जन्म क्रांतीज्योती सावित्रीचा; मार्ग स्त्री शिक्षणाच्या प्रगतीचा
- अनिल नाचपल्ले, प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक महासंघ
१८४८ साली संबंध भारतामध्ये मुलींसाठी फक्त तीन शाळा होत्या, या शाळेतील मुलींना शिकवणाया सावित्रीमाई यांचा जन्म दि. ३ जानेवारी १८३१ रोजी नायगाव सातारा (महाराष्ट्र) येथे झाला. त्याकाळी पुण्यात सावित्रीमाई यांचे पती जोतिबांनी आपल्या काही जवळपासच्या व काही नात्यातल्या मुली गोळा केल्या आणि शिक्षणाचा प्रारंभ केला. तर सावित्रीमाई घरोघरी जाऊन असा मुलींना शाळेत पाठवा, आग्रह करू लागल्या. तेव्हा कुठे सुरुवातीला सात ते आठ मुली कशाबशा जमल्या. मग हळूहळू संख्या वाढत गेली.
शिक्षणाच्या या संघर्षात त्याकाळी सावित्रीमाईंना भरपूर त्रास सहन करावा लागला. त्या शाळेत जाऊ लागल्या की, लोक त्यांच्यावर पान खाऊन थुंकत असत.
कोणी अचकट विचकट बोलत असत. वेळप्रसंगी अंगावर दगड धोंडे झेलावे लागत. तरीही सावित्रीमाईंनी हे शिक्षणाचे कार्य चालूच ठेवले. सावित्रीमाईंना शाळेत जाताना तीन लुगडी बरोबर न्यावी लागत. एक जाताना, दुसरे शाळेत शिकवताना, व तिसरे शाळेतून घरी परतताना वापरावे लागे. परंतु सावित्रीमाईंनी घेतलेला वसा कधी टाकला नाही. त्या उतल्या नाहीत की, मातल्या नाहीत. पण पतीच्या कामात कायम साथ दिली आणि शिक्षणाची ही ज्योत त्यांनी तेवत ठेऊन एक विश्वव्यापी क्रांतीचे बीज रोवून सावित्रीमाई क्रांतीज्योती झाल्या.
त्याकाळी क्रांतीज्योती सावित्रीमाई आणि महात्मा जोतिबा फुले या दाम्पत्यांना आपल्या घरूनही विरोध झाला. समाजातल्या लोकांनी जोतिबांचे वडील गोविंदराव यांना सांगितले की, एक तर तुमच्या घरी चालवलेलं स्त्री शिक्षणाचे काम सोडा किंवा तुमच्या मुलाला काहीतरी समज द्या. त्यानंतर महात्मा जोतिबा फुले यांचे वडील गोविंदराव यांनी सांगितलं की, तुम्ही एकतर शिक्षणाचा वृत्त सोडा किंवा घर सोडून निघून जा. त्यावेळेस गोविंदरावांना वाईट वाटले, पण त्या सामाजिक परिस्थितीपुढे त्यांचाही नाविलाज होता.. त्यांचे ही काही चाललं नाही. शेवटी सावित्रीमाई आणि महात्मा जोतिबा फुले यांना घर सोडून बाहेर पडावे लागले. याकाळात महात्मा फुले यांच्यासोबत सावित्रीमाई सावलीसारख्या कायम सोबत राहिल्या. घराचा दरवाजा बंद झाला. ज्या घराने आतापर्यंत आसरा दिला, त्यांनीच पाठ फिरवली. याचे खूप शल्य त्यांना आयुष्यभर वाटले.
कालांतराने शाळेतील मुलीची संख्या २५० च्या वर वाढली. एक शाळा कमी पडायला लागली. मग रस्ता पेठेत एक व गंजपेठेत दुसरी अशा दोन नवीन शाळा सुरू केल्या. एका शाळेत त्यांची आत्या सगुणाबाई शिकवू लागल्या. दुसऱ्या शाळेत फातिमा शेख नावाच्या मुस्लिम शिक्षिका शिकवू लागल्या. मग जोतीरावांच्या लक्षात अजून एक अडचण आली. मुलींसाठी शाळा झाल्या, पण अस्पृश्यांच्या मुलांसाठी शाळा कुठे आहेत ? सरकारी शाळेत ही मुले थोडेफार जातात, पण उच्च जातीची मुले नेहमीच पुढे असतात. अस्पृश्य मुलांना उंबऱ्या बाहेर बसावे लागते. छडी मारायचे असेल तर लांबून फेकून मारली जाते. मग याही अडचणीवर मात करून जोतीरावांनी नाना पेठ जवळची योग्य जागा शोधून अस्पृश्यांसाठी शाळा सुरू केली. त्यांमुळे मुलांचे उच्चार सुधारले. स्वच्छतेचे शिक्षण मिळायला लागले आणि सामाजिक क्रांतीला खया अर्थाने सुरुवात झाली.
आज आपण शैक्षणिक क्षेत्रात सर्वच बाबतीत आघाडीवर आहोत, पण याचे सर्व श्रेय जाते, ते या भूतकाळात घडलेल्या क्रांतीला व क्रांतीज्योती सावित्रीमाईंच्या कार्याला. यामुळेच ३ जानेवारी हा सावित्रीमाईंचा जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रात बालिका दिन व महिला मुक्तीदिन म्हणून साजरा केला जातो. दि. १० मार्च १९९८ रोजी भारत सरकारने सावित्रीमाई फुले यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीट प्रसिद्ध केले. २०१५ मध्ये, पुणे विद्यापीठाचे नामकरण 'सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ' असे करण्यात आले.
अनिल नाचपल्ले, प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक महासंघ
Satyashodhak, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan, Savitri Mata Phule