मनुस्मृती दहन घटना आणि त्यावरून उठलेले वादंग यामुळे महाराष्ट्रातील समाजजीवन ढवळून निघाले. अभ्यास क्रमात मनुस्मृतीचा समावेश करण्यात येण्याच्या निषेधार्थ मनुस्मृती दहन करताना, आ. जितेंद्र आव्हाड यांच्या हातून अनवधानाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला गेला त्यावरून जितेंद्र आव्हाड यांच्यावर रोष व्यक्त होताना दिसून येत आहे.
महाराष्ट्र राज्यातील नामवंत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृती दहन करताना ही घटना घडली. त्यांनंतर त्यांनी आपल्या हातून अनवधानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला गेला त्याबद्दल जाहीर माफी मागितली. तरी त्यांच्याविरोधात मोठ्या प्रमाणात निषेध व्यक्त होत आहे.आगडोंब पेटवून पोळी शेकण्याचा प्रयत्न केला जात आहे.
मनुस्मृती हा ग्रंथ नेहमीच प्रचंड वादग्रस्त राहिलेला आहे. जातीव्यवस्था पक्की करुन ब्राम्हणी वर्चस्व प्रस्थापित करून ते कायम टिकवून ठेवण्यासाठी हा ग्रंथ मनुस्मृतीच्या समर्थकांच्या गळ्यातील ताईत ठरला आहे.त्यामुळे या व्यवस्थेचे समर्थक नेहमीच समतावादी मूल्ये विरोधक असतात. वेद, पुराण स्मृती आदी तथाकथित धर्मग्रंथ - वैदिक वाङ्मयातून रुजवली गेलेली जातवर्णव्यवस्था मनुस्मृतीच्यामुळे अधिक बाधक,जाचक ठरली. या देशात स्त्रीशुद्रातिशुद्रांचा जुलुमी काळाकुट्ट भूतकाळ स्त्रीशुद्रातिशुद्रांच्या शैक्षणिक प्रगतीमुळे समोर येत आहे, आणि मनुस्मृतीतील अमानुष तत्वे निषेधार्ह ठरत आहे. ती तत्वे त्याज्य वाटून मनुस्मृती धिक्कार-दहन सारखे कार्यक्रम होत आहे.व्यापक जनाधाराने आणि मोठ्या संख्येने असं कार्यक्रम व्हायला खूप वाव आहे. खरं म्हणजे,विषमतावादी पायंडे पुसून टाकून समतावादी मूल्यांचा अंगिकार करणाऱ्या समतावादी समाजाच्या अस्तित्वात येण्याची ही खूण समजली पाहिजे. पण मनुस्मृती समर्थक आपले समाजातील सार्वभौमत्व अर्थात उच्च जातवर्चस्व टाकून द्यायला तयार होत नाही. उलट मनुस्मृती निषेध त्यांच्या जिव्हारी लागतो. जातवर्चस्व विरोधी लढे आणि लढवय्ये त्यांच्या लक्ष्यस्थानी असतात.
मनुस्मृती निषेधाला प्रदीर्घ ऐतिहासिक पार्श्वभूमी राहिलेली आहे. महात्मा फुल्यांच्या धर्मचिकित्सेच्या अपूर्व महाप्रयासातून या देशातील समस्त स्त्रिशुद्रातिशूद्रांना इतिहासाकडे बघण्याची नवीदृष्टी प्राप्त झाली.या देशातील अब्राह्मणी कष्टकरी श्रमण सिंधुजनांच्या सृजनशील सांस्कृतिक परंपरेचे अस्तित्व भान येऊ लागले आहे. ज्या ब्राम्हणी चोपड्यांमधून स्त्रीशुद्रातिशुद्रांच्या शोषणाची जाळमुळं खोलवर जाऊन अमानवीय शोषणाचा विषवृक्ष फोफावत आला आहे. त्या ग्रंथांचे दहन करण्याचे समर्थनच होऊ शकते. आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती दहन करुन हे सिद्ध केले. मनुस्मृती दहन म्हणजे या देशातील तमाम स्त्रिशुद्रातिशूद्रांना मुक्ती दायी मार्गक्रमण करण्याचा संदेश होय आणि याच अंगाने मनुस्मृती दहन अनेकानेक वेळा होत आहे. स्त्रिशुद्रातिशूद्रांना अमानवीय नियमात बंदिस्त करुन ठेवलेल्या मनुस्मृतीचे दहन अनेक समाजघटक आणि मध्यम व निम्नजात संघटना करताना त्यांच्या या कृतीकडे ऐतिहासिक घटना म्हणून बघितलं जाते. विदर्भ तेली समाज महासंघ या कार्यात एक पाऊल पुढे आहे.जातीय मानसिकतेतून तेली समाजाला हीन लेखले गेले त्यात्या प्रत्येक वेळी ही समाज-जात संघटना चळवळ संघर्षासाठी अग्रेसर राहिली. ओबीसी मधील अनेक जातसंघटनाचीही कार्यपद्धती काहीशी अशाच स्वरुपाची दिसून येईल.
