हेमंत टाले
मित्रांनो जय हरी. अगदी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संतांचे माहेरघर अर्थात पंढरपूर येथे आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर लाखोच्या संख्येने वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी एकत्र येणार आहे. मी सर्व वारकऱ्यांना यावर्षीच्या वारीच्या हार्दिक सदिच्छा व्यक्त करतो. शब्द प्रामाण्य रुजवण्यासाठी वैदिकांनी वेदांना प्रमाण ग्रंथ मानण्याचा प्रचंड आग्रह धरला. एवढेच नाही तर वैदिकांनी केलेल्या व्याख्येनुसार जो वेदांना मानतो तोच खरा आस्तिक होय. भलेही तो ईश्वराला मानत नसेल तरी चालेल पण वेदांना त्याने मानलच पाहिजे. तरच तो आस्तीक. ईश्वराला मानत असेल पण जर वेदांना मानत नसेल तर तो नास्तिक ठरवल्या गेला. तुलनात्मक दृष्ट्या वैदिकांनी वेदांच्या पुढे ईश्वराला दुय्यम स्थान दिले. भारतीय संस्कृतीचा अभ्यास केला असता वैदिकांना सर्वप्रथम विरोध दर्शविणारा महापुरुष म्हणजे महर्षी चार्वाक होय. चार्वाकाने सर्वप्रथम भारताच्या मातीमध्ये विवेक वाद पेरला. त्यामुळे वारकरी संप्रदायासहित आज महाराष्ट्रात जितक्या विवेकवादी चळवळी उभ्या राहिल्या त्या सर्व चळवळीवर चार्वाकाचे अनंत उपकार आहे. हजारो वर्ष वैदिकांनी थांबवलेली विचारप्रक्रिया चार्वाकांनी सुरळीत केली. चार्वाक ही कोणी एक व्यक्ती नसून आज जो स्वतःला विचारवंत म्हणवतो तो प्रत्येक व्यक्ती म्हणजे चार्वाक होय. पुढे चार्वाकाची चिकित्सक विवेक वादी परंपरा वारकरी संप्रदायाच्या संतांनी सुरू ठेवली त्यामुळे चार्वाकाचा वारकरी संप्रदायावर जबरदस्त प्रभाव आहे हे ही आपण मान्य केले पाहिजे.
वैदिकांना उघडपणे विरोध केल्यामुळे चार्वाकांची प्रतिमा मलीन करण्याचा त्यांच्या साहित्याचा वेगळा अन्वयार्थ काढून त्यांचं साहित्य विकृत करण्याचा प्रयत्न वैदिकांनी पुढे चालू ठेवला. अर्थात भारतीय संस्कृतीमध्ये चार्वाक दर्शन हे वेदांना नकार देणार पहिलं नास्तिक दर्शन होय. पुढे भगवान महावीरांनी वैदिकांना जबरदस्त विरोध केला. त्यामुळे जैन दर्शन हे दुसरं नास्तिक दर्शन मानल्या गेलं. भगवान महावीरानंतर 54 वर्षांनी भगवान बुद्धांनी वैदिकांना जबरदस्त आवाहन दिले. आणि यज्ञ संस्कृतीचा फोलपणा चव्हाट्यावर आणला. त्यामुळे बौद्ध दर्शन हे सुद्धा तिसऱ्या क्रमांकाचे नास्तिक दर्शन मानल्या जाते. पुढे चक्रधर स्वामी आणि महात्मा बसवेश्वर यांनी वैदिकांना जबरदस्त टक्कर दिली. चक्रधर स्वामींची आणि बसवेश्वरांची हत्या घडवून आणण्यात वैदिकांना यश आले. त्यामुळे महानुभव पंथाची वाताहत झाली तर लिंगायत पंथाचे साहित्य नष्ट करण्यात आलं लिंगायत पंथाचे जेवढे अनुयायी डोंगर कपारीत लपून राहिले तेवढेच वाचले बाकी सर्वांची हत्या घडवून आणण्यात आल्या. पुढे नाथ संप्रदाय निर्माण झाला आणि त्यातून वारकरी संप्रदायाचा ज्यांनी पाया रचला ते संत श्रेष्ठ नामदेव महाराज या महान संताचा महाराष्ट्रात जन्म 26 ऑक्टोबर 1270 झाला. आपल्या पूर्वजांच्या झालेल्या हत्या आणि त्यांच्या पंथाची झालेली वाताहत पाहून संत श्रेष्ठ नामदेव महाराजांनी वैदिकांना उघडपणे विरोध न करण्याची भूमिका अवलंबवली.
