कोल्हापूर : ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात येत असलेल्या वसतिगृहांमध्ये इयत्ता दहावीच्या गुणांची टक्केवारी विचारात घेऊन विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जावा, अशी मागणी ओबीसी जनमोर्चाने जिल्हा प्रशासनाकडे केली.
राज्य सरचिटणीस दिगंबर लोहार, सयाजी झुंजार, एकनाथ कुंभार यांच्या शिष्टमंडळाने याबाबतचे निवेदन दिले. वसतिगृहातील प्रवेशासाठी शासनाने काढलेल्या आदेशामुळे उच्च तंत्रशिक्षण घेणारे, पदविका अभ्यासक्रम, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विदयार्थ्यांना लाभ मिळणार नाही. तसेच जे विद्यार्थी दहावीनंतर उच्च. तंत्रशिक्षण व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणार आहेत त्यांना वसतिगृहात प्रवेश मिळणार नाही. तरी आदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी व्यावसायिक तसेच बिगरव्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या. विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये गुणवत्तेनुसार तसेच प्रवर्गनिहाय आरक्षणानुसार प्रवेश देण्यात येतील. त्यासाठी १२ वीऐवजी १० वीच्या गुणांची टक्केवारी विचारात घेतली जाईल, असा बदल करण्यात यावा, अशी मागणी यात करण्यात आली.