गडचिरोली - अक्षय तृतीयासारख्या सोनियाच्या दिवशी देशभर ओबीसीसह सर्व जातींची जातनिहाय जनगणना करण्याचा ऐतिहासिक निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने घेतल्याबद्दल राष्ट्रीय ओबीसी महासंघ जिल्हा गडचिरोलीच्या वतीने स्वागत करून अभिनंदन करण्यात आले आहे.
ओबीसींच्या सर्व समस्यांचे मूळ हे ओबीसींच्या जनगणनेत दडलेले आहे. ओबीसींची आकडेवारी शासनाकडे उपलब्ध नसल्यामुळे ओबीसींची सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक सुधारणा करण्यासाठी निधीची व विविध योजनांची उपलब्धता केंद्र व राज्य सरकारला करता येत नव्हती. यासाठी ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्यात यावी, म्हणून राष्ट्रीय ओबीसी महासंघाने व इतर ओबीसी संघटनांनी विविध आंदोलनाच्या माध्यमातून शासनावर दबाव वाढविला होता. तसेच विरोधी पक्षाने सुद्धा या मुद्द्यासाठी केंद्र सरकारवर दबाव वाढवला होता. राष्ट्रीय ओबीसी महासंघाने पहिल्या राष्ट्रीय अधिवेशनापासूनच जातनिहाय जनगणना हा कळीचा मुद्दा बनविला होता. ७ ऑगस्ट २०२५ रोजी गोवा येथे होणाऱ्या ओबीसी महा अधिवेशनात सुद्धा हा मुद्दा अधिक तीव्रतेने छेडण्याचा पुणे येथे २७ एप्रिल रोजी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या संपन्न झालेल्या महाबैठकीत निर्णय घेण्यात आला होता.
जातनिहाय जनगणना करण्याचा केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत व सरकारचे अभिनंदन करण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने संत जगद्गुरू तुकोबाराय सार्वजनिक वाचनालय येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा त्यांचे संपूर्ण मंत्रिमंडळ तसेच विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे अभिनंदनाचा ठराव सर्वानुमते पारित करण्यात आला. यावेळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष दादाजी चुधरी, कोषाध्यक्ष डॉ. सुरेश लडके, जिल्हा संघटक चंद्रकांत शिवनकर, अरुण झाडे, युवा जिल्हाध्यक्ष राहुल भांडेकर, युवा सचिव महेंद्र लटारे, दादाजी चापले, एस टी विधाते, गोविंदराव बानवले, जिल्हा महिला उपाध्यक्ष अलका गुरुनुले, महिला सचिव नम्रता कुत्तरमारे, सुधा चौधरी, ओबीसी अधिकारी कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष विलास मस्के, तालुका उपाध्यक्ष रामचंद्र दशमुखे, तालुका संघटक घनश्याम जकुलवार, पुरुषोत्तम म्हस्के, त्र्यंबक करोडकर, वासुदेव कुडे, विजय गिरसावळे, संध्या येलेकर, आकाश आंबोरकर, वैभव किरमे आदी ओबीसी बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन रामकृष्ण
ताजने तर आभार विद्या म्हशाखेत्री यांनी मानले.