लेखकः -प्रा. श्रावण देवरे
प्रा. लक्ष्मण हाके, नवनाथ आबा वाघमारे व ऍड. मंगेश ससाणे या नवतरूणांच्या उपोषणाचे पहिले फलित हे आहे की, हे उपोषण अंतरवली सराटीत असलेल्या वडीगोद्री गावात आयोजित केल्याने लोकशाही मार्गाने ‘‘घर मे घुस के मारा’’ असा मेसेज जनतेत गेला व जरांगे बॅकफूटवर गेला. दुसरे फलित हे आहे की जरांगेला धनगर आरक्षणाला पाठींबा देण्यासाठी जावे लागले. प्रा. लक्ष्मणराव हाके हे धनगर आहेत म्हणून धनगर समाजाची सहानुभूती मिळविण्यासाठी व फूट पाडण्यासाठी जरांगे तेथे गेला. धनगरांमध्ये फुट पाडण्याचा शकूनी कावा जरांगेला करावा लागला. परंतू समस्त धनगर तरूण इतर ओबीसी तरूणांप्रमाणेच हाके, वाघमारे व ससाणेंच्या पाठीशी आजही खंबीरपणे उभा आहे, हे नंतरच्या अभिवादन दौर्यावरून सिद्ध झाले व जरांगेचे षडयंत्र उघडे पाडले.
धनगर आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या तरूणांनी जरांगेचा बामणी-कावा ओळखून त्याला लाथ मारून हाकलून लावले पाहिजे होते. परंतू बामणांच्या सांगण्यावरून धारदार शस्त्रांनी मारायला आलेल्या धोंडीबा कुंभाराला तात्यासाहेब महात्मा फुलेंनी शिक्षण देऊन महापंडित बनविले, ही आमची ओबीसींची महान संस्कृती! गावबंदीचे बोर्ड लावून बाहेरून येणार्या पाहुण्यांना हाकलून लावणारी संस्कारहीन मराठा जात कुठे आणी ओबीसी आरक्षणच खतम करायला निघालेल्या कावेबाज जरांगेचं स्वागत करणारे धनगर उपोषणाकर्ते कुठे? जरांगेच्या बापाच्या वयाच्या भुजबळसाहेबांना शिव्या देणारा जरांगे संस्कारहीन व उनाडटप्पू म्हटला पाहिजे. धनगर उपोषणकर्त्यांच्या पायाशी बसण्याची लायकी नसलेल्या जरांगेला उशासी बसवले, हा आमच्या कार्यकर्त्यांचा मोठेपणा होय!!
सर्वात महत्वाचे फलित हे आहे की, बाळासाहेब प्रकाश आंबेडकर पहिल्यांदाच ओबीसी उपोषण कार्यक्रमास भेट देण्यासाठी गेलेत. या पूर्वी आम्ही ओबीसी आरक्षण बचावासाठी आझाद मैदानावर दोन मोर्चे व दोन धरणे आंदोलने केलीत. बाळासाहेब आंबेडकर यांना एकदा प्रमुख पाहुणे म्हणून व एकदा उद्घाटक म्हणून सन्मानाने निमंत्रित केले होते. प्रकाश आंबेडकर आजपर्यंत ओबीसींनी आयोजित केलेल्या एकाही आंदोलनात उपस्थित राहीलेले नाहीत. निवडणूकीच्या तोंडावर असलेल्या 2-3 सभांना ते ओबीसी मतांसाठी गेलेत, हा अपवाद आहे. अर्थात अशा निवडणूक-पूर्व सभांना ब्राह्मण-मराठा नेतेही निमंत्रण नसतांना बळजबरी स्टेजवर जाऊन बसतात, हा आमचा अनुभव आहे. जरांगेच्या उपोषणाला सडेतोड उत्तर म्हणून त्याचवेळी चंद्रपूरात ओबीसी नेते रविंद्र टोंगे उपोषणाला बसले होते. जरांगेच्या उपोषणाला भेट दिल्यानंतर बाळासाहेब आंबेडकर रविन्द्र टोंगेंच्या उपोषणाला भेट द्यायला जातील अशी आमची भाबडी आशा होती. परंतू ओबीसींनी आयोजित केलेल्या आंदोलनाच्या कार्यक्रमांना जायचेच नाही, असे त्यांनी ठरविलेले असल्याने हाके व वाघमारेंच्या उपोषणाला भेट द्यायला ते जाणारच नाहीत, असा निष्कर्ष निघत होता.
