सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील पूर्व भागातील एका गावात एका शेतकरी कुटुंबात मागील आठ नऊ महिन्यापासून अचानक घरातील कपडे आपोआप पेटू लागले, अंगणात रचून ठेवलेल्या कडब्याच्या गंजा पेटू लागल्या. हे असे अचानक काय व्हायला लागले म्हणून ते कुटुंब भयभीत झाले. त्याने तासगाव पोलीस स्टेशनला धाव घेतली. तासगाव पोलिसांनी हा अंधश्रद्धेचा प्रकार आहे, त्यामुळे तुम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा सल्ला घ्या असे सांगितले. त्यामुळे पीडित कुटुंबाने सांगली अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते राहुल थोरात यांच्याशी संपर्क साधून घडणाऱ्या घटना सांगितल्या.
या घटनेचे गांभीर्य ओळखून राहुल थोरात यांनी तासगाव अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या सुजाता म्हेत्रे, अमर खोत यांना पीडित कुटुंबाला भेट द्यायला सांगितले. त्याप्रमाणे सुजाता म्हेत्रे आणि सुनिता म्हेत्रे यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. तिथे गेल्यानंतर परिस्थिती पाहिली. घरातील सर्व साहित्य त्यांनी अंगणात, पटांगणात आणून ठेवले होते. फक्त जेवण करण्यासाठीचे साहित्य इतकेच घरात होते. बाकी सर्व साहित्य त्यांनी बाहेर मांडलेले होते. संपूर्ण कुटुंब भानामतीच्या दहशतीखाली होते. कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही वस्तूला, केव्हाही आग लागण्याची शक्यता सांगत होते.
घरातील सर्व मंडळींना एकत्र बसून अंनिस कार्यकर्त्यांनी सुरुवातीपासून घडणाऱ्या प्रकाराची माहिती घेतली, तेव्हा समजले की, जवळपास आठ नऊ महिने पूर्वीपासून या अघोरी गोष्टी घडायला सुरवात झाली आहे. सुरुवातीला घरावर काही दगड पडले. नंतर कडबा रचलेली गंजी पेटली, त्यानंतर काही महिन्यानंतर दुसऱ्यांदा गंजी पेटली,तिसऱ्यांदा गंजी पेटली, चौथ्यांदा गंजी पेटली. या चार वेळा गंज्या पेटल्यानंतर परत घरावर दगड पडणे आणि त्यानंतर घरातल्या वस्तू आपोआप पेटणे सुरू झाले. घरातील वस्तू, यामध्ये कपडे, अंथरुण, गादी, उशी अशा काही वस्तू पेटायला सुरुवात झाली. त्यानंतर घरातील महिलांचे दोरीवरील कपडे आपोआप पेटू लागले. याच्याही पुढे जाऊन घरातील काही महिलांच्या अंगावरचे कपडे आपोआप पेटणे सुरू झाले. अंगावरची साडी पेटायला सुरुवात झाल्यानंतर घरातील सगळेच लोक भयभीत झाले. आणि त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली होती. ही माहिती ऐकून घेतल्यानंतर काही परिस्थितीजन्य पुरावेही तिथे पाहायला मिळाले. जळालेले कपडे जळालेले अंथरूण आणि काही ठिकाणी ठेवलेला कापूर आपोआप पेटलेला होता, त्याची राख. जळालेल्या काही साड्या पण पाहायला मिळाल्या.
काही वेळ घराची आणि परिसराची पाहणी केल्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या विशिष्ट पद्धतीने नुसार चौकशी सुरू झाली. एकेका व्यक्तीला समोर घेऊन प्रश्न विचारणे सुरू केले. त्यातून अनेक गोष्टींची माहिती मिळत गेली. अनेक गोष्टींचा उलगडा होत गेला. घरातील सर्व व्यक्तींच्या मुलाखती घेऊन झाल्या. बरीच माहिती एकत्र झाली. यानंतर शेवटी सर्व कुटुंबीय, भानामतीचा प्रकार पहायला आलेले बाहेरचे लोक आणि आजूबाजूचे शेजारी या सर्वांना एकत्र बसवून जे काही कार्यकर्त्यांनी पाहिलं आणि जे काही सत्य होतं ते सांगण्याचा प्रयत्न केला.
अंनिस कार्यकर्त्या सुजाता म्हेत्रे म्हणाल्या की,
'घरावरती दगड पडणे किंवा एखादी वस्तू पेटणे या पाठीमागे कोणतीही वाईट काळी शक्ती, भानामती असत नाही. अगदी विज्ञानाच्या भाषेत सांगायचे झाले तर एखादी वस्तू जेव्हा हालचाल करते त्यावेळेला तिला कोणती ना कोणती ऊर्जा द्यावी लागत असते. दगड खालून वरती, घरावर जाऊन पडत असताना त्याला कोणीतरी माणसाचा हात लावावा लागेल, माणसाची स्नायू ऊर्जा वापरावी लागेल, ही ऊर्जा दिल्याशिवाय तो इतक्या वर जाऊ शकत नाही, हेच ध्यानात घेतले पाहिजे. ही करणी असत नाही, कोणतीही भानामती असत नाही, या पाठीमागे फक्त मानवी मेंदू आणि मानवी हातच असतात, असा एक निष्कर्ष निघतो.'
यामध्ये या गोष्टी घडवून आणणारी व्यक्ती घरातील किंवा घराशेजारील, आजूबाजूची कुठली असेल यावर आपण सर्वांनी लक्ष ठेवा आणि अशा गोष्टी पुन्हा घडणार नाहीत यासाठी सावध रहा. पुन्हा अशा गोष्टी घडल्या तर ताबडतोब अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना कळवा, आम्ही परत येऊ.' असा विश्वास दिला. वातावरण बरेचसे सैल झालेले दिसले. घरातील मंडळीना अंनिसचे विचार काहीसे समजल्याचे जाणवले. "असा प्रकार पुन्हा घडल्यास कळवतो, तेव्हाही आपण या. आपले उपकार होतील." कुटुंब प्रमुखानी कृतज्ञतेच्या भाषेत अंनिसचे आभार मानले.
आज या गोष्टीला दहा दिवस झाले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून या दरम्यान चार पाच वेळा फोन करून कुटुंबाची चौकशी केली गेली, तर कुटुंब प्रमुखांनी सांगितले, 'आपण येऊन गेल्यापासून एकदाही तसा कुठलाच प्रकार घडला नाही'. अशाप्रकारे त्या कुटुंबातील भानामती पळाली.
या भानामती प्रकरणाचा छडा लावण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राहुल थोरात, वासुदेव गुरव सर,अमर खोत, नूतन परीट, सुनीता म्हेत्रे, सुजाता म्हेत्रे यांनी पाठपुरावा केला.
अशा अघोरी घटना आपल्या आजूबाजूला आपल्या माहितीमध्ये, कुठे घडत असतील तर त्याची माहिती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला द्यावी असे आवाहन अंनिसचे कार्यकर्ते सुजाता म्हेत्रे,अमर खोत,वासुदेव गुरव यांनी केले आहे.
- महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती
Satyashodhak, Bahujan