गडचिरोली 20 एप्रिल 2025 - राजीव गांधी सभागृह, गडचिरोली येथे बी.आर.एस.पी. (बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी) गडचिरोली जिल्हा शाखेच्या वतीने संविधानिक अधिकार संमेलनाचे आयोजन करण्यात आले. या संमेलनाचे अध्यक्ष व प्रमुख मार्गदर्शक म्हणून एडवोकेट डॉ. सुरेश माने, संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष, बी.आर.एस.पी. उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून मा. रोहिदास राऊत व प्रा. अनिल होळी यांची उपस्थिती लाभली होती.
या संमेलनात संविधानातील मूलभूत अधिकार, सामाजिक न्याय आणि सध्याच्या राजकीय पार्श्वभूमीवर संविधानाची अंमलबजावणी यासंबंधी मुद्देसूद चर्चा करण्यात आली. डॉ. सुरेश माने यांनी संविधानिक अधिकारांची व्याप्ती, त्यातील बदल व लोकशाहीतील नागरिकांची भूमिका यावर सखोल मार्गदर्शन केले.
प्रा. अनिल होळी यांनी आपल्या भाषणात महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राष्ट्रनिर्माणातील योगदानाचे स्मरण करून दिले. परंतु दुर्दैवाने त्यांना जाती-धर्माच्या चौकटीत अडकवण्याचा प्रकार आजही राजकारणातून सुरु असल्याचे त्यांनी नमूद केले. स्थानिक पातळीवर सुरु असलेल्या शोषणाचे संदर्भ देत त्यांनी सुरजागड खाण प्रकल्पासारख्या घटनांद्वारे आदिवासी आणि बहुजन अल्पसंख्यांक समाजावर होणाऱ्या अन्यायावर ठामपणे प्रकाश टाकला.
या संमेलनात समविचारी संघटनांचाही सक्रिय सहभाग होता. उपस्थितांनी संविधानिक जागृती व लोकशाहीच्या रक्षणासाठी एकत्रितपणे संघर्ष करण्याची भूमिका मांडली.
संमेलनाचे आयोजन यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल बी.आर.एस.पी. जिल्हा गडचिरोली व सर्व सहभागी संघटनांचे आभार मानण्यात आले.
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan