माणसांचे समाजातील स्थान जात व्यवस्था ठरवते. जात व्यवस्थेमुळे माणसांचा आत्मसन्मान नाहीसा होतो. जातीअंताशिवाय सामाजिक समता अशक्य आहे. जातीअंताचा लढा हा विवेकी मार्गाने लढला तर त्यामध्ये निश्चित यश येईल असे प्रतिपादन आंबेडकरी साहित्यिक विचारवंत अर्जुन डांगळे यांनी केले. ते महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभिवादन विशेषांकाच्या ऑनलाइन प्रकाशन कार्यक्रमांत बोलत होते.
'आंबेडकरी विचारातून स्वजातीची चिकित्सा' या विषयावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभिवादन विशेषांक प्रसिद्ध केला आहे. या अंकाचे प्रकाशन आंबेडकरी साहित्यिक अर्जुन डांगळे यांच्या हस्ते पार पडले.
अर्जुन डांगळे पुढे म्हणाले की, ज्यांना धर्मव्यवस्थेने, जात व्यवस्थेने नाकारले आहे त्यांच्यासाठी समरसता म्हणजे समता नव्हे. समतेसाठी संपूर्ण परिवर्तन आवश्यक आहे. पुरोगामी परंपरा ही आधुनिक महाराष्ट्राचा चेहरा आहे. जातीअंताच्या दिशेने जाण्यासाठी शिक्षण हा घटक खूप महत्त्वाचा आहे.
अंनिसचे कार्यकर्ते डॉ. हमीद दाभोलकर म्हणाले की, डॉ. नरेंद्र दाभोलकर असे म्हणत की जात ही मोठी अंधश्रद्धा आहे, तिला शास्त्रीय आधार नाही. अंधश्रद्धा निर्मूलन समिती धर्मचिकीत्से सोबत जात चिकित्सेचाही विचार चळवळीच्या केंद्रस्थानी राहील याचा सतत प्रयत्न करत असते. आज पर्यंत संघटनेने हजारो आंतरजातीय विवाह लावले आहेत. आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना सेफ हाउस च्या माध्यमातून संरक्षण दिले आहे. जातीअंताच्या वैचारिक मांडणी सोबत कृतिशील कार्यक्रम राबवणे हेही आता खूप महत्त्वाचे आहे. जात निर्मूलनासाठी सध्याच्या परिस्थितीत काय कृतिशील अजेंडा असावा याचे मंथन आपण सर्वांनी केले पाहिजे.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राहुल थोरात, गीत गायन विजय खरात, प्रास्ताविक राजीव देशपांडे आणि आभार रमेश साळुंखे यांनी केले.
Satyashodhak, dr Babasaheb Ambedkar, Bahujan