बीड - हजारो वर्षांच्या मानसिक गुलामगिरीतुन मानवतेला बाहेर काढणाऱ्या क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले व महिला मुलींमध्ये शिक्षणाची ज्ञानगंगा पसरविणाऱ्या ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जिवनावर आधारित हिंदी चित्रपट 'फुले' आज रविवार दि. 27 एप्रिल 2025 रोजी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद बीड जिल्हा यांच्यावतीने समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ साहेब, माजी खासदार समीरभाऊ भुजबळ, आ. पंकजभाऊ भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली समता परिषदेचे प्रदेश सरचिटणीस तथा सिनेट सदस्य ॲड. सुभाष राऊत यांच्यावतीने आयोजित करण्यात आला होता. हा चित्रपट आज हाउसफुल झाला असून प्रेक्षकांची प्रचंड गर्दी निर्माण झाली होती. अखेर शेवटी चित्रपटाचा पुढील शो करिता तिकिटाची बुकिंग आज तनिष्क सिनेप्लेक्स या चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या वतीने करण्यात आली.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश सरचिटणीस तथा सिनेट सदस्य ॲड. सुभाषभाऊ राऊत यांनी चित्रपटाचा पहिला शो पाहिल्यानंतर बीड जिल्ह्यातील नागरिकांमध्ये महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे विचार प्रसारित व्हावेत याकरिता रविवार दि. 27 एप्रिल 2025 रोजीचा दुपारी तीन वाजताचा शो तनिष्क सिनेफ्लेक्स येथे फुले प्रेमी नागरिकांसाठी आयोजित केला होता. घरातली स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब ती शिकवू शकते या विचारांची कास धरून क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी सर्वप्रथम आपली पत्नी क्रांतीज्योती, ज्ञानगंगा सावित्रीबाई फुले यांना शिक्षित करण्याचे ठरवून त्यांना प्राथमिक शिक्षण दिले. याबरोबरच त्यांना प्रथम महिला शिक्षिका करण्यासाठी शिक्षण द्यावयाचे ठरविले. यावेळी फातिमा शेख यांनी सुद्धा शिक्षिका बनण्याचे ठरविले. त्यांच्या या स्वप्नांना त्यांचे बंधू उस्मान शेख यांनी भरघोस पाठिंबा देऊन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यासोबत शिक्षिका बनवण्याचे शिक्षण घेण्यास पाठविले. सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख या शिक्षिका झाल्याच्या नंतर त्यांनी पहिली महिला मुलींसाठी शाळा सुरू केली. ही शाळा उभारण्यासाठी तत्कालीन ब्राह्मण समाजातील तात्या भिडे आणि अन्य समाज बांधवांनी त्यांना प्रोत्साहन दिले. उस्ताद लहुजी साळवे यांनी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी उराशी बाळगलेल्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी आपली संपूर्ण ताकद लावली. असा इत्यंभूत इतिहास मांडलेला 'फुले' चित्रपट नागरिकांच्या पसंतीस पात्र ठरत असून आजचा झालेल्या हाउसफुल शो पाण्यासाठी बाल गोपाळांसह महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. चित्रपटगृहाची बसण्याची क्षमता संपल्यानंतर उर्वरित प्रेक्षकांसाठी पुढील शोची तिकिटे वितरित करण्यात आली. बहुजन समाजाने सदरील चित्रपट पाहून त्या काळाच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये क्रांतीसुर्य महात्मा फुले आणि क्रांतीज्योती, ज्ञानगंगा सावित्रीबाई फुले यांनी किती संघर्षातून शिक्षणाची ज्योत सर्वसामान्यांमध्ये पसरविली याचे आकलन नक्कीच होते. याकरिता बहुजन समाजातील नागरिकांनी एकदा फुले दांपत्याच्या जीवनावर आधारित 'फुले' चित्रपट नक्कीच पहावा असे आवाहन याप्रसंगी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश सरचिटणीस तथा सिनेट सदस्य ॲड. सुभाष राऊत यांच्यासह शहराध्यक्ष निखील शिंदे, नितीन राऊत, धनंजय काळे, अजिंक्य सुरवसे यांनी केले आहे.
पहलगाम येथे मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली
बीड येथील तनिष्क सिनेप्लेक्स या चित्रपटगृहात 'फुले' चित्रपट सुरू होण्यापूर्वी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. याबरोबरच काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी सिनेफ्लेक्स मधील वातावरण भावनिक झाले होते.
Satyashodhak, Mahatma phule, Rajarshi Chhatrapati shahu maharaj, dr Babasaheb Ambedkar, Bahujan, Savitri Mata Phule