नितीन सावंत, परभणीकर
विदर्भातील अकोला जिल्ह्यातील बाळापुर हे अत्यंत सुंदर असे तालुक्याचे ठिकाण आहे. हे शहर जुन्या ऐतिहासीक शहरांपैकी एक आहे. मन आणि म्हस या दोन नद्यांच्या संगमावर हे सुंदर शहर वसलेले आहे. विटा बनवण्यासाठी लागणाऱ्या पांढऱ्या सनवटाच्या मातीसाठी हे शहर आजही प्रसिद्ध आहे. पांढऱ्या मातीचे नैसर्गीक ढिगारे, बुरुज तुम्हाला या शहराच्या भोवती पहायला मिळतात. या दोन नदयांच्या संगमावर एक भव्य असा भुईकोट किल्लाही गतकाळात घडलेल्या ऐतिहासिक प्रसंगांची साक्ष देत उभा आहे. आज घडीला सरकारी कार्यालये आणि कामकाज याच किल्ल्यातून चालते. शिवाय या शहराचा ऐतिहासिक ठेवा म्हणून आनखी एक शिल्पाकृती - कलाकृती म्हणजे मिर्झा राजे जयसिंग यांचे वडिल जयसिंगच्या निधनानंतर आई सती गेली होती, त्या दोघांचे आठवणीत बांधलेले स्मारक होय. नदी किनारी दगडांमधे बांधलेले उंच असे हे स्मारक आजही सुस्थितीत उभे आहे. हे स्मृती स्थळ आहे.
एखादे गाव-शहर वसण्याची ते विकसीत होण्याची प्रक्रिया ते गाव शहर नदीकीनारी असेल तर साधारणतः दिड- दोन हजार वर्षापूर्वीची किंवा त्याहूनही जुनी मानवी लागते. बाळापुर शहराचा ऐतिहासिक कागदपत्रांच्या राजकीय घडामोडींचा इतिहास तसा साधारण हजार वर्षांपूर्वी पर्यंत जातो. परंतू हे बाळापुर राजकीय घडामोडी घडण्याच्याही आधी मनुष्यवस्तीखाली आलेला भुभाग आहे. नद्यांनी वाहून आनलेल्या सुपीक गाळाच्या संगमावर शेती करत, येथे मनुष्यवस्ती झाली आणि त्यानंतर सांस्कृतीक राजकीय घडामोडी घडून आल्याचे निष्कर्ष आपण मांडू शकतो. सांस्कृतीक उदय - विकासाच्या काळात या शहरात नाथ सांप्रदायाचाही मोठा मठ होता. ज्या मठात साधुसंत, महंतांच्या मोठमोठ्या समाध्या आजही आपल्या नदीकीनारी पहायला मिळतात. म्हणजे या भागामध्ये नाथ संप्रदायाचा वावर होता. बाळापुर शहर तथा संपूर्ण विदर्भावर प्रभाव टाकणारी आनखी एक सांस्कृतिक तथा अध्यात्मिक परंपरा याच मन-म्हस नदीकीनान्यावर शतकानुशतके उभी राहीली आहे. ती म्हणजे नक्षबंदी या शाखेची सुफ़ी परंपरा होय.
विदर्भातील या नक्षबंदी परंपरेचे प्रमुख सुफी संत 'हजरत सैय्यदशाह इनायतउल्ला नक्षबंदी र. अ. हे होत. विदर्भात 'नक्षबंदी' या सुफी परंपरेचा पहिला मठ स्थापन झाला तो याच बाळापुर शहरात 'मन' नदीकीनाऱ्यावर. इ.स. १६४९ ला बाळापुर शहरातून सुफी मताच्या प्रचाराला सुरुवात झाली होती. या मन' नदीकीनान्यावर उभारलेल्या नक्षबंदी मठाने पुढील काळात अनेक विद्वान, वैचारीक आचार्य दिले आहेत. वंशपरंपरागत चालत आलेल्या या मठाच्या सुफी संतांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
१) बाळापुरच्या नक्षबंदी खानकाहचे संस्थापक हजरत सैयादशाह इनायतउल्ला नक्षबंदी र.अ.
२)त्यांचे नातू हजरत सय्यदशाह जहिरुद्दीन नक्षबंदी र.अ.
