‘‘अंगामाढो’’ सिरीजमधील बहुजननामाच्या चार लेखात राजकीय पर्याय उभारण्याचे तत्व मांडतांना मी कॉ. शरद पाटील यांचा संदर्भ घेऊन मार्क्स, बुद्ध, आंबेडकर यांचा समन्वय चर्चेला घेतला. ‘अंगामाढो’चे चारही भाग प्रकाशित झाल्यानंतर आमच्या काही समविचारी मित्रांनी माझे नांव न घेता माझे मुद्दे खोडून काढण्याचे काम सुरू केले. ते माझ्यासाठी स्वागतार्हच होते. मी त्या मित्रांच्या नावांचा सन्माननीय उल्लेख करून त्यांचा प्रतिवाद करणारी लेखमाला बहुजननामाच्या सदरात चालवली. मार्क्स, बुद्ध आंबेडकर या बहुजननामाच्या सिरीज मधील माझ्या या तिसर्या लेखांकाचे शिर्षक होते- ‘‘मार्क्स व आंबेडकरः स्वीकार आणी नकार’’. मात्र माझे बहुजननामा आठवड्यातून एकदाच प्रकाशित होत असल्याने मला रविवार पर्यंत थांबावे लागते. दरम्यानच्या 5-6 दिवसात बर्याच उलट-सुलट घटना घडून जात असतात. यावेळेस ते प्रकर्षाने झाले. माझे नाव न घेता माझे मुद्दे खोडण्याचा पुन्हा प्रयत्न सुरू झाला. आमचे सन्माननीय मित्र प्रदिप ढोबळे यांनी प्रा. हरि नरकेंचा 14 एप्रिल 2020 चा म्हणजे अडीच महिन्यापूर्वीचा लेख आपल्या फेसबूक वॉलवर पुनर्प्रकाशीत केला. याला शूद्धपणे ‘अंगामाढो’ ची पार्श्वभूमी होती व माझे मुद्दे परस्पर हरि नरकेंच्या नावाने खोडून काढणे हाच एकमेव उद्देश होता. प्रा. नरकेंचा हा लेख करोनाच्या वृत्तपत्रबंदीमुळे मला वाचता आला नव्हता. ढोबळेसाहेबांनी तो पुनर्प्रकाशीत केल्यामुळे मला वाचता आला, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.
या तिसर्या लेखांकात मी नरकेंच्या मुद्द्यांचा प्रतिवाद करणार होतो. पण माझ्याआधीच माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असलेले प्रा. रणजीत मेश्राम व केशव वाघमारे यांनी ते काम केले. त्यामुळे या तिसर्या लेखांकाचे नाव मला बदलावे लागत आहे. त्यात आता मी शाहू महाराजांचे नांव समाविष्ट करीत आहे. शाहू राजे हे रूढार्थाने विद्वान, तत्वज्ञानी वगैरे नव्हते. मात्र त्यांची भाषणे व कृती पाहिली तर कोणताही तत्वज्ञानी त्यांच्यासमोर नतमस्तक होतोच! डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन हा मुद्दा सिद्ध केला आहे.
