- डॉ. कुमार लोंढे (702040050)
आम्ही सदाशिव देठे निवासी प्रशाला व ज्यू कॉलेज (सेमी, मराठी,आर्ट, सायन्स, कॉमर्स) या ठिकाणी डॉ.आंबेडकर जयंतीनिमित्त नेहमी विधायक उपक्रम राबवत असतो.समाजामध्ये बदल झाला पाहिजे हा बदल करण्यासाठी स्वतःला गाडून घ्यावे लागते प्रचंड यातना सहन कराव्या लागतात परंतु खचून,नाउमेद व नकारार्थी होऊन चालत नाही.सर्व समस्या या जातव्यवस्थेत,अर्थव्यवस्थेत व शिक्षणव्यवस्थेत आहेत हे दरवाजे उघडण्याचे धाडस व आत प्रवेश घेऊन उपाय शोधण्याचे कार्य केल्याशिवाय तरणोपर्याय नाही .
डॉ.आंबेडकर अभ्यासिका चांदापुरी (ता.माळशिरस सोलापूर) 2023 मध्ये सुरू केली याचे उदघाटक होते आयकर आयुक्त बुधिस्ट असणारे आदरणीय तुषार जी मोहिते (IAS,IRS) ज्यांचे वडील गवंडी काम करत होते गवंडी काम करण्याऱ्या व्यक्तीचा मुलगा आयुक्त होतो व साहेब रुबाबात मर्सिडीज बेंझ घेऊन आपल्या शाळेवर Entry करतात.सकाळी 10 पासून दुपारी 2 पर्यंत साहेब येथेच होते.प्रचंड ऊर्जा,भूक तहान हरपून उन्हाचा तडाखा होता त्यांनी आपल्या मधुर व शितल सावलीने उन्ह कोणालाही जाणवू दिले नाही.
मला एक आमदार महोदय बोलले एवढे मोठे अधिकारी तुम्हाला एवढा वेळ देतात हे फार विशेष आहे त्यावेळी मी त्यांना एक उदाहरण दिलं "आमदार साहेब मी व माझी पत्नी दिल्ली येथे पुरस्कार स्वीकारण्यासाठी गेलो त्यावेळी मला भेटण्यासाठी (IAS,IRS) आयकर आयुक्त प्रशांत जी रोकडे सध्या नॉर्थ इंडियाचे हेड आहेत असे व्यक्तिमत्व भेटण्यासाठी आले व मला म्हणाले दुसरे कोणी ही असते तर मी भेटण्यास आलो नसतो केवळ तुम्ही व तुमचे कार्य चांगले असल्याने मी भेटण्यास येथे आलो आहे. मला प्रचंड अभिमान वाटला आपल्या कामाचे मोजमाप होत आहे याचा आनंद झाला.
चांदापुरी येथील कार्यक्रमास प्रमुख अतिथी नायब तहसीलदार बुधिस्ट असणारे प्रतीक आढाव ज्यांनी स्वतः बिगारी,वाचमन,वाढपी व वडील आजारी असताना प्रचंड मेहनत जिद्द, चिकाटी जोरावर यशाला गवसणी घातली व जे पाहिजे ते आपण मिळवून शकतो आजची परिस्थीती उद्या वेगळी असेल हे खरे करून दाखवले.
बुधिस्ट असणारे सिद्धार्थ गायकवाड ज्यांचे वडील शिक्षक त्यांनी नायब तहसीलदार व जिल्हा उपनिबंधक पोस्ट विश्वासाने संपादन केल्या. धनगर समाजातील मेंढपाळ असणारे व स्वतः ज्यांनी मेंढ्या राखल्या ते अधिकारी गोविंद कर्णवर पाटील बांधकाम अभियंता हे ही प्रचंड मेहनत व जिद्दीच्या जोरावर अधिकारी झाले.पंकज लोंढे MPSC राज्यात ( मागासवर्गीय) दुसरा असणारा युवक कृषी अधिकारी पोस्ट मिळवतो.
एक अजून असेच अचंबित करणारे उदाहरण आहे ते म्हणजे ज्या मुलीचे वडील आज ही दगड फोडतात गवंडी काम करतात त्या बुधिस्ट असणाऱ्या वडिलांच्या पोटी कोमल सावंत नावाची कन्या STI ची पोस्ट मिळवते.विशेष म्हणजे तिने कोणतेही तास लावले नव्हते,कुठेही महागडे कोर्स घेतले नाहीत फक्त यु ट्यूब व मोबाईल च्या साहाय्याने ती अधिकारी होते.
असे सर्व चकाकणारे हिरे ज्यांनी व्यवस्थेतील मर्म शोधून डॉ.आंबेडकरांनी सांगितल्या प्रमाणे मोक्याच्या व माऱ्याच्या जागा मिळवल्या याचा सार्थ अभिमान व आनंद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे.विशेष म्हणजे हे सर्व रत्ने अभ्यासिकेच्या कार्यक्रमास उपस्थित राहिले.या महिन्यात विद्येचे जगातील चालते बोलते विद्यापीठ डॉ.आंबेडकर यांची जयंती विदेशात व देशात साजरी होत आहे.या जयंतीला DJ डॉल्बी वर लाखो रुपये खर्च होत आहेत.पारंपरिक कला सादर करणारे अनेक हात उपाशी मरत आहे माणसाची जागा डॉल्बी ने घेतली आहे.जयंती म्हणजे राजकीय नेत्यांचा इव्हेंट झाला आहे.
जयंती मध्ये लहान मुले व समाजात चर्चा असते आज या नेत्याची,या पार्टीची जयंती आहे बाबासाहेबांची जयंती कोणत्याही पार्टी चा इव्हेंट असू शकत नाही. जयंतीच्या बॅनर वर लहान मुलांचे फोटो,अमुक साम्राज्य तमुक साम्राज्य,खास आकर्षण SAI DJ, आतिषबाजी..........
असे अनेक उदाहरणे बघून यातना होतात जयंतीच्या बॅनर वर असणारे अल्पवयीन मुले जेव्हा MPSC / UPSC / IIT/न्यायाधीश/शास्त्रज्ञ/वकील/डॉक्टर/इंजिनियर/कारखाने/संस्था/बँका/शाळा/कॉलेज/विद्यापीठे या ठिकाणी झळकतील त्यावेळी देशात समाजात क्रांती होईल.. जयंतीला कोणत्याही विशेष आकर्षणाची गरज नाही सर्व शोषित वंचित नाही रे वर्गाचे एकच आकर्षण आहे ते म्हणजे
डॉ. भीमराव रामजी आंबेडकर......