नांदेड - येथील भारतीय पीछडा शोषित संघटन जिल्हा शाखेच्या वतीने राज्यस्तरावरील ओबीसी लेखकाला या वर्षापासून स्मृतीशेष प्रा. हरी नरके फुले-आंबेडकरी विचारधारा साहित्या पुरस्कार देण्याचे ठरले आहे. त्या अनुषंगाने संघटने अंतर्गत पुरस्कार निवड व वितरण समितीने २०२४ या वर्षातील पहिला राज्यस्तरीय पुरस्कार मुंबई येथील ओबीसी सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष, विचारवंत तथा फुले-आंबेडकरी विचाराचे व्याख्याते, लेखक इंजि. प्रदीप ढोबळे यांच्या 'आरक्षणाची पोटदुखी' या पुस्तकास जाहीर झाला आहे. हा पुरस्कार स्वर्गीय नागोजीराव भुमन्ना आक्केमवाड यांच्या स्मरणार्थ दिल्या जातो.
या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ. श्रीमंत राऊत, बालाजी थोटवे, प्रज्ञाधर ढवळे, प्रा. डॉ. मारुती लुटे, प्रा. बालाजी यशवंतकर, प्रा. डॉ. दिलीप कठोडे यांच्या समितीने निवड केली आहे. सदरील पुरस्काराचे स्वरूप रोख अकरा हजार रुपये, मानपत्र, महावस्त आणि स्मृतीचिन्हासह ग्रंथभेट असे असून शहरात भारतीय पिछडा शोषित संघटनेच्या वतीने आयोजित येत्या ३० जून रोजी होणाऱ्या एका समारंभात मोठचा थाटामाटात पुरस्कार वितरण करण्यात येईल, अशी माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष सतीशचंद्र शिंदे, राजेश चिटकुलवार, प्रदीप राठोड, कोंडलवाडे, पांडुरंग रविंद्र बंडेवार, लालू कोकुलवार, बाबुराव कापसे, ओमेश नरसिमल्ल वंगावार, पांचाल यांनी दिली आहे.