३) मोहीबउल्ला यांचे दूसरे सुपुत्र हजरत सय्यदशाह जहिरुद्दीन नक्षबंदी यांचे धाकटे बंधु हजरत सय्यदशाह इमामोद्दीन नसबंदी र.अ.
४) हजरत सैय्यदशाह मासुम अवलीया नक्षबंदी र.अ. (प्रथम)
५) हजरत सय्यदशाह कलीमउल्ला नक्षबंदी र.अ.
६) हजरत सय्यदशाह मुजाहोद्दीन नक्षबंदी र. अ.
७) हजरत सय्यदशाह खलीलउल्ला नक्षबंदी र.अ.
८) हजरत सय्यदशाह मासुम मसना नक्षबंदी र.अ.
9) हजरत सय्यदशाह मुन्तजीबुद्दीन नक्षबंदी र. अ.
१०) हजरत सय्यदशाह इमामुल इस्लाम नक्षबंदी र. अ
या सर्व सुफी आचार्यांनी सामाजीक धार्मीक कार्ये तर केलीच, शिवाय साहित्तीक क्षेत्रातही फार मोठा ग्रंथठेवा आपल्या पश्चात मागे ठेवला आहे. महाराष्ट्रातील हा एकमेव असा मठ आहे की, ज्या मठात सर्वाधीक जुनी कागदपत्रे, सुफी संतांची हस्तलिखीते आणि ग्रंथ आहेत. इतर कोणत्याही दर्गाह, मठाला जो ऐतिहासीक दस्तावेजांचा वारसा जपता आला नाही, तो या मठाने आजतागायत सुस्थितीत जपुन ठेवला आहे. साडे तिनशे पेक्षा जास्त ग्रंथ आणि हस्तलिखीते या मठातील ग्रंथालयात आजही सुस्थितीत आहेत. ही हस्तलिखिते अरबी, फारसी भाषेत आहेत. ज्याची भाषांतरे उर्दू मराठीत करण्याची आज नितांत गरज आहे. बाळापुरच्या नक्षबंदी दर्गाहाच्या खानखाहमधे 'दारुलशफा' या न्यायनिवाड्याच्या परिसरात ही जुनी हस्तलिखीते, ग्रंथांचा ठेवा आणि या परंपरेवर आधारीत पुस्तके यांचे ग्रंथालय आहे. हे ग्रंथालय चालवण्याचे काम सईद तलाह नक्षबंदी हे करतात. ही हस्तलिखिते सुस्थितीत ठेवणे, आलेल्या लेखक, साहित्यिक, संशोधकांना माहिती पुरवणे, या परंपरेला घेऊन बाजारात आलेल्या पुस्तकांना देखील लायब्ररीत स्थान देणे, आणि आपल्या वारशाप्रती सजग राहुन, दर्गाहची सेवा करण्याचे काम सईद तलाह नक्षबंदी हे करतात. आम्ही दर्गाहाला भेट दिल्यानंतर सईद तलाह नक्षबंदी यांनी हे संपूर्ण ग्रंथालय दाखवले. अनेक संदर्भ दिले जगभरातून या मठाला भेटी देवून गेलेल्या लेखक साहित्तिक संशोधकांच्या जतन केलेल्या नोंदी त्यांनी दाखवल्या.
या नक्षबंदी परंपरेच्या बाळापुरच्या दर्गाहचे दोन भाग पडतात. एक रोजा बुद्रुक व दुसरा रोजा खुर्द. दर्गाहकडे जाताना प्रथम दर्शनी भच्य दगडी दरवाजा लागतो. या दरवाजाच्या दगडी कमानीतून आत जावे लागते. या जुन्या आणि उंच कमानीतून आत गेलात की आपल्याला समोर न्याय निवाडचाची जागा दिसते. भाऊबंदकी, कौटुंबिक भांडणे, गावातील महत्त्वाचे निर्णय, औषधोपचार, आदी गोष्टींचा न्याय निवाडा या भागात म्हणजे आजच्या रोजा बुद्रुक मधे होत असे. दर्गाहामधे प्रवेश करताच त्या काळातील व्यायामचे दगडी गोळे, डंबेल्स आदी, कुस्ती व व्यायामाचे संपूर्ण दगडी साधने दिसतात. मजारीकडे जाताना सुरवातीला वजुखाना व मुसाफिर खाना लागतो, त्यानंतर त्याच काळात बांधलेली सुंदर दगडी मस्जीद आपल्याला समोरच दिसते. या मस्जीदच्या समोर वजुखाना आहे. मुसाफिरखान्याच्या कोपऱ्यावर त्या काळातील रसविदयेचा दगडी ठोकळा आहे. सापसिडीच्या खेळाप्रमाणे दगडाला कोरलेल्या पाण्याच्या प्रवाहासाठीच्या लाईन आहेत. यातून औषधी बनस्पतीचे, कुटलेल्या रसाचे पाणी प्रवाहीत केले जायचे आणि ते रुग्णाला, गरजवंताला दिले जावचे, रतविद्येचे विविध प्रयोग करून दुर्धर रोगीवरील औषधे या मठात तयार केली जात असत. त्याचा हा 'तकलय बुलबुल' ठोकळा आहे. त्यानंतर छोट्या दरवाज्यातून आत गेलात की नक्षबंदी परंपरेच्या साधू संतांच्या बऱ्याच समाध्या दृष्टीस पडतात.
