नांदेड दि. ( प्रतिनिधी) विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्राच्या वतीने नांदेड येथील पीपल्स महाविद्यालयात पार पडलेल्या 'साहित्य संवाद ' या कार्यक्रमात छाया बेले लिखित ' पारबता ' या कादंबरीवर आणि राजेंद्र गोणारकर लिखित 'नवी लिपी' या काव्यसंग्रहावर सकस वाङ्मयीन चर्चा करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्याध्यक्ष प्रा. प्रतिमाताई परदेशी होत्या, तर उद्घाटक म्हणून सत्यशोधक विचारवंत प्रा. रामप्रसाद तौर हे उपस्थित होते.
यावेळी उद्घाटकीय भाषणात प्रा. रामप्रसाद तौर म्हणाले की, सध्याचा काळ हा साहित्यिक, कलावंतांसाठी कसोटीचा काळ असून , या काळात साहित्यिकांनी आपल्या टोकदार लेखणीच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न मांडण्याची गरज निर्माण झाली आहे. साहित्यातून क्रांती होते, हा इतिहास लक्षात घेऊन साहित्यिकांनी पद आणि पुरस्कारांसाठी न लिहिता देशाच्या हितासाठी लिहावे, असेही ते यावेळी म्हणाले.
पहिल्या सत्रात लेखिका छाया बेले यांच्या 'पारबता' या कादंबरीवर सुप्रसिद्ध लेखक तथा समीक्षक डॉ. मारोती कसाब यांनी भाष्य केले. ' पारबता' ही स्त्रियांच्या विविध पातळ्यांवर होणाऱ्या शोषणाची कहाणी असून, या कादंबरीतून लेखिका छाया बेले यांनी विषमतामूलक जात-पितृसत्ताकवादी व्यवस्थेला छेद देत समकालीन वास्तवाचे अत्यंत कलात्मक पद्धतीने चित्रण केले आहे, असे प्रतिपादन केले. मराठी साहित्यविश्वात स्त्रियांच्या शोषणाविरुद्ध एल्गार पुकारणारी 'पारबता' ही महत्त्वाची कलाकृती असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. सामाजिक परिवर्तनासाठी उघड, स्पष्ट, निर्भीड आणि कणखर भूमिका घेऊन लेखन करणाऱ्या लेखिकांमध्ये छाया बेले यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल असेही ते म्हणाले. यावेळी लेखिका छाया बेले यांनी 'पारबता' या कादंबरीची निर्मिती प्रक्रिया सांगितली. अवतीभोवतीच्या समाजात स्त्रियांना मिळणारी वाईट वागणूक पाहून आपले अंतःकरण दुःखी होते. त्या वेदतूनच हातात लेखणी येते आणि साहित्य निर्मिती होते असे त्या म्हणाल्या.
दुसऱ्या सत्रात कवी राजेंद्र गोणारकर यांच्या 'नवी लिपी' या काव्यसंग्रहावर ज्येष्ठ लेखक व समीक्षक डॉ. अनंत राऊत यांनी प्रदीर्घ भाष्य केले. आपल्या मनोगतात ते म्हणाले की, राजेंद्र गोणारकर यांची प्रकृती भावगर्भ कवीची आहे. अस्पृश्यता, शोषण, गुलामी, अज्ञान, अंधश्रद्धा,भेदाभेद,
उच्चनीचता, दारिद्र्य इत्यादीच्या काळ्याकभिन्न अंधाराला चिरत जाणारी ही कविता असून महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समतावादी विचारांतून ही कविता निर्माण झाली आहे. या कवितेला उज्ज्वल भवितव्य आहे, असेही ते यावेळी म्हणाले. याप्रसंगी कवी राजेंद्र गोणारकर यांनी आपले मनोगत सांगून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील निवडक कवितांचे उत्तम सादरीकरण केले.
सलग चार तास चाललेल्या या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या अध्यक्षा प्रा. प्रतिमाताई परदेशी म्हणाल्या की, साहित्यिक हा जनतेच्या लढ्यात नेहमी पुढे असला पाहिजे. आजच्या समकालीन प्रश्नांनी ज्याचे मन पेटवून उठते तोच खरा साहित्यिक. साहित्यिकांनी जनतेच्या समस्या न सोडविणाऱ्या सत्तेला आव्हान देत लेखणीतून वठणीवर आणण्याचे काम केले पाहिजे असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमास विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे पदाधिकारी डॉ. अंजुम कादरी, डॉ. व्यंकट सूर्यवंशी, शाहीर अंकुश सिंदगीकर, सतीश नाईकवाडे, राजेंद्र कांबळे, एन.डी. राठोड यांच्यासह प्राचार्य डॉ. आनंद भंडारे, प्राचार्य माधव वाघमारे , चंद्रकांत मोरे, डॉ. अजय गव्हाणे आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. ज्ञानेश्वर डिगोळे, काॅ. ईरवंत सूर्यकार यांनी केले तर दत्ताभाऊ तुमवाड यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. विठ्ठल दहिफळे, डॉ. बालाजी पोतुलवार, काॅ. दिगंबर घायाळे, पंडित पाटील, दत्ता कुंचेलवाड, बी.व्ही. घेवारे,व्ही.आर. असोरे आदींनी परिश्रम घेतले.
- मारोती कसाब
Satyashodhak, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan