वो जिनके होते हैं खुर्शीद आस्तिनो में, कहीं से उन्हें बुलाओ बडा अंधेरा है। असे सूर्यासारखे देदीप्यमान प्रेषित हे अज्ञान आणि अंधकारात खितपत पडलेल्या समाजाला जागृत करून मानवतेच्या उच्च, उदात्त व प्रकाशमय वाटेवर घेऊन जाण्यासाठी काळाच्या विविध टप्प्यांवर जन्माला येत असतात कोणी म्हणते की, जग प्रेमावर चालले आहे. कोणी म्हणते, जग माणसाच्या श्रम, कष्टावर चालले आहे. कोणी आणखी काही म्हणेल; परंतु अशा अनेक प्रेषितांनी केलेल्या त्याग, समर्पण व बलिदानाने प्रचंड जीवनसंघर्ष करून मानवतेची प्रतिष्ठापना केलेली आहे. त्यांचे जीवन म्हणजे माणसासाठी एक आदर्श व आधार बनलेला आहे. आज बकरी ईदच्या निमित्ताने...
- शफीक देसाई
ईद-उल-अहा म्हणजे त्याग व बलिदानाचा सण व उत्सव होय. अशा अनेक प्रेषितांनी संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी केलेल्या त्याग, समर्पण व बलिदानाचे स्मरण एक सण व उत्सव म्हणून साजरा करणे हे एक 'ईद-उल- अदहा'चे वेगळे वैशिष्ट्य आहे. यातून त्यांचे स्मरण, गौरव, सन्मान तर केला जातोच; पण त्यांचे संघर्षमय जीवन समाजासमोर आदर्श म्हणून ठेवले जाते, ज्या आदर्शावर समाजाने पुढे चालावे आणि एक चांगल्या, सुदृढ, सशक्त समाजासाठी आपले योगदान द्यावे. आजपासून सुमारे चार हजार वर्षांपूर्वी प्रेषित हजरत इब्राहिम (अ.) यांनी एकमेवाद्वितीय परमेश्वराचे महात्म्याबरोबरच मानवतेच्या प्रतिष्ठापनेसाठी ज्या प्रचंड जीवघेण्या संघर्षाला तोंड दिले, त्याचे आजही आपण स्मरण करतो. अतिशय विशुद्ध स्वरूपातील एकेश्वरवाद आणि प्राकृतिक (नैसर्गिक) सत्य, न्याय, नैतिकतेचे अधिष्ठान मानवधर्माला प्राप्त करून देण्याचा आटोकाट प्रयत्न त्यांनी केला.
या भावी पिढ्यांच्या भल्यासाठी व अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी केलेल्या जीवनसंघर्षात त्यांची मुलेही हजरत इस्माईल (अ.) व हजरत इसाक (अ.) यांनीही साथ दिली. त्यांच्या या अभूतपूर्व मानवकल्याणाच्या कार्यामुळे त्यांनाही प्रेषित्व प्राप्त झाले. याच महान कार्यासाठी विशुद्ध स्वरूपातील एकेश्वरवाद आणि मानवतेच्या प्रतिष्ठापनेसाठी आजपर्यंत हजारो प्रेषितांनी आपले सर्वस्वी जीवन अर्पण केले आहे. त्यांनी त्याग, सेवा, समर्पण व बलिदानाद्वारे अविस्मरणीय असे मानवतेचे कार्य करून ठेवलेले आहे. या मानवतेच्या महान कार्यासाठी विशेषत्वाने हजरत मुसा (अ.), हजरत मुहम्मद (अ.), हजरत ईसा (अ.), हजरत युसुफ (अ.) अशा प्रेषितांनी आपले जीवन अर्पण केले आहे. या उदात्त कार्यासाठी अनेकांनी स्वतःबरोबरच आपली मुलेबाळे व कुटुंबीयांचे सर्वस्व अर्पण केले आहे.
काळाच्या ओघात विविध टप्प्यांवर काही मूठभर स्वार्थी, मतलबी आणि हव्यासी लोकांकडून जनसामान्यांचे प्रचंड शोषण, दडपणूक व छळवणूक करून वर्चस्ववाद, अधर्म, अराजक व अंधकार - माजवला जातो. जनसामान्यांचे जीवन अतिशय अवनत, पशुवत अवस्थेस पोहोचविले जाते. अशा अधःपतीत समाजजीवनाचे पुनरुज्जीवन करून त्याला सन्मानित, उच्च, ऊर्जितावस्थेस नेणे अतिशय कठीण, खडतर आणि महत्प्रयासाचे कार्य असते.
माणसाला सन्मान, शांती, सुरक्षेसह जीवनात नैसर्गिक न्यायाच्या स्वरूपात हक्क, अधिकार व वाटा मिळावा. माणसाने सत्य, न्याय व नैतिकतेचे अधिष्ठान असलेल्या विशुद्ध स्वरूपातील एकच एक परमेश्वराची भावभक्ती करावी.
अखिल मानवजातीच्या कल्याण व हितासाठी ज्या प्रेषितांनी आपले संपूर्ण आयुष्य त्याग, सेवा व बलिदानाने समर्पित केले आहे, अशा प्रेषितांनी मानवतेसाठी केलेल्या महान कार्याचे स्मरण करावे व त्यांचा आदर्श नेहमीच समाजासमोर राहावा. त्यांनी घालून दिलेल्या मार्गावर चालत राहावे. प्रसंगी त्यांच्या त्याग, समर्पण व बलिदानाने प्रेरित होऊन मानवजातीच्या कल्याणाच्या वाटेवर निश्चय व निर्धारपूर्वक चालावे आणि आपले स्वतःचे व समाजाचे हित साधावे. त्यांचा यथोचित सन्मान व गौरव व्हावा याच उद्देशाने त्याग व बलिदानाचे भावपूर्ण स्मरण सण व उत्सवाच्या स्वरूपात साजरे केले जाते.
Satyashodhak, Bahujan