भडगांव - भडगाव तालुक्यातील वाडे या गावी महाराष्ट्रातील चौथे सार्वजनिक सत्यधर्मीय विधीकर्ते प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या ऐतिहासिक शिबिराचे प्रास्ताविक गावातील सत्यशोधक प्रा. शंकरराव महाजन यांनी केले. या प्रशिक्षण शिबिराच्या अध्यक्षस्थानी सत्यशोधक समाज संघाचे महाराष्ट्र राज्याचे सचिव डॉ. सुरेशजी झाल्टे हे होते. कार्यक्रमाचे उद्घाटक वाडे येथील सरपंच सौ. संगिता रविंद्र माळी, पोलीस पाटील भुषण पाटील, प्रमुख पाहुणे जळगाव जिल्ह्याचे मुख्य समन्वयक पी डी पाटील सर, माळी समाजाचे अध्यक्ष देविदास माळी, समता परिषद तालुकाध्यक्ष भानुदास महाजन व कैलास जाधव, लोकमतचे पत्रकार अशोक परदेशी, महाराष्ट्रातील सत्यशोधक विधीकर्ते साळूबा पांडव ( छत्रपती संभाजीनगर ), राजकिशोर तायडे ( धुळे ), भगवान रोकडे ( चाळीसगाव ) उपस्थित होते
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते वारकरी संप्रदायाचे दैवत विठ्ठल कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवराय,वीर योद्धा महाराणा प्रताप, आधुनिक भारताचे शिल्पकार राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले, ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले, आरक्षणाचे जनक छत्रपती राजर्षी शाहू महाराज, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. खंडेरायाची तळी भरून प्रशिक्षणाला सुरुवात करण्यात आली.
जळगाव जिल्ह्याचे मुख्य समन्वयक पी डी पाटील यांनी सत्यशोधक समाज संघाची भूमिका मांडून सत्यशोधक विधीकर्ते निर्माण करणे ही काळाची गरज आहे. महापुरुषांचा इतिहास आपण समजून त्यांच्या विचारांवर चालले पाहिजे. आपले विधी आपणच करावे वाडे येथील ऐतिहासिक प्रशिक्षण शिबिराचे कौतुक करून यापुढे वाडेगावात सत्यशोधक पद्धतीने विवाहसह इतर विधी होतील अशी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सत्यशोधक समाज संघाचे महाराष्ट्र राज्याचे सचिव डॉ. सुरेशजी झाल्टे यांनी आपली मूळ संस्कृती ही कृषी संस्कृती आहे तिचे जतन करून आचरण केले पाहिजे. आचरणाशिवाय विकास आणि प्रगती मानवाची होऊ शकत नाही असे प्रतिपादन झाल्टे यांनी केले.
मुख्य सत्यशोधक विधीकर्ते प्रशिक्षक साळुबा पांडव, राजकिशोर तायडे, व भगवान रोकडे यांनी प्रशिक्षणार्थींना सत्यशोधक सार्वजनिक सत्यधर्मीय पद्धतीने हळद,विवाह सोहळा, सत्यपूजा, गृहप्रवेश, दशपिंड इत्यादी विधी याचे प्रत्यक्ष प्रयोग करून दाखवले. प्रशिक्षणार्थी म्हणून नामदेव महाजन, प्रा. संतोष बागुल, अनिल बागुल, संगीता महाजन, बुद्धभूषण महाजन, संजय माळी, आकांक्षा माळी, अरुण महाजन, विजय महाजन, ज्योती महाजन यांची उपस्थिती होती.
प्रशिक्षण शिबिराचे सूत्रसंचलन भगवान रोकडे तर आभार प्रा. शंकरराव महाजन यांनी मानले. प्रशिक्षण शिबीर यशस्वीतेसाठी प्रा. शंकरराव महाजन, देविदास महाजन यांनी अथक परिश्रम घेतले.
Satyashodhak, obc, Mahatma phule, Rajarshi Chhatrapati shahu maharaj, dr Babasaheb Ambedkar, Bahujan, Savitri Mata Phule