संत श्रेष्ठ नामदेव महाराज हे अत्यंत चाणाक्ष विवेक वादी आणि रचनात्मक पद्धतीने कार्य करणारे संत महापुरुष आणि महान प्रचारक होते. सुमारे 700 वर्षाच्या आधी कुठलेही साधन नसताना वारकरी संप्रदायाच्या या महान संताने भावनिक एकात्मता निर्माण करण्यासाठी पंजाब मध्ये जाऊन वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार केला. जगातल्या कुठल्याही धर्माच्या धर्मग्रंथात त्याच्या संस्थापका व्यतिरिक्त इतर संत महापुरुषांचे विचार समाविष्ट केल्या जात नाही. परंतु संत नामदेवांचं संवाद कौशल्य आणि त्यांची भावनिक एकात्मता वाखाणण्याजोगी आहे कारण गुरु ग्रंथ साहेब या सिख धर्माच्या धर्मग्रंथात ग्रंथात संतश्रेष्ठ नामदेवाचे तब्बल सत्तरच्या वर अभंग समाविष्ट करण्यात आले. पुढे कश्मीर पर्यंत संत नामदेवांनी वारकरी संप्रदायाचा प्रचार व प्रसार केला. वारकरी संप्रदायाच्या सगळ्या संतांनी वेदांना प्रमाण मानण्यास नकार दिला. माऊली ज्ञानदेवांनी वेदांना कृपण हे दूषण लावलं आहे. कारण वेद हे सर्वांना समान वागणूक देत नसून एका विशिष्ट वर्गाला सर्वोच्च तर इथल्या सर्वसामान्यांना अत्यंत हीनकस जीवन जगण्यास प्रवृत्त करतो. ज्ञानदेवांच्या मते वेद हे कंजूष आहे त्यांच्याकडे अंतकरणाची उदारता नाही.
संत तुकारामांनी तर "गाळोनिया भेद प्रमाण तो ऐसा वेद" असं म्हणत वेदप्रामाण्यावर जोरदार हल्ला चढवला. आम्ही वेदांना प्रमाण मानणार नाही आम्ही वेदांची चिकित्सा करू वेदांमधील भेद गाळून उर्वरित भाग आम्ही प्रमाण मानू असं त्यांनी निक्षून सांगितलं. देव हे मंत्राच्या आधीन. मंत्र हे ब्राह्मणांच्या स्वाधीन. त्यामुळे देव हे ब्राह्मणांचे अंकित आहे असा वेदमंत्राचा महिमा सांगणाऱ्या वैदिकांना नामदेवांनी विठ्ठलाचे नाम अर्थात नाम मंत्र हा सर्वश्रेष्ठ होय असे म्हणत प्रत्युत्तर दिले. वेद हे अपौरुषेय आहे. इथे पुरुष या शब्दाचा अर्थ ईश्वर म्हणजे ते ईश्वराने निर्माण केले नसून स्वयंभू आहे. असे म्हणणाऱ्या वैदिकांना नामदेव महाराज म्हणतात "चारी वेदभाट होऊनी गर्जती| सनकादिक गाती कीर्ती तुझी|"अर्थात तुमचे वेद हे भाट होऊन माझ्या विठ्ठलाचे गुणगौरव करतात असं म्हणत वैदिकांनी सर्वोच्च पदी ठेवलेल्या वेदांना विठ्ठलाच्या चरणावर लोळवतात. मोक्षाचा गवगवा करणाऱ्या वैदिकांना नामदेव महाराज पुढे म्हणतात. "उच्छिष्ठे काढीती मुक्ती चारी"अर्थात मोक्षप्राप्तीसाठी जो तो स्वर्गाला शिडी लावण्याचा प्रयत्न करतो. त्या चार मुक्त्या विठ्ठलाच्या घरी उष्ट काढण्याचे काम करतात. "दुःख नाही जन्म घेता मोक्ष सुखा हाणूलाथा" तुका....असे म्हणत मोक्षाच्या कंबरड्यात लाथ घालणारा आणि वेदांना भाट म्हणून हिणवणारा वारकरी संप्रदाय आणि त्याचा ज्वलंत संघर्ष हा कुठल्या व्यवस्थेशी होता हे या निमित्ताने आपण समजून घेतलं पाहिजे आणि वैदिकांच्या धार्मिक आमिषाला बळी न पडता इथल्या सर्व याती वर्णाच्या लोकांनी एकत्रित येऊन हा संघर्ष पुढे चालू ठेवावा यासाठी सर्व धर्म पंथ संप्रदायाचं संमेलन त्याचबरोबर एक आंदोलन म्हणजेच पंढरीची वारी होय.
हेमंत टाले - 9975807632
Satyashodhak, Bahujan