अमरावती - मेळघाटातील आदिवासी पाड्यांमध्ये १७ मार्च ते ७ एप्रिलदरम्यान अंनिसच्यावतीने २१ दिवसांत ७२ गावात चमत्कार प्रात्यक्षिके व जनसंवादाचे एकूण १४० कार्यक्रम महाराष्ट्र अंनिसच्या नंदिनी जाधव, भगवान रणदिवे, श्रीकृष्ण धोटे यांनी प्रबोधन केले. पुढील महिन्यात याच मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याची सुरूवात होईल. त्यामध्ये उर्वरित आदिवाशी पाड्यांमध्ये प्रबोधनाचे कार्यक्रम केले जातील त्याचबरोबर आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका यांच्या प्रशिक्षणाचे शिबिरे घेतले जातील अशी माहिती नंदिनी जाधव यांनी एका पत्रकार परिषदेत दिली. अमरावती येथील श्रमिक पत्रकार संघाच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत नंदिनी जाधव यांनी या संपूर्ण दौऱ्याची माहिती दिली. त्याच बरोबर पत्रकारांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना उत्तरे देताना या दौ-यातील विविध अनुभव शेअर केले.
मेळघाट या नावाने परिचित असलेल्या दुर्गम, आदिवासीबहुल भागात आजार बरे करण्यासाठी पोटावर डागण्या देण्याची अघोरी प्रथा आहे. 21 व्या शतकात देखील अशा प्रथेमुळे होणाऱ्या बालमृत्यूची एक तरी घटना दरवर्षी प्रसार माध्यमातून समोर येते. अंधश्रध्दा, अज्ञान व अगतिकता यातून निर्माण होणारा हा त्रास थांबवण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने एक जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. 17 मार्च 2025 रोजी अमरावतीच्या ईरवीन चौकातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या मोहिमेच्या पाहिल्या टप्प्याची सुरुवात झाली. 7 एप्रिल 2025 रोजी या मोहिमेच्या पाहिल्या टप्प्याचा समारोप झाला.
या मोहिमेत सहभागी झालेले नंदिनी जाधव, भगवान रणदिवे, श्रीकृष्ण धोटे या कार्यकर्त्यांनी एकवीस दिवसांत 72 गावात मिळून चमत्कार प्रात्यक्षिके व जनसंवादाचे एकूण 140 कार्यक्रम केले.
Satyashodhak, Bahujan