व्यंगचित्र वास्तव अधिक उजागर करून मांडतं. स्वतःला कुरूप बघणे कोणालाच आवडत नाही पण तुमच्यात नेमकं काय कमी आहे, हे व्यंगचित्र दाखवतं. देशाचं आणि समाजाचं चित्र कुठं बिघडल आहे हे योग्य आणि बोलक्या रितीने व्यंगचित्रातून मांडलं जातं. त्याला कोणताही फिल्टर नसतो, म्हणून ते प्रभावी ठरतं. व्यक्ती असो वा समाज त्याला व्यंगचित्राची गरज आहे, असं विधान सुप्रसिद्ध दिग्दर्शक व कवी नागराज मंजुळे यांनी केलं. ते महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आयोजित केलेल्या 'विवेकरेषा' या व्यंगचित्र प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभात बोलत होते.
सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार मंजुल या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. ते म्हणाले, आम्ही व्यंगचित्राच्या माध्यमातून प्रश्न विचारतो. जो कोणी चमत्काराला नमस्कार करतो, त्या गोष्टीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो. कोणी नेता आपण अजैविक असल्याचा दावा करतो, त्यावर आम्ही व्यंगचित्रातुन प्रश्न विचारतो.
सा. मार्मिकचे व्यंगचित्रकार गौरव सर्जेराव हे या व्यंगचित्र प्रदर्शनाचे संयोजक आहेत. त्यांनी आपल्या मनोगतात त्यांचा सनातनी विचारांपासून ते महा. अंनिस पर्यंतचा प्रवास कसा झाला हे सांगितले. ते म्हणाले, फुले-शाहू- आंबेडकर ते दाभोलकरां पर्यंतचे विचार हे अंधश्रद्धेविरूद्धची लस आहे, ती फक्त आपल्याला सर्वत्र न्यायची आहे.
पटकथा लेखक अरविंद जगताप हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. हुकुमशाही जेवढी जोरात असते तेवढा विनोद खुलत असतो. व्यंगचित्रकारांच्या कलेबरोबर हिंमतीला पण दाद दिली पाहिजे. राजकारणी नेते व व्यंगचित्रकार याचं बोलणं होईल असा काळ पाहिजे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. या व्यंगचित्र प्रदर्शनाच्या निमित्ताने व्यंगचित्र स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली होती, त्या सर्व विजेत्या स्पर्धकांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपाली आर्डे यांनी केले. प्रास्ताविक मुक्ता दाभोलकर यांनी केले. श्रीपाल ललवाणी, अनिल वेल्हाळ, मिलिंद देशमुख, राहुल थोरात, संजय मालती कमलाकर, श्रीराम नलावडे, अरविंद पाखले, दीपक गिरमे, गणेश चिंचोले, सौरभ बागडे इ. कार्यकर्ते उपस्थित होते.
Satyashodhak, Bahujan