"एका जनार्दनी निजवद अल्ला l
आसल वोही बिटपर अल्ला ll "
- संत एकनाथ महाराज
महाराष्ट्राच्या आध्यात्मिक चळवळीमधे सर्वाधीक लोकप्रिय ठरलेली चळवळ म्हणजे वारकरी संत चळवळ होय. या वारकरी भागवत धर्मीय संत चळवळीचे तत्त्वज्ञान निर्मीतीचे काम संत नामदेवांपासून संत निळोबारांयांपर्यंत अविरतपणे चालू होते. संत ज्ञानेश्वरांनी भावार्थदिपीका, संत एकाथ एकनाथ महाराजांनी 'भागवत' तर संत तुकाराम महाराजांनी पाचवा वेद ' अभंगगाथा ' देवून यात सर्वाधीक मौलीक भर घातलेली आहे.
वारकरी संत चळवळ लोकप्रिय होण्याच्या अनेक कारणांपैकी एक महत्त्वाचे कारण म्हणजे संतांनी विठ्ठलाला 'महासमन्वयाचे प्रतिक' म्हणून उभे केले आहे. त्या काळातील सर्व लोकप्रिय पंथ, सांप्रदाय, शाखा, प्रवाह विठ्ठलाशी जोडून देवून वारकरी संतांनी सलोख्याची, समन्वयाची भुमीका घेतली होती. संतांनी पंढरपूरच्या विठ्ठलात काय काय पाहिले ?
१) द्वारकेचा कृष्ण पुंडरीकाच्या भेटीला आला आणि तो येथेच स्थिरावला तोच हा विठ्ठल होय.
२) विठ्ठल 'बौद्ध' रूप सुद्धा आहे.
३) विठ्ठलाच्या डोक्यावर त्याने शिवलींग धारण केले आहे. म्हणून त्याच्यात शिवाचा अंशही आहे.
४) 'कुळीची कुलदेवी ठावी केली संतीनी' म्हणून हा शाक्त परंपरेप्रमाणे 'विठाई' स्त्रीस्वरुपातही आहे.
५) नाथांच्या भाषेत हाच 'आदिनाथ' आहे.
६) तसेच निर्गुण भक्ती उपासकांसाठी 'हाच निर्गुण निराकार सुध्दा आहे.
आशाप्रकारे वारकरी संतांनी विठोबाला महासमन्वयात गुंफताना राम, कृष्ण, शिव, बुद्ध, आदिनाथ, कुळदेवी, आणि अन्य दैवते विठ्ठलाच्या दारात त्यांनी उभी केलीत. कलयुगातील भक्ती म्हणजे फक्त विठ्ठलच ही त्यांची मांडणी होती.
या ' महासमन्वयाच्या ' संताच्या भुमीकेत सर्वात वेगळेपण ते असे की त्यांनी 'विठ्ठलात' आल्लाह देखील पाहिला आहे. भारतीय पंथ, प्रवाह तर त्यांनी 'भागवत' धर्मात सामावून घेतलेच परंतू बाहेरच्या भुमीवरील, 'इस्लाम' देखील संतांनी अभ्यासला आणि अनेक सुफी प्रचारकांना वारकरी संतांनी समतेने अलिंगण दिले. सुफी संत ज्याप्रमाणे 'अल्लाह' च्या एकेश्वरवादी भक्तीत तल्लीन होत असत, त्याच धरतीवर वारकरी संतांनी सुफींची भक्ती वारकरी परंपरेशी जोडून दिली.यारकरता वारकरी संतांनी हिंदी दख्खणी भाषेत सुफीनामाच लिहीला. हिंदीत अभंगरचना करत संतांनी एकेश्वरवाद मांडला आणि या ऐकेश्वरवादाचे प्रतिक म्हणून त्यांनी विठ्ठल पुढे केला. निर्गुण निराकार एकेश्वरवादी असण्याची सुफींची अट वारकरी संतांनी मान्य केली. त्यामुळे वारकरी परंपरेत मुस्लीम संतही लोकमान्य झाले.शहागडचे संत शहामुनी ,दौलताबादचे संत चांदबोधले,देहूचे अनगडशाहबाबा , शेख मुहम्मद श्रीगोंदेकर ही नावे आपण जानतोच.
