सत्यशोधक विधीवत गृहप्रवेश

     अन्न, वस्त्र व निवारा ह्या माणसाच्या मूलभूत गरजा समजल्या जातात. त्यामुळे आयुष्यात स्वतःचं घर असावं ही ओढ जीवनात लागलेली असणे खूप स्वाभाविक आहे. म्हणूनच घर बांधले की घराचं स्वप्न पूर्ण झालं असं म्हणतात. आमचे मित्र कपिल थुटे हेही याला अपवाद राहिलेले नाही. राज्य परिवहन महामंडळाच्या तंत्रज्ञ म्हणून सेवेतून निवृत्ती नंतर कपिल यांनी घरबांधकाम पूर्ण केले. सेवेत असताना मिळणाऱ्या वेतनावर उपजीविका करत बहिणभावाचे शिक्षण,लग्न, आईवडिलांचा सांभाळ, मुलांचे शिक्षण, कौटुंबिक उत्तरदायित्व पार पाडत असताना घर बांधायचे राहूनच गेले, अन् कपिलला सेवानिवृत्तीही जवळ आली ते कळलेच नाही. शेवटी घराचे स्वप्न सेवानिवृत्तीनंतर पूर्ण झाले.

Satyashodhak vidhivat Griha Pravesh     नोकरीच्या पूर्वी कपिल थुटे मंडल चळवळीत सक्रीय असायचा. ओबीसीच्या सामाजिक न्यायाच्या लढ्यातील ते एक संयमी तितकेच सत्यान्वेशी शिलेदार होते. ओबीसी विद्यार्थी संघटना वर्धा जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात ओबीसींना भान जागरण देण्याचे काम करत असताना ओबीसी विद्यार्थी संघटनेच्या वाटचालीत कपिलचा लक्षणीय वाटा राहिलेला आहे. मंडलचा लढा विदर्भात जोर पकडत असताना, नव्वदच्या दशकात वर्धा शहरात ओबीसी विद्यार्थी व्यक्तिमत्त्व विकास शिबिरं आयोजित केल्या जात. वर्धा शहरात शिबिरे आयोजनासाठी कपिल हमखास सहयोगी असायचा. शिबिरातून संपर्कात येणाऱ्या तरुणांशी आपुलकीने भावनिक सलोखा जपणं हे तत्कालीन कार्यकर्त्यांचं एक वैशिष्ट्य. कपिलनं हे सातत्याने जोपासलं.ओबीसी चळवळ,सत्यशोधक समाजाचे कार्य करत असतानाच,विद्रोही सांस्कृतिक चळवळीत सक्रियता यामुळे कपिलच्या कार्याबद्दलची अधिक व्याप्ती लक्षात येते. आणि सत्यशोधक पद्धतीने त्यांनी केलेले लग्न , आणि नवीन वास्तूमध्ये केलेला गृहप्रवेश म्हणजे त्यांची वैचारिक बांधिलकी आणि मनाला विलक्षण समाधान, आनंद व प्रसन्नता देणारा उत्सव होय.

     "नव्याने बांधलेल्या वा विकत घेतलेल्या घरात पहिल्यांदा प्रवेश करणे , हा व्यक्तीच्या व कुटुंबाच्या जीवनातील अतिशय समाधानाचा , कृतार्थतेचा आणि परिपूर्तीचा सण असतो . या घरासाठी त्या कुटुंबाने अनेक प्रकारचे कष्ट घेतलेले असतात , ताण सहन केलेले असतात , वेळ आणि पैसा खर्च केलेला असतो , प्रचंड धावपळ केलेली असते आणि एवढे सगळे केल्यानंतर स्वत:च्या हक्काच्या घरात प्रवेश करण्याचा क्षण आलेला असतो . स्वतःच्या निवासस्थानातील स्वातंत्र्याचा खरा आस्वाद घेण्याची वेळ आलेली असते . स्वाभाविकच , कुटुंबातील सर्वांची मने त्या घरात अधिकृतपणे पहिल्यांदा प्रवेश करण्यासाठी उत्सुक झालेली असतात ."

     मोठ्या आनंदाच्या वातावरणात कपिलच्या घराचा गृहप्रवेश सोहळा सत्यशोधक पद्धतीने साजरा झाला.

