जगामध्ये कुठेही करणी, काळीजादू अस्तित्वात नाही. त्यामुळे लोकांनी अशा अघोरी अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नये. करणीची भीती दाखवणाऱ्या मांत्रिकापासून सावध रहावे असे आवाहन अंनिस कार्यकर्त्या आशा धनाले यांनी केले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा सांगली आणि ग्रामपंचायत कारंदवाडी यांच्या वतीने करणी या विषयावर चित्र प्रदर्शन आयोजित केले होते. या चित्र प्रदर्शनामध्ये चमत्कार सादरीकरणाचा कार्यक्रम अंनिस कार्यकर्त्या आशा धनाले आणि त्रिशला शहा यांनी सादर केला. त्यावेळी त्या बोलत होत्या.
आशा धनाले पुढे म्हणाल्या की, आपले सततचे आजारपण, घरातील वाद विवाद याची कारणे आपण शास्त्रीय पद्धतीने शोधली पाहिजेत. लोकांच्या मनामध्ये करणी या अंधश्रद्धेचा मोठा पगडा आहे, त्याचा गैरफायदा फायदा घेऊन अनेक भोंदूबुवा लोकांना करणी झाली आहे म्हणून त्यांची आर्थिक फसवणूक करतात.
अंनिसच्या कार्यकर्त्या त्रिशला शाह म्हणाल्या की, करणी करण्याची - उतरवण्याची भीती दाखवून लोकांच्या मनामध्ये दहशत निर्माण करणे हा जादूटोणाविरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा आहे.
कारंदवाडी ग्रामपंचायतच्या सभागृहात लावलेल्या या चित्र प्रदर्शनाचा लाभ शाळेच्या विद्यार्थ्यांनी आणि ग्रामस्थांनी घेतला.
या कार्यक्रमास अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते डॉ. संजय निटवे, राहुल थोरात, डॉ. सविता अक्कोळे, जगदीश काबरे, धनंजय आरवाडे, कारंदवाडीचे सरपंच हिम्मत पाटील, उपसरपंच सौ.अरुणा हजारे, पोलीस पाटील अमित जाधव, ग्रामसेविका ज्योती मोहोटकर, ग्रामपंचायत सदस्य सचिन लोंढे, संतोष वाडकर, रवींद्र गायकवाड, विशाल आवटी, अर्चना सरदेशमुख, आशुतोष हाक्के, प्रदीपकुमार हाक्के, कर्मचारी संजय पाटील,सागर कबाडे, सुनिल रसाळ,रघुनाथ कोळी,अनिल कामिरे उपस्थित होते. सचिन लोंढे यांनी आभार मानले.
Satyashodhak, Bahujan