आंबेडकरी चळवळी नंतर खऱ्या अर्थाने जर महिला सार्वजनिक जीवनात काम करताना कुठे दिसत असतील तर त्या मराठा सेवा संघाच्या चळवळीत ! आज लाखो महिला जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून मराठा सेवा संघाच्या चळवळीत काम करीत आहे आणि याचे संपूर्ण श्रेय मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांचे आहे.मराठा सेवा संघाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला आपल्या घरातील महिलांना चळवळीत आणण्यासाठी खेडेकर साहेबांचा सुरुवातीपासूनच आग्रह राहत आलेला आहे.पुरुषांपेक्षा महिला जास्त कर्तबगारी गाजवू शकतात हे ते सतत सांगत आलेले आहे.ज्या कुटुंबात महिलांच्या हाती संपूर्ण कारभार असतो त्या कुटुंबाची प्रगती होते हे त्यांचे नेहमी सांगणे असते.त्यामुळे मराठा सेवा संघामध्ये फक्त पुरुषांनीच नाही तर आपल्या घरातील महिलांनाही सोबत घेऊन कार्यक्रमात आले पाहिजे हे साहेब नेहमी सांगतात.त्याचा परिणाम असा झाला की आज या चळवळीत पुरुषांच्या बरोबरीने महिला मोठ्या प्रमाणात कार्य करीत आहेत.
त्यासाठी पुरुषोत्तम खेडेकर यांनी २५ वर्षांपूर्वी जिजाऊ ब्रिगेडची स्थापना केली.जिजाऊ ब्रिगेडची संपूर्ण कमान महिलांच्या हातात सोपवली. महिलांना सर्व प्रकारचे अधिकार दिले आणि महिलांच्या या स्वतंत्र कक्षाचा सर्व कार्यभार महिलांनीच पहावा असा आग्रह केला.महिलांनी स्वतःचे निर्णय स्वतः घ्यावे असे साहेब नेहमी सांगत असतात. महिलांच्या कार्यक्रमात विचारमंचावर सुद्धा संपूर्ण शंभर टक्के महिलाच असल्या पाहिजे यासाठी ते आग्रही असतात.त्याचा परिणाम असा झाला की आज महिला कोणत्याही भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन उत्कृष्टपणे स्वतः करू शकतात.जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून मागील २५ वर्षात महाराष्ट्रामध्ये अनेक उपक्रम,कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.महिलांनी अनेक आंदोलने,मोर्चे,उपोषणे करून महिलांवरील अन्याय आणि अत्याचाराला वाचा फोडण्याचा सातत्याने प्रयत्न केला.जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून महिलांमध्ये जनजागृती केली.अंधश्रद्धा,घातक रूढी परंपरा,अनिष्ट चालीरीती, बुवाबाजी,स्त्री भ्रूणहत्या, हुंडा पद्धती यावर जिजाऊ जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून सातत्याने प्रहार करण्यात येतात व महिलांमधे जागृती करून त्यांना बुवाबाजी आणि अंधश्रद्धेतून मुक्त करण्याचा प्रयत्न केला जातो.त्यामुळे आज असंख्य महिला भीतीमुक्त जीवन जगत आहे.त्याचे संपूर्ण श्रेय खेडेकर साहेबांना जाते.
दरवर्षी असंख्य महिला १२ जानेवारी रोजी जिजाऊ जन्मोत्सवासाठी मातृतीर्थ सिंदखेडराजाला येतात.पुरुषांच्या बरोबरीने महिलांची उपस्थिती असते.स्त्री-पुरुष समानतेचा खरा अर्थ काय असतो हे खेडेकर साहेबांनी प्रत्यक्ष कृती मधून महाराष्ट्राला समजावून सांगितले.स्वतःच्या कुटुंबातून याची सुरुवात केली आणि आपली पत्नी रेखाताई यांना आमदार बनवले व सर्व प्रकारचे स्वातंत्र्य बहाल केले.कुटुंबातील सर्व स्त्रियांना चळवळीमध्ये आणून इतर स्त्रियांसमोर आदर्श निर्माण केला. त्याचा परिणाम म्हणून आज मराठा सेवा संघाच्या चळवळीतील बहुतांश कार्यकर्त्यांच्या घरातील महिला या चळवळीत काम करतात आणि सेवा संघाला हातभार लावतात.त्यांच्या प्रेरणेमुळे आज अनेक महिला वेगवेगळ्या क्षेत्रात मोठ्या उंचीवर काम करीत आहे.ज्या महिला कधी घराचा उंबरठा ओलांडत नव्हत्या; आज त्या वेगवेगळ्या विचारपिठावर हजारो लोकांसमोर आपले विचार व्यक्त करीत आहे.मराठा सेवा संघाने अनेक महिलांना व्याख्याते बनवले, कित्येकींना लेखिका बनवले,अनेक महिला कीर्तनकार,प्रबोधनकार, कलाकार,पत्रकार,नाटककार बनल्या. अनेक महिला स्वतःचे उद्योग-व्यवसाय स्थापन करून यशस्वी झाल्या.अनेक महिला प्रशासकीय क्षेत्रामध्ये कलेक्टर, कमिशनर पासून डॉक्टर,इंजिनिअर प्राध्यापक,वकील,प्रशासकीय अधिकारी यासारख्या मोठमोठ्या हुद्यांवर पोहोचल्या.विविध क्षेत्रात महिलांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला व आम्ही पुरुषांपेक्षा कमी नाही तर काकणभर पुढेच आहोत हे दाखवून दिले.त्याचे सगळे श्रेय खेडेकर साहेबांना जाते.
