तिळवणी : 4 जानेवारी 2025 - तिळवणी गावामध्ये सावित्री जन्मोत्सवानिमित्त सामाजिक सलोखा कार्यक्रम घेण्यात आला. या निमित्ताने गावांतील सर्व जाती धर्मातील महिलांना एकत्र करण्याचा व त्यांचा सन्मान करण्याचा प्रयत्न केला. या कार्यक्रमांची सुरुवात "साऊ पेटती मशाल" या गाण्याने कऱण्यात आली. कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक रुचिता पाटील यांनी केले. त्यानंतर सावित्री फुले आणि फातिमा शेख यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. विभावरी नकाते यांनी सावित्री फुलेंचा संघर्ष आणि आत्ताच्या काळातील महिलांचे संघर्ष या मुद्द्यांबाबत संवाद साधला. गावामध्ये सुरक्षित वातावरण, सोयी सुविधा व्हाव्यात यासाठी स्वतः आपण पुढाकार घेतला पाहिजे. मानवी मूल्यांचे जतन आणि स्वीकार केला पाहिजे, या अनुषंगाने सुद्धा चर्चा झाली.
यावेळी विशेष म्हणजे सावित्री फुले यांच्या कपाळावरची चिरी प्रतीकात्मक स्वरूपात आपण एकमेकींना लावण्याबद्दल संवाद साधला आणि या निमित्ताने माणूस म्हणून स्वतःचा स्वीकार केला पाहिजे याची कृतज्ञ जाणीव केली. महिलांचे हळदी कुंकू, बारशाचे कार्यक्रम, सुहासिनीचा मान यासारख्या अनेक प्रसंगांमध्ये विधवा, एकल महिला, मूल नसलेल्या, फक्त मुली असणाऱ्या महिलांना अशा कार्यक्रमांपासून दूर ठेवले जाते. पण या कार्यक्रमांमध्ये आपण सर्व महिलांना त्यांच्याशी संवाद करून त्यांना विश्वास देऊन, विशेष म्हणजे महिलांची संमती घेऊन आनंदाने चिरी लावण्यात आली. यानंतर Women Anthem आणि वरवंटा या शॉर्टफिल्म्स दाखवण्यात आल्या. शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून स्नेहल माळी यांनी महिलांशी संवाद साधला. महिला म्हणून एकमेकांचा आदर, प्रेमभाव निर्माण करणे, एकमेकींना कमी न लेखता, एकमेकींना प्रोत्साहन देणे, जाती-धर्मातील राजकारणाच्या कचाट्यात न अडकता शिक्षण, रोजगार, आरोग्य, सुरक्षितता यासारख्या प्रश्नांवर एकमेकींची साथ देऊन गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण करत राहूया. यासारखे मुद्दे घेऊन महिलांशी चर्चा करण्यात आली. विशेष म्हणजे या कार्यक्रमात गावातील पाच महिलांचा सत्कार करण्यात आला ज्यांनी संघर्षातून आणि पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आपल्या कुटुंबाचा सांभाळ केला. या महिलांकडून गावातील महिलांना प्रेरणा मिळावी हाच यामागचा उद्देश होता. उज्वला भीमाशंकर बुटे - शिक्षिका , बेबीताई दादू आवळे - पंक्चर दुकान, सीमा महादेव पाटील - आशा सेविका, दिपाली प्रमोद कांबळे - एकल महिला, पुष्पा कांबळे - अंगणवाडी सेविका या महिलांचे सत्कार करण्यात आले. सत्कार प्राप्तीनी थोडक्यात त्यांच्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे आभार ज्योती गायकवाड ताईंनी केले. कार्यक्रमाचा समारोप सगळ्यांना गोड पेढे देऊन करण्यात आला. महिलांनी पेढे एकमेकीना भरूवून आनंद साजरा केला. संविधानातील हक्क आणि मूल्ये जाणून घेण्यासाठी पोस्टर्स लावण्यात आले होते. विशेष उपस्थिती गावातील ग्रामपंचायत सदस्य महिला नीता चव्हाण, ज्योती वानखेडे (मुंबई, पी.एस.आय), कुमार विद्यामंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका कांबळे मॅडम तसेच संविधान गटातील महिला उपस्थित होत्या.
मराठा, बौद्ध, जैन, मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजातून महिला कार्यक्रमासाठी आल्या होत्या. तसेच इचलकरंजी वरून संविधान परिवारातील कार्यकर्ते दामोदर कोळी, अमोल पाटील, रोहित दळवी, वैभवी आढाव आणि गावातील संदीप कदम उपस्थित होते. उपस्थिती महिला 30 आणि मुले व मुली 15 असे एकूण 45 संख्या होती. विशेष सहकार्य : कुमार विद्या मंदिर तिळवणी मुख्याध्यापिका आणि शिक्षक स्टाफ, संदीप कदम, शुभांगी जाधव
Satyashodhak, Mahatma phule, Savitri Mata Phule