पहिली मोठी मुख्य मजार बाळापुरच्या खानखाचे संस्थापक हजरत सय्यदशाह इनायउल्ला नक्षबंदी र.अ. यांची आहे. या मजारीला लागुनच बाकी तिन मजारी त्यांच्या तिनही मुलांच्या आहेत. या एकुण चार मजारीच्या सर्व बाजुंना नक्षीदार दगडी जाळीची सजावट आहे. या मुख्य चार मजारीच्या सभोवताली इतरही काही मजारी आहेत. या सर्व मजारी अर्थात समाध्या आकाशाखाली उघड्यावर आहेत. या मजारींवर छत नाही.
इ. स. १६३८ साली मुघल कालखंडात संपूर्ण मठाचे बांधकाम झालेले आहे. या मठ्याला प्रत्येक कालखंडात राजाश्रय मिळालेला आहे. औरंगजेब, निजामाने या मठाला राजाश्रय दिला होता, त्याच बरोचर छत्रपती शिवाजी महाराज, नागपूरचे भोसले, आणि हिंदू राजे महाराजे सरदारांनी देखील या मठाला राजाश्रय दिला होता. वेळोवेळी चरीचशी मदतही केली होती. छत्रपती शिवरायांनी देखील. या मठात दोन मुक्काम केला होता. आणि पुढील काळात दररोज एक रुपया या प्रमाने मासिक ३० रुपये ही कायमस्वरूपी रक्कम मंठाला सुरु केली होती. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखील ही देनगी १९६० पर्यंत छत्रपती शिवरायांच्या भोसले घराण्याकडून येत होती. याचे ठोस पुरावे मठाने जपुन ठेवलेले आहेत. छत्रपती शिवरायांच्या संदर्भातील प्रसंग असा आहे कि १६६५ च्या पुरंदरच्या तहानुसार छत्रपती संभाजी महाराज यांनी मोघलांची सुभेदारी स्विकारली होती त्यांना बाळापुर आणि आवंडे या दख्खन प्रांतांची ही सुभेदारी दिली गेली होती. पुढे मोगलांनी या पुरंदरच्या तहाचा भंग केल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांनी बाळापुर परगण्या अंतर्गत असलेले मोठे बाजारपेठेचे कारंजा हे शहर लुटण्याचे ठरवले. ठरल्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांनी ३ ऑगस्ट १६७० रोजी कारंजा शहराची लुट केली आणि परतीचा प्रवास करताना त्यांनी बाळापुर येथे मुक्काम टाकला बाळापूर शहरात सुद्धा त्यांनी कर वसुली करून अनावा असे आदेश सैनिकांना दिले. करवसुली करत असताना काही सैनिक मान नादिकीनार्यावरील नक्षबंदी सुफी मठात शिरले, सैनिकांना पाहाताच सुफी संत हजरत इनायतउल्ला र.अ. यांनी आपल्या जवळीत काही सामान आणि आपला घोड़ा सैनिकांना सुपूर्द केला. हे मठातील सामान आणि घोडा घेवून सैनिक छत्रपती शिवाजी महाराजांकडे आले. आणि सैनिकांनी सर्व हकीकत महाराजांना सांगितली. तेव्हा एका संताच्या मठातून अशा वस्तू अनु नयेत म्हनून छत्रपती शिवाजी महाराज स्वतः ह्या वस्तू, घोडा परत करण्यासाठी आणि सुफी संताची भेट घेण्यासाठी स्वतः मठात दाखल झाले, तेव्हा हे सुफी संत ध्यानस्थ बसले होते. आपल्या वस्तू, घोडा जावून देखील हा संत निर्विकार ध्यानस्त पाहून शिवाजी महाराज अधिक प्रभावित झाले. त्यांनी वस्तु, घोडा परत केला. झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली. महाराज काही काळ या मठात राहिले. त्यानंतर जाताना शिवरायांनी या मठाची व्यवस्था केली. आजच्या चलनात सांगायचे झाले तर दररोज एक रुपया या प्रमाणे मासिक ३० रुपये रक्कम या खानखाहला महाराजांनी सुरु केली १९६० पर्यंत ही रक्कम मठाला भोसले घराण्याकडून येत होती.
