लेखक : Adv. प्रदीप ढोबळे BE BA MBA PGDHRL LL.M. 9820350758
फुले हा सिनेमा 11 एप्रिल ला संपूर्ण भारतात रिलीज होणार होता, परंतु काही मनूवादी संघटनांनी याचा विरोध केल्यामुळे या सिनेमाचे प्रदर्शन 15 दिवसाने लांबणीवर टाकण्यात आले. जातीवादी संघटनेच्या दबावास बळी पडून यातील काही प्रसंगास सेंसर बोर्डाने कात्रीसुद्धा लावली. परंतु ह्या द्वारे एक महत्त्वाचा मुद्दा आपल्या समोर आला, की आजही. मनूवादी शक्ती आपली मनमानी करू इच्छितात आणि सरकार ही त्यास बळी पडते. मुळातच ह्या शक्तींचा अभिव्यक्ति व विचार करण्याच्या स्वातंत्र्याला विरोध आहे. ह्या विरोधकांनी त्यांच्या समाजातील काही महिलांना समोर केले; तेव्हा मला बाबासाहेबांच्या आयुष्यातील एक प्रसंग आठवला. ज्या वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशातील महिलांच्या उत्थानासाठी हिंदू कोड बिल तयार केले होते; त्यास विरोध करण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात महिलांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे घर घेरले. हिंदू धर्मात ढवळाढवळ नको असे त्यांचे म्हणणे होते. बाबासाहेबांनी महिलांच्या शिष्टमंडळाला घरी बोलवले आणि विचारले की तुम्ही हा विरोध कुणाच्या म्हणण्यावरून करता? चर्चेअंती त्यांनी सांगितले की हे आम्हाला आमच्या घरातील पुरुषमंडळीनी सांगितले आहे. तेव्हा बाबासाहेब म्हणाले, पुरुष मंडळी असे करणारच ; कारण ह्या हिंदू कोड बिलद्वारे मी स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीचे अधिकार दिले आहे. परंतु तुम्ही शिकलेल्या स्त्रिया आहात; तुम्ही स्वतः हिंदू कोड बिल काय आहे याचे वाचन केले आहे का? त्यावेळेस त्या सर्व महिलांनी नकारार्थी मान हलवली. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या महिलांनी सांगितले; की हिंदू कोड बिल मुलतः या देशातील पुरुषसत्ताक व्यवस्था नष्ट करण्यासाठीचा; स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा व समानतेचा जाहीरनामा आहे. ह्या द्वारे भारतातील तमाम स्त्रियांना पुरुषांएवढे अधिकार व हक्क मिळत आहेत. आई वडिलांच्या संपत्तीत मुलीना, मुला एवढाच बरोबरीचा हिस्सा मिळणार आहे. एखादे मूल दत्तक घ्यायचे झाल्यास पतीस पत्नीची पूर्ण परवानगी घ्यावी लागेल. अनेक पुरुष लग्न करून स्त्रियांचा वापर करून सोडून देतात; त्यांना तसे करता येणार नाही. त्यांना कायद्याने त्या स्त्रीचे पालन पोषण करावे लागेल; पोषण भत्ता द्यावा लागेल. योग्य कारणांनीच स्त्रीला सोडचिठ्ठी देता येईल. त्यानंतर त्यांचा विरोध मावळला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदामंत्री म्हणून जो राजीनामा दिला आहे त्याचे एक प्रमुख कारण म्हणजे हिंदू कोड बिल लावण्यास नेहरू सरकारची टाळाटाळ. नेहरूनची इच्छा असून ही, पुरुषसत्ताक हिंदू मानसिकतेचा जो विरोध होता त्यापुढे ते हतबल होते. पुढे चार पांच वर्षात टप्प्याटप्प्याने हिंदू कोड बिल लागू झाले. आज ही स्थितीत फक्त थोडाफार फरक पडलेला आहे. आज ही फुले सिनेमाचा विरोध करताना स्त्रियांचाच वापर करण्यात आला.
