हिंगणघाट - तुळसकर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट अंतर्गत मातोश्री आशाताई कुणावार कला, वाणिज्य आणि विज्ञान महिला महाविद्यालयातील करिअर मार्गदर्शन समितीच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. उमेश तुळसकर (अध्यक्ष, विद्या विकास शिक्षण संस्था, हिंगणघाट) होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून मनोज गभने (एमपीएससी उत्तीर्ण, २००४ बॅच, ठाणेदार हिंगणघाट ) यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच प्रमुख पाहुणे नागेश उगले (पोलीस निरीक्षक, हिंगणघाट) आणि संदेश मून (शैक्षणिक समुपदेशक ) यांनीही विचार मांडले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा तयारी आणि सायबर क्राईमसारख्या संवेदनशील विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. विशेष अतिथी म्हणून जय जवान अकादमीचे संस्थापक सतीश तीमांडे आणि वाचनालय संचालक विशाल घाटूर्ले व राजश्री नंदनवार यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अभय दांडेकर यांनी केले, तर प्रास्ताविक प्रा. जमीर पटेल यांनी सादर केले. आभार प्रदर्शन प्रमोद जयपुरकर यांनी काव्यात्मक शैलीत केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी, आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.