     या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.जनार्दन देवतळे सर होते तर, प्रमुख अतिथी प्रा नूतन माळवी,डॉ अशोक चोपडे, बाबा बिडकर, अनुज हुलके व गजेंद्र सुरकार हे होते. राष्ट्रमाता जिजाऊ, कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करून महात्मा फुले रचित

     "सत्य सर्वांचे आदिघर सर्व धर्माचे माहेर..."

     आणि

     "स्त्रिपुरुष सर्व कष्टकरी व्हावे..."

     हे अखंड बाबा बिडकर आणि अनुज हुलके यांनी गाऊन सुरुवात केली.कपिल थुटे यांनी घराचे बांधकामासाठी मदत करणारे, गवंडी, मिस्त्री, ईलेक्ट्रीशन, प्लंबर, वेल्डिंग, रंगरंगोटी कारागीर यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सत्यशोधकी विधीनुसार त्यांंचा शाल अर्पण करून सन्मान करण्यात आला.

     याप्रसंगी सत्यशोधक गृहप्रवेश विधीचे औचित्य आणि बळीजनांची सांस्कृतिक परंपरा यासंबंधी मान्यवर अतिथींनी मार्गदर्शन करुन उपस्थित प्रियजनांशी संवाद साधला. प्रा नूतन माळवी यांनी अशा प्ररकारचा गृहप्रवेश कार्यक्रम घेण्यामागील हेतू विशद केला. कपिल थुटे मागील सुमारे ३५ वर्षे जिजाऊ, शिवराय,महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर चालणाऱ्या चळवळीत सक्रीय असून सत्यशोधकी विचाराचा पाईक आहे. त्यांची सत्यशोधकी विचाराची बांधीलकी आपल्याला या कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिकेतून समजून घ्यावी लागेल.

     आजची एकुणच सामाजिक राजकीय परिस्थिती आणि सत्यशोधक समाजाची चळवळ याचे महत्व त्यांनी समजून सांगितले.

     अनुज हुलके यांनी सत्यशोधक विधीचा पर्याय का निर्माण झाला ते सांगितले. विवाह, गृहप्रवेश, नामकरण, ग्रहशांती, पिंडदान इ.निमित्ताने पुरोहित लुडबुड करुन स्त्रिशुद्रातिशूद्रांचे अमानवी शोषण करतात. सत्यशोधक समाजाच्या तत्वानुसार शुद्रातिशुद्रांनी धर्मकृत्ये ब्राह्मण पुरोहिताकडून करून घेणे निषिद्ध मानण्यात येते. पाखंडी धर्माच्या नावाखाली भटपुजाऱ्यांनी पोट भरण्यासाठी धार्मिक विधी करायचे आणि त्यामाध्यमातून भोळ्याभाबड्या लोकांना धार्मिक गुलामी, अंधश्रद्धा, कर्मकांड, जातीयता यात गुंतवून ठेवायचे.या शोषणव्यवस्थेला वाचा फोडण्यासाठी ब्राम्हणपुरोहिताशिवाय धार्मिक विधी करण्यात येऊ लागले,त्यातून सत्यशोधक विधीवत लग्न, गृहप्रवेश, पिंडदान, नामकरण करण्याचे पर्याय तयार झाले. सगळीकडे धर्माच्या मिषाने शोषणयंत्रणा आजही तगडी असताना ब्राम्हणी वर्चस्व झुगारून देण्यासाठी अशाप्रकारे पाऊलं उचलणं गरजेचे आहे.

     बाबा बिडकर म्हणाले की, कपिल थुटे हे अनेक वर्षे सत्यशोधक चळवळीत सक्रीय असून सत्यशोधक पद्धतीने गृहप्रवेश कार्यक्रम आयोजित करुन मित्रमंडळी आणि नातेवाईक यांच्या समोर एक आदर्श उभा केला. वैयक्तिक जीवनातील जबाबदारी सांभाळूनही सामाजिक कार्यकर्ते नेटाने काम करत असतात, हीच सत्यशोधकी परंपरा आहे. सम्राट बळीराजा,गौतम बुद्ध, संत कबीर,संत तुकाराम,छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले,सावित्रीबाई फुले,गाडगेबाबा, बाबासाहेब आंबेडकर यांनी भेदभाव विषमतानिर्मूलनासाठी मोठा लढा उभा केला.त्यामुळे आजचे वर्तमान स्वातंत्र्य लोक हितावह ठरत आहे. या तमाम महामानवांचा वारसा चालविणे हाच अशा प्रकारच्या कार्यक्रमामागील हेतू आहे.