शाहू राजेंसमोर विद्वान, तत्वज्ञानीही नतमस्तक होतात, त्याची मूलभूत कारणे आजही दुर्लक्षित आहेत. केवळ आरक्षण देणारा राजा या एकाच मुद्द्याभोवती शाहू राजेंचे क्रांतिकारकत्व केंद्रीत केले गेले. तर, दुसरीकडे ब्राह्मो कम्युनिस्टांनी शाहू महाराजांचे मूल्यमापन ‘इंग्रजांचे हस्तक’ व ‘ब्राह्मणद्वेष्टे’ म्हणून केल्याने खरा ‘फुलेवादी-मार्क्सवादी’ शाहू राजा लोकांसमोर आलाच नाही. रशियात साम्यवादी क्रांती झाल्यानंतर तीचे स्वागत करणारा पहिला भारतीय छत्रपती शाहू महाराज होते. हे महत्वाचे आहेच, परंतू राजा असूनही कामगार क्रांतीचे समर्थन करणे, ही गोष्ट जगात कुठेही घडणे शक्य नाही. एवढ्यावर शाहू राजे थांबले नाहीत. त्यांनी कामगारांच्या सभेत जाहीरपणे ठासून सांगीतले की, भारतातल्या कामगारांनी रशियाप्रमाणे येथे कामगारांचे राज्य स्थापन करावे’. वास्तविक शाहू महाराज हे इंग्रजांचे मांडलिक होते. संस्थानातील त्यांचे क्रांतीकारक जातीअंताचे कृती-कार्यक्रम पाहता दरबारातील ब्राह्मण इंग्रजांचे कान भरत होते. ‘इंग्रजांनी शाहू राजेंना बरखास्त करावे व त्यांच्या जागी दुसरा कोणताही भटाळलेला सरंजाम नेमावा’, यासाठी तमाम महाराष्ट्रातले विद्वान ब्राह्मण व राजकारणी ब्राह्मण कसून प्रयत्न करीत होते. इंग्रज राज्यकर्ते हे भांडवली-साम्राज्यवादाचे जागतिक नेते होते. त्यामुळे ते स्वाभाविकपणे साम्यवादाचे कट्टर शत्रू होते. अशा परिस्थितीत एकीकडे वैदिक ब्राह्मणांच्या चहाड्या-चुगल्या सुरू असतांना साम्यवादविरोधी इंग्रजांच्या राज्यात साम्यवादी क्रांतीचे जाहिर सभेत गुणगान करणे व कामगारांना त्या क्रांतीसाठी आवाहन करणे, हे एक स्वाभिमानी व द्रष्टा राजाच करू शकतो. सर्वात महत्वाचे हे आहे की, त्या काळात साम्यवाद म्हणजे काय व तो कशाशी खातात, याची कवडी इतकीही जाण भारतीय जनतेला नव्हती. त्यावेळी भारतात कम्युनिस्ट पक्ष जन्मालाही आला नव्हता.
जात्यंतासोबत वर्गांताचीही भाषा शाहू महाराज करीत असतील तर तत्कालीन ब्राह्मणांना ‘घाम’ फुटणे स्वाभाविक होते. शाहू महाराजांचे ऐकूण बहुजन तरूण जर मार्क्सवादाकडे वळलेत तर आपले ब्राह्मणी वर्चस्व नष्ट व्हायला वेळ लागणार नाही, हे तत्कालीन ब्राह्मणांनी ओळखले व त्यांनी ताबडतोब दोन कृती-कार्यक्रम हाती घेतले. 1925 साली दोन घटना घडल्या. एकीकडे काही ब्राह्मण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना करीत होते व त्याचवेळी दुसरे काही ब्राह्मण भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना करीत होते. जणूकाही हे दोघे गट शाहू छत्रपतींच्या मृत्युचीच वाट पाहात होते. आर.एस.एस. ची स्थापना व कम्युनिस्ट पक्षाची स्थापना या दोन परस्परविरोधी घटना वाटत असल्या तरी त्या दोघांचा छुपा अजेंडा सारखाच होता. छुपा अजेंडा हा होता की, ‘या देशातील जातीव्यवस्थेला कोणी धक्का लावू नये. संघाच्या द्वितीय सरसंघचालकांनी कम्युनिस्टांना शत्रूच्या यादीत टाकले असले तरी ती यादी केवळ बहुजनांसाठी होती. काही मूठभर ब्राह्मण कम्युनिस्ट बनून मार्क्सला जाणव्याच्या दोरीने आवळून ठेवत असतील तर ती संघाच्या दृष्टीने आनंदाचीच बाब होती. ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादामुळे जेथे ब्राह्मण नेते आहेत तेथे बहुजन जाणार नाहीत, याची खात्री गोळवलकरांना होती. दुसरी खात्री ही होती की, ‘ब्राह्मणांच्या नेतृत्वाखाली कितीही मोठी साम्यवादी क्रांती झाली, तरी ते जातीव्यवस्थेला धक्कासुद्धा लावणार नाहीत.’ खुद्द कॉम्रेड डांगे यांनीच ती खात्री जाहीरपणे देऊन टाकली. कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक श्रीपाद अमृत डांगे यांनी जाहीरपणे शाहू राजेंना ब्राह्मणद्वेष्टे व इंग्रजांचे हस्तक म्हणून शिक्कामोर्तब केले. एकमेकांचे कट्टर शत्रू असलेले दोन ब्राह्मण ‘‘आपण ब्राह्मण आहोत व एकमेकांचे मित्रच आहोत’’ याची खात्री देण्यासाठी अधूनमधून अशी सूचक वाक्ये बोलत राहतात. वर्णजातीचे समर्थन उघडपणे व आक्रमक-कृतीने करणारे बाळ-टिळक हे कम्युनिस्टांचे व संघाचे ‘‘आदर्श’’ होते, मात्र रयतेचे प्राणप्रिय शाहू राजे हे या दोन्ही संघटनांचे ‘‘शत्रू’’ होते. वैचारिक-तात्विकदृष्ट्या ज्या दोन संघटना एकमेकांच्या कट्टर शत्रू आहेत आणी तरीही त्यांचा ‘‘आदर्श’’ एकच व्यक्ती आहे व शत्रूही एकच आहे. असे अगण्य आश्चर्य जगात कोठेही घडलेले नाही व पुढे घडणारही नाही.
छत्रपती शाहू राजेंनी ना कधी मार्क्सवादाचा अभ्यास केला, ना कोणत्या क्रांतीचा! मात्र त्यांचा ‘द्रष्टेपणा’ हाच त्यांचा गुरू होता. त्यांनी द्रष्टेपणाने हे ओळखले की ‘भारतात जर साम्यवादी क्रांती व्हायची असेल तर त्यासाठी आधी जातीव्यवस्था नष्ट झाली पाहिजे. आणी जातीव्यवस्था नष्ट व्हायची असेल तर त्यासाठी प्रत्येक जातीचे ‘वर्गीय’ धृवीकरण झाले पाहिजे. आरक्षणाच्या कृतीकार्यक्रमातून ‘जातीय’ धृवीकरण व औद्योगिक-भांडवली क्रांतीतून ‘वर्गीय’ धृवीकरण हे एकाचवेळी घडवून आणले तरच जातीअंत व वर्गांत होणे शक्य आहे. भांडवली-औद्योगिक क्रांतीसाठी शाहू राजेंनी पंचसूत्री कार्यक्रम आखला. औद्योगिकरणासाठी ज्या पायाभूत सुधारणा लागतात त्यात जमिन, पाणी, रस्ते आदींसाठि त्यांनी आपली तिजोरी खूली केली. उद्योगांना सरकारी जमिन विनामुल्य उपलब्ध करून दिली. उद्योगासाठी कच्चा माल निर्माण करणार्या शेतकर्यांना बिन-व्याजी कर्ज उपलब्ध करून दिले. कारखाने उभे करण्यासाठी सरकारी तिजोरितील पैसे ‘भांडवल’ म्हणून गुंतवले. सरकारी व खाजगी अशा दोन्ही क्षेत्रांचा मिलाफ करून नवे संयुक्त उद्योग सुरू करण्याचा त्यांनी सपाटा लावला. जे उद्योग खाजगीवाल्यांनी बुडीत काढलेत, त्या उद्योगांचे ‘राष्ट्रीयकरण’ शाहू महाराजांनी केले. याला तुम्ही साम्यवादाची पायाभरणी करणारी भांडवली लोकशाही क्रांती म्हणणार की नाही?
आता शाहू छत्रपतींची ही भांडवली लोकशाही क्रांती जात्यंतक कशी होती व तीचे पुढे काय झाले, हे पुढील भागात पाहू या!....
तो पर्यंत जयजोती जयभीम, सत्य की जय हो!
लेखक - प्रा. श्रावण देवरे,
संस्थापक-अध्यक्ष, ओबीसी राजकीय आघाडी संपर्कः 88301 27270, ईमेलः obcparty@gmail.com
Satyashodhak, Mahatma phule, Rajarshi Chhatrapati shahu maharaj, dr Babasaheb Ambedkar, Bahujan