त्याचबरोबर नागपुरकर भोसले आणि विदर्भातील मतब्बर सरदार, जहागीरदारांच्या प्रचंड आस्थेचा , जिव्हाळ्याचा निकटचा संबंध या दर्गाहाशी . नागपूरकर भोसले तर वेळोवेळी या दर्गाच्या दर्शनाला येत असत. दर्गाच्या महत्वाच्या बांधकामासाठी देखील त्यांनी मदत केलेली आहे. मठाच्या विरुध्द बाजुच्या नदीतीरावर गंगागीर महाराजांचा मठ आहे. या मठाचे गंगागीर महाराज आणि नक्षबंदी प्ररंपरेतील सुफी संतांचा फार जवळचा स्नेह होता. दोन्हीकडच्या मठांच्या प्रमुखांचे एकमेकांकडे जाणे येणे होत असे. महत्त्वाच्या सणवार उत्सवांमध्ये दोन्हीकडचेही साधुसंत व सुफी संत एकमेकांच्या उत्सवात सहभागी होत असत. त्यामुळे या मैत्रीचा आदर्श म्हणून गंगागीर महाराज गेल्यानंतर त्यांची समाधी सुफी परंपरेच्या या नक्शबंदी मठाने दफन विधी करून बांधल्याचे सांगितले जाते. त्यांची समाधी नक्शबंदी परंपरेच्या मठातच असल्याच सांगितले जाते.
नासधुसीचा आणि मोठचा जीवितहानीचा इतिहास विदर्भातल्या या भागाला फारसा नाही, त्याचे कारण या मठाने मध्यस्तीकरून मोठमोठे युद्धे भांडणे, थांबवलेली आहेत. सलोखा प्रेम, बंधुभाव जोपासण्यात बाळापुरच्या या नक्षबंदी परंपरेतील सर्वच सुफींचा रोल राहीलेला आहे. नक्षबंदी परंपरेतील बाळापुरच्या सुफी दर्गाहाच्या रोजा बुटुक नंतर दुसरा भाग म्हणजे रोजा खुर्द होय. रोजा बुद्रुक बघुन कमानीतून बाहेर आलात की बाहेर मोठे पटांगण दिसतते. पटांगणाच्या त्या कडेवर अगदी नदीकिनाऱ्यावर हा दुसरा मठ रोजा खुर्द लागतो. याही भागात छोट्या दरवाज्यातून आत गेलात की सुरवातीला भली मोठी उंच अशी दगडी मस्जीद दिसते, मस्जीदीसमोर बजु करण्यासाठीचा पाणी साठवलेला हौद दिसतो. या पाण्याच्या हौदाच्या आजुबाजुला रिकामी जागा आणि मजारी आहेत. अत्यंत सुंदर स्वच्छ, दगडांच्या फरशांचा हा परिसर आहे. मस्जीदच्या समोरच्या बाजुला छोटया दरवाज्यातून गेलात की हजरत सय्यदशाह जहुरूद्दीन नक्षबंदी र.अ. आणि हजरत सय्यदशाह मासुम ओलिया नक्षबंदी र.अ. यांच्या मजारी दिसतात. या मजारी अगदी बंद खोलीत असल्यासारख्या आहेत. मजारींना वेडा घालण्यासाठी सर्व बाजूंनी छोटी बोळ, अरुंद रस्ता सोडला आहे. या मजारींचे दर्शन घेऊन भक्त बाहेर पडताना आणखी काही मजारी म्हणजे समाध्या निदर्शनास येतात. या मजारींवर लाल रंगाचे गारगोट्या सारखे अत्यंत मौल्यान असे छोटे छोटे दगड अंथरलेले आहेत. हे दगड मन आणि पूर्णा नदीपात्रात सापडतात. अन्यत्र कोणत्याही नदी पात्रात हे दगड मिळत नाहीत. हे लाल रंगाचे दगड अंधारात त्यावर टॉर्च मारल्यास चामकतात. खुर्दमधे जागोजागी शिलालेख कोरलेले आहेत. मस्जीदीवर देखील काही शिलालेख दिसतात. या रोजा खुर्दच्या आतील भागातून नदीकिनारा आणि शहराच्या एका कडेचा सुंदर नजारा डोळ्याचे पारणे फेडतो. या रोजा खुर्द मध्ये बांधलेल्या उंच आशा मनोऱ्याच्या गॅलरीतून समोर वाहणारी नदी, तिच्या किनाऱ्यावर वसलेलं हे शहर, लोकांची वर्दळ आणि ये जा तासनतास शांतपणे बघत बसता बेईल, असा हा आंतरिक सुकून देणारा परिसर आहे.