पुरुषोत्तम खेडेकर यांनी स्थापन केलेली जिजाऊ ब्रिगेड ही संघटना आज महाराष्ट्रात महिलांची सर्वात सामर्थ्यशाली,वैचारिक व तेवढीच आक्रमक संघटना म्हणून नावलौकिक प्राप्त करून आहे.आज जिजाऊ ब्रिगेडमुळे महिलांना हक्काचे विचारपीठ उपलब्ध झाले आहे.जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून असंख्य महिला आपल्या भावभावना, कलागुण व्यक्त करीत असतात.आजपर्यंत प्रचंड प्रतिभा असूनही ज्या महिलांना कुठेही स्थान मिळत नव्हते,त्या महिलांना जिजाऊ ब्रिगेडने विचारपीठ उपलब्ध करून दिले आणि त्या विचारपिठावरून आता महिला आपल्या कलागुण,कौशल्याचा जागर करीत असतात.जिजाऊ ब्रिगेडचे हे कार्य इतिहासात नोंद घेण्यासारखे आहे. महिलांमधील सुप्त गुणांना बाहेर काढून त्यांना समाजासमोर प्रकट करण्याची संधी फक्त जिजाऊ ब्रिगेड मुळे उपलब्ध झाली आहे.त्यामुळे आज अनेक महिला समाजात नाव, गाव,पद,प्रतिष्ठा,पैसा,सन्मान,आदर प्राप्त करीत आहे व पुरुषांच्याही पुढे गेलेल्या आहेत.त्याचे कारण खेडेकर साहेबांची प्रेरणा आणि महिलांमधील त्यांनी ओळखलेली ताकद हे आहे. खेडेकर साहेबांनी महिलांना दिलेले हे आत्मभान, स्वातंत्र्य आणि उपलब्ध करून दिलेले विचारपीठ यामुळे आज महिला शक्ती फक्त महाराष्ट्रच नाही, देशच नाही तर परदेशात सुद्धा मराठा सेवा संघाच्या विचारांचा झेंडा जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून बुलंद करीत आहे.आज एकही क्षेत्र असे नाही की, ज्या क्षेत्रातील महिला जिजाऊ ब्रिगेडमध्ये काम करीत नसेल ! प्रत्येक क्षेत्रातील महिलांना जिजाऊ ब्रिगेड मध्ये सन्मानाने स्थान देऊन त्यांच्या कर्तुत्वाला उभारी देण्याचे काम खेडेकर साहेबांनी केलेले आहे.सामाजिक,सांस्कृतिक, शैक्षणिक,साहित्यिक,राजकीय या प्रत्येक क्षेत्रात आज जिजाऊ ब्रिगेडची महिला सन्मानाने काम करीत आहे व आपल्या संघटनेला सुद्धा सहकार्य करीत आहे.जिजाऊ ब्रिगेड मध्ये काम करीत असलेल्या महिलांना आज समाजामध्ये प्रचंड मान सन्मान प्राप्त होतो.वेगवेगळ्या विचारपिठांवर विविध क्षेत्रातील मान्यवर लोकांसमोर आपले विचार मांडण्याची संधी मिळते.हे सर्व फक्त क्रांतीपुरुष पुरुषोत्तम खेडेकर यांच्यामुळे शक्य झाले आहे.नाहीतर महिलांमध्ये असलेले हे सर्व सुप्त कलागुण तसेच वाया गेले असते.परंतु या क्रांतीपुरुषाने महिलांमधील या सामर्थ्याला सुरुवातीपासून ओळखले आणि त्यांना वेळोवेळी प्रोत्साहित करून, प्रेरणा देऊन मुख्य प्रवाहात आणले व आज त्यांच्या हातून फार मोठे कार्य करून घेतले.त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतर महिलांच्या स्वातंत्र्यासाठी खऱ्या अर्थाने आवाज उठवून प्रत्यक्ष कृती करणारे व महिलांना आत्मभान देणारे पुरुषोत्तम खेडेकर हे महिलांचे मुक्तिदाते,उद्धारक आहेत आणि म्हणूनच ते आम्हा सर्वांसाठी क्रांतीपुरुष आहेत.आज साहेबांच्या अमृत महोत्सवानिमित्त त्यांना मनःपूर्वक हार्दिक सदिच्छा.
सीमा बोके, प्रदेशाध्यक्ष, जिजाऊ ब्रिगेड
Satyashodhak, Bahujan