"कबीर लतीफ, मोमीन मुसलमान।
सेना नाव्ही जान विष्णुदास ॥"
या तिन मुस्लीम सांतांचा खुद्द तुकोबारांनी सुद्धा आदबीने उल्लेख केला आहे.
वारकरी परंपरेतील जे जे संत सुफी परंपरेच्या संपर्कात आले होते , त्यांच्या साहित्त्यावर उर्दू-फारशी भाषेचा प्रभाव दिसुन येतो. ऐकश्ववादी, निर्गुण भक्तीचे मत मांडताना संत तुकोबराय इस्लामची, सुफी परंपरेची 'अल्लाह' ही उपाधी हिंदीतील अभंगात बिनदिक्कतपणे वापरतात. तें म्हणतात
" अवल नाम अल्ला बडा लेते भुत ना जाये।
इलाम त्याकालागुपरताही तुंब बजाये ||
आल्ला एक तु नबी एक तुं ।।"
( देहू अभंगगाथा अभंग क्र. ४४० )
संत तुकाराम महाराजांचा अनेक, सुफींशी किंवा त्या पंथाच्या अनुयायांशी जवळून संपर्क आलेला होता. अनगडशाहा बाबा, शेख मुहम्मद महाराज श्रीगोंदेकर ही दोन नावे तर सर्वपरिचीत आहेत.म्हणून संत तुकाराम महाराज वारकरी परंपरेत इस्लामची एकेश्वरवादी संकल्पना , हिंदी, उर्दू रचना किंवा 'इस्लामीक' संकल्पना अभंग रूपाने सहज मांडताना दिसतात. आनखी एके ठिकाणी ते म्हणतात.
"अल्ला करे होय बाबा करतारका सिरताज l
गाऊ बछरे तिस चलावे यारी बाघो न सात ॥
ख्याल मेरा साहेबका बाबा हुआ करतार l
व्हांटे आघे चढे पीठ आपे हुवा असुवार ||२||
जिकिर करो अल्लाकी बाबा सबल्यां अंदर भेस ।
कहे तुका जो नर बुझे सो हि भया दरवेस ||३||
( संत तुकाराम गाथा देहू संस्थान अभंग क्र. ४४३ )
अल्लाने ठरवलं तर कोणीही या विश्वनिर्मात्याचा मुकुट होईल.म्हणजे तो इश्वराचा प्रिय भक्त होइल.गाय आणि वासरु वाघाचे मित्र होतील.अल्लाची आठवण ठेवा, तोच सृष्टीनिर्माता आहे. जो त्याचे स्मरण करेल तोही सूष्टिनिर्माता म्हणजे अल्लाच होऊन जाईल. त्या अल्लाची आठवण ठेवा जो सर्वांच्या ह्रदयात वास करतो. तुकाराम महाराज म्हणतात, "ज्याच्या मनातले सर्व विकार नष्ट होतात, तोच दरवेश होतो.म्हणजे संत होतो."
या अभंगावरून संत तुकोबारायांना सुफी परंपरेचा किती सखोल अभ्यासक होते हे लक्षात घेता येइल.त्यांनी या अभंगातून इश्वराशी एकरूप होणे, ही सुफी संकल्पना मांडली आहे.
किंवा
ईश्वरच सर्व काही करतो, त्याच्याशिवाय काहीही होऊ
शकत नाही . हे सांगताना संत तुकोबाराय म्हणतात.
" अल्ला - देवे अल्ला दिलावे, अल्ला दारू अल्ला खिलावे । अल्ला बगर नही कोये, अल्ला करे सही होये ।"
( संत तुकाराम गाथा देहू संस्थान अभंग क्र. ४४४ )
या प्रकारे अनेक हिंदी रचना करताना संत तुकोबाराय भाषेचा, धर्माचा भेदभाव करत नाहीत. वारकरी परंपरेला ने अधिक व्यापक बनवतात.