     डॉ अशोक चोपडे यांनी सांगितले की, सत्यशोधक पद्धतीने अनेक कार्यक्रम होऊ लागल्याने ही प्रथा मोठ्या प्रमाणात कष्टकरी शेतकरी आणि मध्यम जातीतील ओबीसी लोकांमध्ये रुढ होऊन ब्राह्मण पुजाऱ्याशिवाय लोक कार्य करु लागले. अठरापगड जातीतील पुजारी तयार होऊ लागले.आणि धार्मिक विधी करु लागले.शिक्षण क्रांतीसोबतच सांस्कृतिक संघर्ष उभा राहून आत्मसन्मान जागा होऊ लागला. हे फार महत्त्वाचे काम सत्यशोधक चळवळीमुळे होत गेले.पापपुण्य या संकल्पना थोतांड असून शिक्षण घेऊनच माणूस सुखी होणे शक्य आहे. त्यामुळे अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा सोडून भिती सोडून समाज भयमुक्त व भटमुक्त झाला पाहिजे ही सत्यशोधकी भूमिका समजून घ्यावी लागेल.

     गजेंद्र सुरकार यांनी वास्तुशास्त्र आणि अंधश्रद्धा याविषयी संवाद साधला. ते म्हणाले, दक्षिण दिशा अपवित्र मानली जाते पण बाजारपेठेत कित्येक दुकान दक्षिणमुखी असतात,तरी धंदा चांगला तेजीत चालतो.प्रचंड नफेखोरी, लबाडी करुन दुकानदार श्रीमंत होत असतात. त्यामुळे थोतांड वास्तुशास्त्रापेक्षा शुद्ध हवा ऊन पाऊस या आरोग्यदायी नैसर्गिक बाबी ध्यानात घेऊन फार कर्जबाजारीपणा न करता घराचा निवारा म्हणून विचार करावा.

     प्रा. जनार्दन देवतळे अध्यक्षीय मार्गदर्शन करताना म्हणाले, अनेक चुकीच्या रुढी परंपरा ह्या अज्ञान व भिती यामुळे समाजाला घातक ठरल्या. बहुजन समाजाला शिक्षणापासून दूर ठेवून उच्चजातीय समूह शोषण करत राहिले. सत्यनारायण पूजा, इत्यादी कर्मकांड व व्रतवैकल्ये यातून धार्मिक गुलामी लादून शोषण व्यवस्था पक्की केली. याविरुद्ध महामानव निकराची लढाई लढत आलेत. तो वारसा आपण सर्वांनी समजून घेतला पाहिजे. त्यासाठी च कपिल थुटे यांच्या ग्रुहप्रवेशाच्या या कार्यक्रमाचे प्रयोजन आहे. आपणही अशाप्रकारे कित्ता गिरवून धार्मिक, सांस्कृतिक स्वातंत्र्याचा उद्घोष करावा. याप्रसंगी सत्यशोधक समाजाचे मा.गुणवंत डकरे वर्धा जिल्हा अध्यक्ष मा.टेमराज माले नागपूर जिल्हा अध्यक्ष तसेच नरेंद्र सहस्रबुद्धे संघटक सत्यशोधक समाज नागपूर आणि मित्रपरिवार व नातेवाईक नामदेवराव येरेकर, राजेंद्र पांडे ,पंकज येरेकार सरोज घुबडे ,विजय थुटे, गोविंदराव थुटे , प्रा.चंद्रभान जी वाडेकर सर,नितीन वाडेकर प्रामुख्याने उपस्थित होते.

     कपिलच्या जडणघडणीत अतिशय कष्ट करून तसेच कौटुंबिक सांभाळ करणाऱ्या आई राधाबाई थुटे यांचा शाल देऊन कृतज्ञतापूर्वक सन्मान करण्यात आला. कपिल, कल्पना थुटे, सुमेध, प्रज्ञा, यश शारदा खूप उत्साहाने कार्यक्रमात कार्यमग्न होते.

- अनुज हुलके

Satyashodhak, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan, Mandal commission
Share on Twitter
Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209