी मरण पावला. जावई यशवंतराव फणसे ३/११/ १७९१ रोजी अचानक वारले. त्यांची प्रिय मुलगी मुक्ताबाईहिने अहिल्याबाईचा विरोध डावलून नवऱ्याबरोबर सती जाण्याचा निर्णय घेतला. आईच्या पश्चात विधवा म्हणून जीवन कठीण असल्याचे कारण देत मुक्ता सती गेली. यासर्व घटनाानंतरही अहिल्याबाईंनी शोक आवरून धीरोदात्तपणे कारभार सांभाळला. जवळजवळ २८ वर्षे यशस्वी राज्यकारभार केला. तिचे वर्तन चारित्र्यसंपन्न होते. मोगल, निजाम, पेशवे, शिंदे, राजपूत सर्वच अहिल्याबाईचा आदर करीत. अहिल्याबाईंनी जो लोककल्याणकारी राज्यकारभार केला त्यामुळे त्या संपूर्ण भारतदेशातील आदर्श स्त्री राज्यकर्त्या बनल्या. त्यांचा मृत्यू वृद्धापकाळाने १३ ऑगस्ट १७९५ रोजी झाला.
हे वर्ष अहिल्याबाईं होळकरांचे त्रिजन्म शताब्दीचे आहे. त्या निमित्ताने त्यांच्या स्त्री शक्तीचा जागर करून त्यांना वंदन करू या.
- हिरालाल पगडाल, संगमनेर, ९८५०१३०६२१
Satyashodhak, Bahujan
फुले - शाहू - आंबेडकर