संत एकनाथ महाराज तर त्याहीपलीकडील
भुमीका घेतात. विटेवरल्या विठ्ठलाला ते चक्क आल्लाह म्हणतात. विटेवरल्या विठ्ठलात अनेक संतांनी राम, कृष्ण, शिव, बुद्ध पाहिला परंतु संत एकनाथ महाराजांनी मात्र विठ्ठलात अल्लाह देखील पाहिला. ते म्हणतात
" हजरत मौला मौला । सब दुनिया का है पानवाला ll
सब घटमो सांई विराजे l करत हए बोल-बाला ll
गरीब नवाजे मैं गरीब तोरा l तेरे चरन कु रतवाला ll
अपना साती समज के लेना l सलील वोही अल्ला ll
जीन रूप से है जगत पसारा l वोही सल्लाल अल्ला ll
एका जनार्दनी निजवत अल्ला । असल वोटी बिटपर अल्ला
(श्रीसकळसंतगाथा भाग २ अभंग क्र. ३९५१ )
संत एकनाथ महाराज म्हणतात " सर्व जगाचा पालनकर्ता हजरत मौला आहे.तो कनकनात सामवलेला आहे.त्याचा बोलबाला सर्वत्र आहे.मी तुझा एक भक्त आहे.तुझ्या चरणाशी लिन होनारा.हे इश्वरा तुझा सहपथीक समजून मला तुझ्या सोबत घे.ज्याच्या रुपाने या जगाचा , ब्रम्हांडाचा पसारा व्यापलेला आहे.हाच तो अल्लाह आहे.आणि तो अल्लाह विटेवर उभा आहे. "
संत एकनाथ महाराजांचे गुरू संत जनार्धन स्वामी होत आणि संत जनार्धन स्वामी यांचे गुरु सुफी संत चांदबोधले होते.संत जनार्धन स्वामी दौलताबाद किल्ल्यावर नोकरीला होते.त्यांनी स्वखर्चाने दौलताबाद किल्ल्याच्या समोर आपल्या गुरुची 'मजार' बांधली आहे. याच सुफी संत चांदबोधले यांचे एक शिष्य श्रीगोंदयाचे शेख मुहम्मद महाराज होत. जनार्धन स्वामी आणि शेख मुहम्मद महाराज गुरुबंधू होत. म्हणजे सुफी परंपरेची एक शाखा संत एकनाथ महाराजांकडे आली होती म्हणुनच एकनाथ महाराज विठ्ठलात आल्लाह पहातात. पुन्हा ते एका अभंगात आपला सुफीनाम सादर करतात
"अल्ला रखेगा वैसाही रहेना'
मौला रखेगा वैसाथी रहेना।"
(श्रीसकळसंतगाथा भाग दोन अभंग क्र. ३९६४ )
संत कबीर ज्याप्रमाणे हिंदू-मुस्लीम दोनही परंपरेतील अवडंबरावर टिका करतात, त्याचप्रमाणे संत एकनाथ महाराजांनी देखील हिंदू-तुर्क संवाद लिहून सुरवातीला अवडंबरावर टिका केली आहे.आणि नंतर एक गोड समेट घडवून आनली आहे. हा संवाद अभंगाच्या रूपाने पहायला मिळतो त्यात हिंदू आणि तुर्क एकमेकांना धर्मीक गोष्टीवरून खुप भांडतात. या भांडणाचा शेवट संत एकनाथ महाराज निर्गुण निराकार ईश्वर भक्तीवर हिंदू तुर्क दोघांचेही एकमत घडवून आनुन करतात. संत एकनाथ महाराजांच्या दख्खनी हिंदी अभंग रचना भरपुर आहेत. ज्यावर उर्दू पारशीचा मोठा प्रभाव दिसुन येतो.संत नामदेवांच्याही हिंदी अभंग रचना भरपुर आहेत. महाराष्ट्रातील मराठी वारकरी संत परंपरा जेव्हा हिंदीत रचना करताना आढळून येते तेव्हा एक वेगळी व्यापक मांडणीही नजरेस पडते. संत कुणाचाही तिटकारा करत नाहीत. वारकरी परंपरेत "नामाचा तुका, ज्ञानाचा एका आणि कबिराचा शेखा' असेही म्हटले जाते.