संभाजीनगर (औरंगाबाद) येथे आयोजित यंदाच्या १९ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी डॉ. अशोक राणा यांची निवड झाली असून, संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या संमेलनपूर्व सत्कार पर्वास नागपूर येथून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला.
दि. २१, २२ व २३ फरवरी ला विद्रोही मराठी साहित्य संमेलन, आम खास मैदान,औरंगाबाद येथे भव्य स्वरुपात आयोजित केले असून, विद्रोही परंपरेनुसार निवड करण्यात आलेल्या अध्यक्षांचा सत्कार अनेक ठिकाणी केला जातो, नागपूर येथे दि. ११ फेब्रुवारीला सेवादल महाविद्यालय सभागृहात मा. चंद्रकांत वानखडे, माजी अध्यक्ष १७ वे विद्रोही म. सा. सं. वर्धा, यांचे हस्ते, सेवादल शिक्षण संस्था अध्यक्ष मा. संजय शेंडे, डॉ. अशोक चोपडे, सत्यशोधक साहित्यिक, वर्धा,मा.संध्या राजूरकर, संपादक दैनिक बहुजन सौरभ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
याप्रसंगी मान्यवरांनी विद्रोही साहित्य संमेलनाच्या आयोजनामागील भूमिका, विद्रोही साहित्य प्रवाहाची अपरिहार्यता, विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे औचित्य आणि १९ विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. अशोक राणा यांची निवड झाल्याबद्दल गौरवण्यात आले. डॉ अशोक राणा याप्रसंगी संबोधन करताना,"संमेलनाचे अध्यक्ष पद प्राप्त झाल्यानंतर जबाबदारी अधिक दृढ झाल्याची संमती दर्शवली, आणि महात्मा फुले यांनी मराठी ग्रंथकार सभेला धाडलेल्या पत्रातील सज्जड इशाऱ्याबरहुकूम येणारा काळच विद्रोहीचा असणार आहे, असा विश्वास व्यक्त केला. विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र आणि विद्रोही मराठी साहित्य संमेलन विद्रोही विचाराची लढाई आता यापुढे शेतकरी, कष्टकरी, ओबीसी, दलित, आदिवासी, विमुक्तभटके, धार्मिक अल्पसंख्याक आणि स्त्री शक्ती यांच्या एकजुटीने निकराची होऊ लागली आहे. विद्रोहीचा प्रवाह हाच या देशातील बहुसंख्येने असलेल्या स्त्रीशुद्रातिशुद्रांचे प्रतिनिधित्व करत असल्याने हाच निर्विवादपणे मुख्य प्रवाह ठरला आहे. संभाजीनगर येथे आयोजित विद्रोही मराठी साहित्य संमेलनात आपले मनापासून स्वागत असून मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून या साहित्य संमेलनाचा भाग बनून विद्रोही प्रवाह सशक्त करावा.असे आव्हानही केले."
प्रस्तुत जाहीर सत्कार आयोजनाची भूमिका बाबा बिडकर यांनी प्रास्ताविकातून विशद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुज हुलके यांनी तर आभार प्रदर्शन वंदना वनकर यांनी केले. याप्रसंगी विद्रोही मराठी साहित्य संमेलन आयोजन समिती विजय बाभूळकर, संजय नरखेडकर, टेमराज माले, संजय मांगे, ज्ञानेश्वर रक्षक, शरद वानखडे, नरेंद्र सहस्रबुद्धे,आशू सक्सेना, प्रमोद कावळे, राजू बोचरे,इंद्रपाल जौंजाळकर,उमेश कोरराम, प्रदीप शेंडे, मीरा मदनकर, जयंत झंझाड,राजेंद्र डफ, सुधाताई बामनपल्लीवार, होमेश भुजाडे, मदन नागपूरे, डॉ गणेश चव्हाण, प्रकाश दुलेवाले, दुर्गाबाई बाभूळकर, दिगांबर जिचकार, राजू कळसाईत, कपिल थुटे वर्धा, आणि विविध सामाजिक संघटना, साहित्यिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.यावेळी वर्धा येथील विद्रोही टीमने देखील अध्यक्षांचा सत्कार केला. मराठा सेवा संघ यांनी देखील यावेळी सत्कार केला.
वृत्तांकन - अनुज हुलके
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan