विरोधी पक्षनेत्याचे लोकशाहीतील महत्त्व

लेखक - प्रेमकुमार बोके

     काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची नुकतीच लोकसभेच्या विरोधी पक्ष नेतेपदी निवड झाली आहे. त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन करताना त्यांनी विरोधी पक्षनेते पदाला योग्य न्याय देऊन सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सभागृहात मांडावे व त्याची सोडवणूक करण्यासाठी लोकशाहीच्या सर्व आयुधांचा वापर करावा ही त्यांच्याकडून देशाला अपेक्षा आहे. लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष नेत्याचे महत्त्व अनन्यसाधारण असते.आजचा विरोधी पक्षनेता हा उद्याचा प्रधानमंत्री असतो असे म्हटले जाते.त्याचबरोबर विरोधी पक्ष आणि पक्ष नेत्याला शॅडो गव्हर्मेंट आणि शॅडो प्रधानमंत्री असेही म्हटले जाते.म्हणजेच भविष्यात विरोधी पक्षनेता हा प्रधानमंत्री बनू शकतो हे गृहीत धरले जाते.इंग्लंडमध्ये तर सत्ताधारी नेत्यांवर अंकुश ठेवण्यासाठी विरोधी पक्षाच्या वतीने शॅडो मंत्र्यांची नेमणूक करून प्रत्येक मंत्री हा खातेनिहाय सत्ताधाऱ्यांच्या मंत्रावर नियंत्रण ठेवण्याचे काम करत असतो.आताही इंग्लंडमधील मजूर पक्षाच्या वेबसाईटवर शॅडो गव्हर्मेंट मधील मंत्र्यांची फोटोसहीत माहिती दिलेली आहे. त्यामुळे भारतासारख्या महाकाय लोकशाही प्रधान देशात मजबूत विरोधी पक्ष असणे हे जनतेच्या हितासाठी अत्यंत आवश्यक आहे.

Importance of Leader of Opposition in Democracy - Rahul Gandhi     मागील दहा वर्षात या देशाला विरोधी पक्ष नेता नव्हता.विरोधी पक्ष नेते पदासाठी आवश्यक असलेले १-२ खासदार कमी पडले असताना कायद्याचे कारण सांगून सरकारने विरोधी पक्षनेतेपद देण्यास नकार दिला आणि त्यामुळे सरकारवर कोणाचे नियंत्रण राहिले नाही.विरोधी पक्षनेता सभागृहात असणे हे कोणत्याही सरकारसाठी अडचणीचे असते.कारण विरोधी पक्ष नेत्याला अनेक अधिकार प्राप्त होत असतात.त्याला कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा असतो व कॅबिनेट मंत्राला मिळणाऱ्या सर्व सोयी सवलती त्याला मिळत असतात.तसेच त्याला विरोधकांच्या वतीने बोलण्यासाठी विशेष वेळ दिला जातो.वेगवेगळ्या समित्यांवर त्याची नियुक्ती करणे सरकारला भाग पडते.त्यामुळे कोणत्याही सरकारला अंधाधुंदी कारभार करताना बरेच प्रतिबंध निर्माण होतात.कारण विरोधी पक्षनेता वेळोवेळी सरकारच्या चुकीच्या गोष्टी जनतेसमोर आणत असतो.

     त्यामुळेच मागील दहा वर्षात विरोधी पक्ष नेतेपद नाकारून सरकारला अनियंत्रितपणे जे जे करायचे होते ते त्यांनी करून घेतले. कायद्याच्या बाहेर जाऊन अनेक गोष्टी सत्ताधाऱ्यांना करता आल्या कारण सरकारवर कोणाचाच अंकुश नव्हता. स्वतंत्र असा विरोधी पक्ष नेता नसल्यामुळे लहान लहान विरोधी पक्षाच्या नेत्यांना सरकार जुमानत नव्हते आणि विरोधकांनी सभागृहात जर सरकारवर खूपच दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर भारताच्या इतिहासात आतापर्यंत केले नसतील एवढ्या खासदारांना लोकसभा अध्यक्षांनी निलंबित केले.त्यामुळे मागच्या दहा वर्षात विरोधकांचा आवाज दाबण्याचा सरकारकडून जो प्रयत्न करण्यात आला पर्यायने तो जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होता हे समजून घ्यावे लागेल.काही विरोधी नेत्यांनी जर खूपच आक्रमक भूमिका घेतली तर ईडी सारख्या सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून त्यांची सरळ तुरुंगात रवानगी करण्यात आली.त्यामुळे पूर्णपणे एकाधिकारशाही निर्माण झाली होती व जनतेचा आवाज लुप्त झाला होता. आता विरोधी पक्षनेता लाभल्यामुळे निश्चितच जनतेच्या प्रश्नांना काही प्रमाणात का होईना न्याय मिळेल अशी अपेक्षा देशवासीयांनी करण्यास हरकत नाही.

     पप्पू,शहजादा ते लोकसभेचा विरोधी पक्ष नेता हा राहुल गांधींचा प्रवास फार संघर्षमय आहे.एखाद्या व्यक्तीला किती संकटे,अडीअडचणी,विरोध, चारित्र्यहनन सहन करावे लागू शकते व या सर्व संकटातून न डगमगता तो कसा तेजाने उजळून निघतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे राहुल गांधी आहे.मागच्या दहा वर्षात सोशल आणि इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या माध्यमातून राहुल गांधींची प्रतिमा अतिशय मलीन आणि चारित्र्यहीन करण्याचा प्रचंड प्रयत्न झाला.त्यासाठी सर्व यंत्रणा आणि अब्जावधी रुपये खर्च करण्यात आले. अनेक खोट्या कहाण्या रचून राहुलची मनसोक्त बदनामी करण्यात आली. त्यामुळे राहुल हा कोणत्याही कामाचा नाही, त्याला काही समजत नाही,तो नेतृत्व करू शकत नाही, त्याला राजकीय ज्ञान नाही हे नॅरेटिव्ह जनतेमध्ये सेट करण्यात सत्ताधारी बऱ्यापैकी यशस्वी झाले होते.परंतु दोन वेळा देशाची हजारो किलोमीटर पदयात्रा करून संपूर्ण देश समजून घेण्याचा जो प्रयत्न राहुलने केला त्यामुळे देशातील जनतेला राहुलचे वास्तव आणि खरे रूप पाहायला मिळाले.या पदयात्रेमुळेच राहुलची निर्मळ आणि स्वच्छ प्रतिमा उजळून निघाली.त्याचे संसद सदस्य पद, त्याला मिळालेले घर हिरावून घेण्याचे घाणेरडे प्रयत्न झाले.पण या सर्व कठीण प्रसंगाचा त्याने अत्यंत संयमाने सामना केला. कुठेही मनाचा तोल ढासळू न देता अतिशय सभ्यतेने व सुसंस्कृतपणे आपल्यावरील अन्यायाला त्याने कृतीतून उत्तरे दिली आणि आज तो लोकसभेचा विरोधी पक्ष नेता झाला.

     आज तक चे पत्रकार सुधीर चौधरी यांनी निवडणुकीदरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना राहुल गांधी यांचे नाव घेऊन एक प्रश्न विचारला होता. तेव्हा नरेंद्र मोदी यांनी 'कोण राहुल गांधी ?' असा प्रतिप्रश्न करून आपण राहुल गांधींना कोणतीच किंमत देत नाही असे दर्शविण्याचा प्रयत्न केला.आज त्याच नरेंद्र मोदी यांच्यासमोर राहुल गांधी यांची विरोधी पक्षनेते पदाची खुर्ची आहे.नियतीने उगवलेला हा सूड आहे.त्यामुळे मनुष्य कितीही मोठ्या पदावर असला तरी त्याने अहंकार आणि गर्व यापासून मुक्त असावे.परंतु काही लोक यापासून स्वतःला दूर ठेवू शकत नाही आणि त्याचे परिणामही त्यांना लगेच दिसून येतात.नरेंद्र मोदी राजकारणात राहुल पेक्षा सिनियर असले तरी ते संसदेमध्ये राहुल पेक्षा दहा वर्षांनी जुनियर आहे हे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे.आज सत्ताधाऱ्यांवर वेगवेगळ्या प्रकारे नियंत्रण ठेवायला जागा आहे.ज्या मित्र पक्षांच्या आधाराने भाजपाने सत्ता मिळवली, त्या मित्र पक्षांना विश्वासात घेतल्याशिवाय सरकारला निर्णय घेणे कठीण आहे.तसेच प्रबळ विरोधी पक्ष असल्यामुळे प्रत्येक निर्णय घेताना तो काळजीपूर्वक घेणे भाग आहे. त्यामुळे संविधानकारांनी भारतीय लोकशाहीच्या बाबतीत जे मापदंड निर्माण केले होते ते मागच्या काही वर्षात निस्तनाबूत करण्याचा जो चुकीचा पायंडा पाडला गेला त्याला आता आळा बसेल असे वाटते.तसेच विरोधी पक्ष नेत्याने जनतेचे प्रश्न, समस्या,अडचणी सोडवण्यासाठी सरकारवर दबाव आणताना सतत जनतेमध्ये असणे सुद्धा आवश्यक आहे.जनतेमध्ये राहूनच जनतेचे प्रश्न खऱ्या अर्थाने समजून घेता येतात. सध्याचे प्रधानमंत्री जनतेपासून लांब राहून बोलत असल्यामुळे त्यांना खऱ्या प्रश्नांची जाणीव होऊ शकली नाही. त्यामुळे राहुल गांधीना भविष्यात  जर उंच भरारी घ्यायची असेल तर सतत लोकांमध्ये मिसळणे, त्यांच्या समस्या समजून घेणे आणि त्या सभागृहात मांडून सोडवून घेणे हाच खरा विरोधी पक्षनेत्याचा धर्म आहे.तो त्यांनी निभवावा आणि भविष्यात यापेक्षाही उंच भरारी घ्यावी एवढीच नवीन विरोधी पक्ष नेत्याला शुभेच्छा.

प्रेमकुमार बोके - अंजनगाव सुर्जी

Satyashodhak, Bahujan, Indian National Congress
Share on Twitter
Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209