परंतू प्रथमच बाळासाहेब आंबेडकरांनी आपला नियम तोडला व दिनांक 21 जून 2024 रोजी ते हाके-वाघमारेंच्या उपोषणाला भेट देण्यासाठी वडीगोद्रीला गेलेत. या बद्दल मी त्यांचे जाहीर आभारही मानले व अभिनंदनही केले. परंतू त्यासाठी मला 8 जून 2024 रोजी त्यांच्यावर एक लेख प्रकाशित करावा लागला. या लेखाचा बाळासाहेबांवर पॉझिटिव्ह परिणाम झाला व नियम तोडून ते हाके व वाघमारेंच्या भेटीला 21 जून रोजी गेलेत. जरांगेच्या उपोषणाला ‘एकतर्फी’ पाठींबा देऊन आपण फार मोठी चूक केली, हे बाळासाहेब आंबेडकरांच्या लक्षात आले असावे व ही चूक सुधारण्यासाठी ते हाके-वाघमारेंच्या उपोषणाला भेट द्यायला गेलेत. हे या उपोषण आंदोलनाचे मोठे फलित म्हटले पाहिजे.
2024 च्या लोकसभा निवडणूका नुकत्याच पार पडलेल्या होत्या व या निवडणूकीत ओबीसी उमेदवार पराभूत झालेले होते. त्यामुळे ओबीसी तरूणांमध्ये प्रचंड निराशा पसरलेली होती. याचा फायदा जरांगेने उचलायचा ठरवला. अशा परिस्थीतीत आपण मराठ्यांना आक्रमक केले तर निश्चितच आपल्या ‘ओबीसीमधून मराठा आरक्षणाचे षडयंत्र’ यशस्वी होऊ शकते. म्हणूण जरांगे लोकसभा निवडणूकीनंतर ताबडतोब उपोषणाला बसला व त्याने सगेसोयरेचं नाटक सुरू केलं! लोकसभा निवडणूकीतील अपयशाने निराश झालेल्या ओबीसींकडून विरोध होणार नाही, असे जरांगेला वाटले. परंतू जरांगेचा हा (गैर) समज हाके, वाघमारे व ससाणेंनी घणाघाती घाव घालून तोडला. हे आणखी एक फार मोठे फलित या ओबीसी उपोषण आंदोलनाचे आहे.
यापुर्वी ओबीसी लोक सभा-संमेलनाला जात होतेच, परंतू येण्या-जाण्यासाठी वाहनाची व्यवस्था व जेवण्या-खाण्याची व्यवस्था असेल तरच तो घराबाहेर पडत होता. अशी खर्चिक व्यवस्था ओबीसी नेता किंवा ओबीसी कार्यकर्ता करूच शकत नाही. कारण ओबीसींकडे ना कारखाने, ना बँका, ना शिक्षणसंस्था! साखर कारखाने, बँका-पतपेढ्या, सुत गिरण्या, दुध डेअर्या, सोसायट्या या सारख्या सार्वजनिक संस्थांमध्ये करोडो रूपयांचा भ्रष्टाचार करून त्यातील काही लाख रुपये खर्चून सभा-सम्मेलने यशस्वी केली जातात व त्यातून राजकीय सत्ता मिळवितात. जनतेचा सार्वजनिक पैसा उधळूनच सभा-संमेलने व मोर्चा-धरणे आंदोलने होत असतात. आणी अशाप्रकारची आंदोलने मराठा लोकच करू शकतात, कारण ही साधने फक्त मराठ्यांकडेच आहेत. त्यामुळे ओबीसींकडून आपल्याला फारसा आक्रमक विरोध होणार नाही, याची खात्री जरांगेला होती. जरांगेच्या या खात्रीला कचाकच कात्री लावण्याचे काम ओबीसींनी करून दाखविले. जरांगेचा हा गैरसमज भुजबळांच्या लाखांच्या महासभांनी व हाके-वाघमारेंच्या उपोषणाने नष्ट केला.