पण काय आजची स्त्री विचार करणार नाही ? फुले दाम्पत्यानी दीडशे वर्षा आधी भारतात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ केली. काही अज्ञानी ओबीसी संघटना नी सुद्धा ह्या सिनेमाचा सुरुवातीला विरोध केला होता; त्यांचे म्हणणे होते महात्मा फुलेचा ‘फुले’ असा एकेरी नाम उल्लेख आम्हास मंजूर नाही. इथेही पुरुषी मानसिकताच. त्यांच्या मते जे काही काम झालेले आहे; ते सर्व महात्मा फुल्यानी केले आहे. सिनेमाचे ब्राह्मण निर्माते महादेवन ह्यांनी ह्यावर योग्य युक्तिवाद केला की; सिनेमा फक्त महात्मा फुले वर नाही; तर सावित्री बाई वर सुद्धा आहे. फुले ह्या नावात दोघे ही येतात, म्हणजे एकूणच आम्ही सारे पुरुषी मानसिकतेचे बळी आहोत. आजपासून 150 वर्षे आधी महात्मा ज्योतिबा फुलेची जी स्त्रीविषयक मानसिकता होती; ती आज तरी आमच्यात आली आहे का ? उत्तर आहे नाही; काही अपवाद सोडल्यास. ज्या काळात घरच्या मंडळी समोर लग्न झालेल्या बायकोशी बोलणे कठीण होते; त्यावेळेस महात्मा फुलेनी स्त्रियांना शिकविणे ही असंभव गोष्ट होती. त्यामुळे हे काम फक्त सावित्रीच करू शकते हे ज्योतिबा जाणून होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्या आंगणात सावित्री नावाच एक रोपट लावला; त्या सोबत फातिमा नावाची एका मित्राची बहीण .. सावित्री नावाच हे रोपट एक वटवृक्ष झाल; की ज्या वटवृक्षाच्या छायेत आज भारतातील तमाम महिला वर्ग विसावला आहे. आजच्या भारतीय महिलांनी हे स्वीकारव की नाही ? ह्या ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु आज ती सुशिक्षित आहे, शिक्षित आहे. यासाठीचे एक प्रमुख कारण सावित्रीबाई फुले ह्या आहेत. आणि हे सर्व करीत असताना त्यांना फार मोठा संघर्ष करावा लागला. लोकांच्या शिव्या शाप, प्रसंगी शेण दगडांचा मारा ही त्यांनी सहन केला ; परंतु आपल्या ध्येयापासून त्या तसूभर ही हलल्या नाहीत; आणि आजची शिकलेली महिला म्हणते – मला सिनेमा तर बघायचा आहे ; पण कोणी सोबत असले पाहिजे. महिलांनो लक्षात ठेवा; घरचा पुरुष तुमच्यासोबत हा सिनेमा बघायला येणार नाही. कारण ना त्याला फुले बनायचे आहे ; ना त्याला त्याच्या घरात सावित्री निर्माण करायची आहे. आहे ती पुरुषसत्ताक व्यवस्था त्याला टिकवायची आहे. काल मी यूट्यूबवर एक दिल्लीची न्यूज बघितली. वीस पंचवीस महिला फुले सिनेमा बघावयास आल्या होत्या. त्या म्हणत होत्या : आमचे नवरे नोकरी करितात; त्यामुळे त्यांना वेळ नाही असे म्हणत होते; परंतु आम्ही तर घर गृहिणी, मग आम्हीच ठरविले आणि असे ग्रुपणी सिनेमा बघावयास आलो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात गुलामांना कळतच नाही की ते गुलाम आहेत; म्हणून गुलामाला गुलामीची जाणीव करून देणे फार गरजेचे असते, जाणीव झाल्यास तो बंड करून उठतो.
ओबीसी सेवा संघाच्या राज्य अधिवेशनात प्रत्येक पुरुषाने आपल्या पत्नीला सोबत आणावे अशी ताकीद अध्यक्ष ह्या नात्याने मी सर्वांना देत असे. तेव्हा काही पुरुष मंडळी असे म्हणायची की आपण-आपणच सुधार करू या. आपण कशाला महिलांना सोबत घेऊन यावे? माझ्या एका सहकारी कार्यकर्त्याची बायको दिवस रात्र देवासमोर बसून पूजापाठ करीत असे. मित्रास म्हटलं की उदबत्ती लावणे, थोडा वेळ नामस्मरण करणे ठीक आहे; पण तुझी बायको दिवसभर देवासमोर बसून राहते हे काही मला बरे वाटत नाही; तर तेव्हा तो म्हणाला : ती दिवसभर देवांसोबत राहते, म्हणून तर मी पाहिजे तसा तुझ्या सोबत बाहेर चळवळीसाठी येऊ शकतो आणि आपण आपल्या मनाने वागू शकतो. आपल्या महिलांना जास्त जागरूक करणं म्हणजे आपल्यासाठी डोकेदुखी. आजही हा पुरुषी विचार अनेक घरांमध्ये आहे.
त्या मूळे आता महिलांनी आपल्या सोसाइटी किंवा परिसरातील काही मैत्रिणीनं सोबत घेऊन हा सिनेमा बघितलं पाहिजे.. हा सिनेमा फक्त जातिव्यवस्थेविरुद्ध नाही तर स्त्री पुरुष विषमतेविरुद्ध आहे. आणि भारतातील तमाम महिलानी ठरविले तर उद्या हा पिक्चर करोडो रुपये जमा करायला लागला तर भारतामध्ये स्वतःहून झालेली ही रक्तहीन क्रांति असेल. क्रांती करण्यासाठी काही हातात तलवार घ्यावी लागते किंवा मोर्चे काढावे लागतात असे नाही. हिम्मत करा आणि सिनेमा बघा. सावित्रीमाई चे ऋण फेडण्यासाठी म्हणून का होईना ? सिनेमा बघायला जा. हा सिनेमा जेव्हा 500 कोटीचा विक्रम तोडेल; त्या दिवशी या देशामधील पुरुषसत्ताक मानसिकता नष्ट झालेली असेल. भारतीय महिलांनी-मुलीनी या सिनेमाला फक्त सिनेमा म्हणून न बघता, स्त्री पुरुष समानतेसाठीची रक्तहीन सामाजिक क्रांती समजून हा सिनेमा उचलून धरला पाहिजे. सावित्री बाईने आपलं संपूर्ण आयुष्य स्त्रीवर्गाच्या उन्नतीसाठी दिल; काय आपण दोन तास आणि 200 रुपये खर्च करू शकत नसू? तर मला असं वाटतं यापेक्षा अधिक मोठे दुर्दैव या देशातील महिलांचे काय असणार ?
जय फुले जय भारत जय संविधान
Satyashodhak, Mahatma phule, Rajarshi Chhatrapati shahu maharaj, dr Babasaheb Ambedkar, Bahujan, Savitri Mata Phule