विदर्भात गेले ३७० वर्षांपासून सुरु असलेली ही नक्षबंदी परंपरेची खानखाहाची शाखा इराण या देशातील मोठ्या नावाजलेल्या घराण्यातून आलेली आहे. बाळापुरातील नक्षबंदी खानकाहचे संस्थापक ह. सय्यदशाह इनायतउल्ला नक्षबंदी र. अ. यांचे पूर्वज मुळचे बागदादचे. इराण देशातील राजघराण्यशी निकटवर्ती संबंध असलेला हा नक्षबंदी सुफी घराणा होता. एकूण या स्नेहातून इराणच्या बादशाहाने या घराण्याशी वैवाहीक संबंध निर्माण व्हावेत अशी भावना व्यक्त केली होती. या घराण्याचे पूर्वज हजरत सय्यदशाह मुसा र. अ.यांनी मात्र नकार दिला होता. यामुळे बादशाह नाराज झाला. त्यातून हजरत सय्यदशाह मुसा यांनी इराण प्रांत सोडला व ते पुढे अनेक शिष्य जोडत सुफी मताचा प्रचार प्रसार करत लाहोर येथे वास्तव्याला आले. पुढे हजरत सय्यदशहा मुसा यांचे सुपुत्र हजरत सय्यदशाह मोहम्मद खैराबंद र. अ. हे सुफी नक्षबंदी परंपरेची दिक्षा घेऊन भारतात आले व बुऱ्हाणपुर येथे सुरवातीला काही काळ ते वास्तव्यास होते. नंतर पुढील काळात भ्रमण करत ते सोलापूर येथे आले. आणि कायमचे स्थाईक झाले आणि तिथेच निर्वातले. सोलापुर शहरात त्यांची समाधी आहे. बाळापुरच्या नक्षबंदी मठाच्या संस्थापकांचे हे वडील होते. बाळापुरच्या धर्तीवर नक्षबंदी सुफी मताचा पहिला मठ स्थापण करणारे हजरत सय्यदशाह इनायतउल्ला नक्षबंदी र. अ. यांचा जन्म एमनाबाद येथे झाला होता. ते वडिलांच्या सोबत १६४६ ता भारतात आले, तेव्हा ते १२ वर्षीचे होते. याद्वारे त्यांचा जन्म १६३५ या मानला जातो. अशी नोंद विदर्भातील सुफी संत या ग्रंथात डॉ. किशन मारोती बानखेडे यांनी केली आहे. म्हणजे वयाच्या अवध्या १९ व्या वर्षी १६५४ रोजी बाळापुर येथे नक्षबंदी खानखाह सुरु करण्यात आली होती. हे १९ वर्षीचे सुफी पूर्वजांच्या अनुभवी वारस्याचे, संस्थापक होते हजरत सय्यदशाह इनायतउल्ला नक्षबंदी र. अ. होत.
आजतागायत या मठाने एकुण दहा धर्मगुरु दिले आहेत. शिवाय वा मठाचे थेट वंशज असणारे अनेक कुटुंबे सुद्धा ही नक्षबंदी सुफी विचारधारा मनोभावे पाळतात. उरुस भरवतात. या विचारधारेच्या प्रती आत्मियता असलेले त्यांचे अनेक वंशज आपापल्या क्षेत्रात नामांकित हुद्द्यांवर आहेत. महाराष्ट्रराच्या राजकारणात नावाजलेले नाव असणाऱ्या, राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा महाराष्ट्र सरकारच्या राज्यमंत्री राहिलेल्या मा. फौजीया खान ताई या नक्षबंदी सुफी परंपरेच्या वेट वंशज आहेत. या मठाचा वंशवेल पाहताना त्यात मा. फौजिया म्याम यांचेही नाव दिसून आले.