ओबीसी हा समाजघटक रिकामटेकडा समाज नाही. पांढरे कपडे घालून मारोतीच्या पारावर बसून चकाट्या पिटणे, येणार्या-जाणार्यांची छेळ काढणे व आज कोणत्या पुढार्याची कोठे सभा आहे का याचा शोध घेणार्या रिकामटेकड्या चांडाळ चौकडीत सहभागी होणे ओबीसीला अजिबात परवडणारे नसते. ओबीसी समाज स्वतः कष्ट करून कुटुंब चालवत असतो. ओबीसी माणूस शेतकरी असला तरी मजूर लावून शेती करण्याइका तो ऐषआरामी नाही व तेवढी त्याची आर्थिक क्षमताही नाही. नाभिक, सुतार, लोहार, कुंभार या मायक्रो ओबीसी जातीतील अख्खे कुटूंब राबते तेव्हा संध्याकाळची गुजराण होते. नाभिक बांधवाने आंदोलनात सहभागी व्हायचे ठरविले तर त्याला किमान दोन दिवस कटिंग सलून बंद ठेवावे लागते. यातून त्याच्या कुटुंबाची उपासमार ठरलेलीच असते. धनगराला तर मेंढ्या उपाशी ठेवून आंदोलनात सहभागी होणे शक्यच नसते. एक जरी मेंढी मेली तरी त्याचं कधीही न भरून निघणारं नुकसान होत असते. धोबी बांधवाने आंदोलनात सहभागी होण्यासाठी दोन दिवसांची दांडी मारली तर आख्खा गाव दुर्गंधीने हैराण होईल. हे सर्व ओबीसींचे वीकपॉईंट जरांगेला व त्याच्या संघी सल्लागारांना माहीत आहेत, म्हणून त्यांना खात्री होती की, ओबीसीकडून फार मोठ्या संख्येने विरोध होणार नाही. परंतू हाके, वाघमारे व ससाणेंच्या उपोषण आंदोलनाने जरांगेचा हाही गैरसमज तोडून टाकला.
ओबीसी अस्तित्वाचाच प्रश्न समोर उभा ठाकला आणी ओबीसीने हातातली सर्व कामे सोडून आंदोलनाकडे धाव घेतली. ओबीसीमध्ये मराठा घुसला तर आपल्या पोरा-बाळांना शिपायाची नोकरीसुद्धा मिळणार नाही, हे लक्षात आल्यावर त्याच्या डोळ्यासमोर अंधकारमय काळेकुट्ट भविष्य त्याला दिसायला लागले. आपण वेळीच जागे होऊन विरोध केला नाही तर उद्याच्या भीकेला लागलेली आपलीच पोरं आपल्या तोंडात शेण घातल्याशिवाय राहणार नाहीत, याची खात्री आजच्या ओबीसींना झाली व त्यांनी आंदोलनाकडे धाव घेतली.
ओबीसी जनता उत्स्फुर्तपणे घराबाहेर पडते आहे. लाखोंच्या संख्येने ओबीसी जनता घरातील चटणी-भाकर बांधून आंदोलनात सहभागी होत आहे. असेल ते साधन व मिळेल ते वाहन घेऊन हा ओबीसी आंदोलनात सहभागी होत आहे. कारण त्याला माहीत आहे की, नेहमी प्रमाणे कोणा पाटलांची गाडी आपल्याला घ्यायला येणार नाही. घरची चटणी-भाकर बांधून घ्या, कारण कोणी साखर कारखानदार आपल्याला बिर्याणी खाऊ घालणार नाही. प्रा. लक्ष्मण हाके, नवनाथ आबा वाघमारे व ऍड. मंगेश ससाणे यांच्या आंदोलनाने त्याहीपेक्षा पुढचा टप्पा गाठला आहे. आता ओबीसी केवळ स्वखर्चाने येत नाही तर आंदोलनाला मदत करण्यासाठी खिशात पैसे घेऊनच आंदोलनात येतो. वडीगोद्रीच्या उपोषणाला येणार्या लोकांनी आपल्या घामाच्या कमाईतून लाखो रूपयांची मदत केली आहे, ही खरोखर क्रांतीकारी बाब म्हटली पाहिजे. वडीगोद्रीच्या आंदोलनाचे हे फार मोठे फलित म्हटले पाहिजे. पराभूत मानसिकतेला उभारी देऊन लढायला सिद्ध करणं हे महाकठीण काम आहे, मात्र या तीन नवतरूणांच्या उपोषणाने ते करून दाखविलं, हे सर्वात मोठं फलित म्हटले पाहिजे.
सातव्या पर्वाच्या तिसर्या प्रकरणात मी ओबीसींसमोरील दोन पर्यायांची चर्चा करणार आहे. तो पर्यंत जयजोती! जयभीम!! सत्य की जय हो!!!
- प्रा. श्रावण देवरे, संस्थापक-अध्यक्ष, ओबीसी राजकीय आघाडी, संपर्कः 88301 27270
Satyashodhak, obc, dr Babasaheb Ambedkar, Bahujan, Mandal commission