याद्वारे संत कबिरांपासून शेख मुहम्मद महाराजांपर्यंतची मुस्लीम संत परंपराही वारकरी सांप्रदायात अंतर्भूत आहे. म्हणून आज देखील अनेक मुस्लीम संताच्या दिंड्या पंढरपुरकडे येतात.विदर्भातून गेल्या अनेक वर्षापासून श्रीसंत परमहंस मुहम्मद खान महाराज यांची पालखी श्रीक्षेत्र गणोरी ते पंढरपूर प्रवास करते. अनिलभाऊ देशमुख हे या दिंडीचे दिंडीचालक आहेत. यावर्षी श्रीगोंदा येथून शेख मुहम्मद महाराजांची पालखी पंढरपुरकडे निघाली आहे. या पालखीची आणि संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीशी भेटही होनार आहे.पुर्वी उत्तरेकडू संत कबीरांचीही पालखी येत असल्याचे सांगितले जाते.नंतरच्या काळात ही पालखी बंद झाली.परंतू आजही पंढरपूरात कबीर मठ मात्र पहायला मिळतो.
ज्याप्रमाणे मुस्लीम संतांच्या पालख्या पंढरपूरकडे येतात. अगदी त्याचप्रमाणे मुस्लीम किर्तनकार, भारूडकार आणि वारकरीही तुम्हाला वारकरी सांप्रदायात आणि वारी सोहळ्यात दिसतील.कुनी सेवा करताना दिसतील तर कुनी औषधोपचार करताना दिसतील.त्याच बरोबर वारकरी परंपरेत मुस्लिम किर्तकारांचीही एक मोठी परंपराच आहे. भारुडसम्राट ह.भ.प.हमीद महाराज सय्यद, ह.भ.प. जलाल महाराज सय्यद, ह.भ.प. कबीर महाराज अत्तार, ह.भ.प. मेहबुब महाराज शेख आणि किर्तनात किर्तन चालू असताना ज्यांची प्राणज्योत मालवली असे ह.भ.प. ताजोद्दीन महाराज शेख, आदि किर्तकार आजही वारकरी मायबाप जनतेची मनोभावे सेवा करत आहेत. पंढरच्या ह.भ.प. मिराताई कैगार महाराजांच्या मठावर देखील हरिपाठ आणि काकडा मुखोगत असनारा मुस्लीम वारकरी आपल्याला सकळांशी येथे आहे आधिकार म्हणताना दिसेल.
एवढे सर्व एकात्म, एकसंघ असतानाही काही ट्रोलर्सना वारीमध्ये मुस्लिम आलेले चालत नाहीत.काही कर्मठांना वारी परंपरेचे ब्राम्हणीकरण करायचे आहे.पण तसे करण्यासाठी त्यांना संत एकनाथ महाराज आणि संत तुकोबारायांची एकोप्याची मांडणी खोडावी लागेल.
असो यंदाही गेल्यावर्षीप्रमाणे बकरी इद आणि आषाढी एकादशी एकच दिवसी आलेली आहे.मुख्य पंढरपूर तथा संभाजीनगर जिल्ह्यातील पंढरपूर येथील मुस्लिमांनी वारकरी परंपरेचा आदर कायम राखत त्यादिवशी बोकड न कापण्याचा , हिंसा न करण्याचा निर्णय घेतला आहे.हिच महाराष्ट्राची सलोख्याची ऐक्यची परंपरा आहे. वारकरी परंपरा हीच महाराष्ट्राची गंगाजमुनी तेहजीब आहे.
तुकोबारायांच्या शब्दात सांगायचे झाल्यास
" कोण्याही जीवाचा न घडो मत्सर l
वर्म सर्वेश्वर पुजनाचे ll "
- नितीन सावंत परभणी
Satyashodhak, Bahujan