नक्षबंदी सुफी खानखाहचे संस्थापक हजरत सय्यदशाह इनायउल्ला नक्षबंदी र. अ.यांचा उरुस २५ सफरला भरतो. हा उरुस दोन दिवसाचा असतो. पहिल्या दिवसी रात्री आठ वाजता संदल निघतेः दुसऱ्या दिवसी सकाळी "गुसल (समाधीला अंघोळ) नंतर सायंकाळी पाच ते सात वाजता कुराण पठण होते. नंतर दोन घंटे प्रवचने, भाषणे होतात. संदल झाल्यानंतर लंगर लागतो. ही नक्षबंदी परंपरेची खानखाह, सपूर्ण मठ १५ एकर जमीनीर वसलेला आहे. त्याचबरोबर हजरत सय्यदशाह जहिरोहीन नक्षबंदी यांचाही ऊरूस या मठात होतो. हा उरुस २५/२८ रज्जबच्या महिन्यात असतो. याही दर्गाहमध्ये पुर्वीप्रमाणे सर्व प्रथा-परंपरांचे पालन केले जाते. दोनही उरुसांमध्ये वंशजांच्या हस्ते मजारीवर चादर चढविली जाते. अशाप्रकारे बाळापुरच्या सुफी परंपरेने संपूर्ण विदर्भावर आपला प्रभाव टाकलेला दिसुन येतो. मुस्लीम आणि मुस्लमेत्तर, आठरा पगड जातीचे लोक या मठात ये-जा करतात. सलोखा आणि एकात्मता जपण्याचे महान कार्य या मठाने केले आहे.
बाळापुर शहरात कादरीया या सूफी परंपरेच्या दोन शाखा देखील कार्यरत आहेत. 'खानखा-ए-कादरीया, 'दिवानमीयाँ या समान नावाच्या दोन शाखा आहेत. त्यापैकी जुना शहर भागातील कादरीया या मठाला भेट दिली व डॉ. सय्यद मुशरफ कादरी यांच्याकडून ही परंपरा समजून घेतली. रुग्णांची सेवा चालू असताना देखील आपला अमूल्य वेळ देवून डॉक्टरांनी बरीच चर्चा केली. महत्वाचे संदर्भ दिले, रुग्णांच्या सेवेचा अत्यल्प दराचा भाव फलक पाहून मी अगोदरच भारावून गेलो होतो. आणि त्यात एक दोन पेशंटला तर त्यांनी पैसे न घेतही पाठवून दिल्याचे माझ्या लक्षात आले. अशाप्रकारे सुफिंचा परोपकाराचा वारसा आजही बाळापुर शहरात पाहायला मिळतो. या एकुण बाळापुर अभ्यास दौन्यात सोबत होते, सुफी साहित्याचे अभ्यासक डॉ. किशोर वानखेडे, महादेव सुकाळे सर आणि पत्रकार विवेक चांदुरकर हे. या सर्वांच्या शिवाय इतकी सखोल माहिती मिळणं अशक्य होतं. शिवाय डॉ. किशोर वानखेडे यांचा या बाळापुर शहराच्या ऐतिहासीक परंपरेवर प्रचंड अभ्यास आहे. विदर्भातील सूफी संत' हा त्यांचा ग्रंथ बाळापुरच्या या नक्षबंदी वरंपरेवरचा दस्तावेज ग्रंथ आहे, हस्तलीखीते, उर्दू ग्रंथ अभ्यासून त्यांनी सुफी विचारधारेवर खुप मोठे काम केले आहे. त्यांच्या सहवासामुळे बाळापुर शहरातील बारीक सारीक गोस्टीही पहता आल्या, समजून घेता आल्या. शिवाय सईद तलाह नक्षबंदी यांनीही फार सुंदर माहिती दिली त्याबद्दल त्यांचेही आभार आणि डॉ. किशोर वानखेडे, पत्रकार विवेक चांदुरकर आणि महादेव सुकाळे या तिघांचेही मनापासून आभार.
नितीन सावंत, परभणीकर