हीच ती मनुस्मृती जिच्या शिरसावंद्य कायद्याच्या अनुषंगाने स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नाही दिला. ओबीसी भटके शूद्र; दलित अतिशूद्र; आदिवासी यांनी विद्यामंदिराचा उंबरठा ओलांडणे महापातक म्हणून सांगण्यात आले.शिक्षण घेतल्याने धर्म बुडतो हेच ठसवण्याची लबाडी केली गेली. ज्या मनुवादी व्यवस्थेनं स्त्रिशुद्रातिशूद्रांना विद्याबंदी केली, ती मोडून काढण्यासाठी त्याविरुद्ध मोठी शैक्षणिक चळवळ उभी राहिली. शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण होण्यासाठी कित्येक पिढ्या झुंजल्या,शिक्षण समाजात रुजण्यासाठी महामानवांनी अनेक संकटांना तोंड देत नेटाने शैक्षणिक क्रांती घडवून आणली. शिक्षण स्त्रिशुद्रातिशूद्रांना मिळू लागल्याने चिकित्सक विवेकी जागृकतेतून ऐतिहासिक जाणिवा निर्माण होऊन बहुजन समाज आता कुठं आपला स्वतःचा इतिहास सांस्कृतिक वारसा शोधू लागला आहे. आणि हीच बाब मनुस्मृतीच्या समर्थकांना नको आहे. वैदिक व्यवस्थेला ज्यांनी छेद दिला त्यांचे वैदिकीकरण करायचे, नाहीतर दैवतीकरण करायचे किंवा विदृपिकरण नाहीतर विकृतीकरण करायचे अशीच वैदिकांची कार्यपद्धती राहीलेली आहे, हेच इतिहास सागतो. त्याच धर्तीवर शिक्षणाचे वैदिकीकरण, ब्राम्हणीकरण भगवेकरण करण्यासाठी मध्यंतराने न् सातत्याने प्रयत्न केले आहेत. अभ्यासक्रमात मनुस्मृती लागू करण्याचा अंक त्याचाच एक भाग असण्यापलिकडे दुसरे काय असणार आहे?
त्याच्या निषेधार्थ आ. जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृती दहन केले,ही घटना खरं तर शिवाजी फुले शाहू आंबेडकर यांना मानणाऱ्या महाराष्ट्राची मान उंच करणारी आहे.पण त्याप्रसंगी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला गेल्याने,त्यावर वादंग उठवले गले. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती दहन केले होते. फुले शाहू आंबेडकर यांना मनापासून मानणाऱ्या आ. जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृती दहन करुन एकप्रकारे वैचारिक व संघर्षाचा वारसाच जोपासला म्हणावे लागेल पण,मनुस्मृती दहन या घटनेपेक्षा बाबासाहेबांचा फोटो फाडल्याचा अधिक बोभाटा केला गेला. त्याला मनुस्मृतीच्या समर्थकांनी अधिकच हवा देण्याचे काम केले पण,आंबेडकरांना मानणाऱ्या महाराष्ट्रात आता प्रतिगाम्यांच्या गमजा उमजण्याची प्रज्ञा फुलू लागली असल्याने मनुवाद्यांचे मनसुबे फत्ते होऊ शकलेले नाही.(समाजमाध्यमावरील अभिव्यक्ती: जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करताना भाजपाची आणि आपली भाषा एक असता कामा नये. सावधान!
अभ्यासक्रमात मनुस्मृती शिकवण्याच्या निर्णयाविरोधात जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथे मनुस्मृतीचे प्रतिकार्थी दहन करताना चुकून या पोस्टवर बाबासाहेबांचा फोटो फाडला गेला. आव्हाडांनी अनावधानाने झालेल्या या कृतीची माफी जाहीर माफी मागितली आहेच. ती आंबेडकरवादी म्हणून आपल्यासाठी पुरेशी आहे.
जितेंद्र आव्हाड यांचा एकूण प्रवास आणि वैचारिक स्पष्टता लक्षात घेता भाजपाने कांगावा करून आव्हाडांची जी सार्वजनिक लिंचींग चालवलेली आहे त्यात आंबेडकरवादी म्हणून आपण सामिल होता कामा नये.
आव्हाडांचा निषेध करायला भाजपाचे सर्व नेते हौशेने उतरलेत ते का उतरलेत? हे आंबेडकरवादी जनतेने समजून घ्यावे. भाजपाईंची आंबेडकर आणि राज्यघटनेबाबत कसलीही प्रतिबद्धता नाही हे आपण सर्वजण चांगलेच जाणतो. जितेंद्र आव्हाड यांचा अभिमन्यू करायचा भाजपाचा प्लान आपण उधळून लावायला हवा.
अजूनही भाजपाई अभ्यासक्रमात मनुस्मृती शिकवण्याविरोधात चक्कार शब्द बोलत नाहीत. ते फक्त उसनं आंबेडकरप्रेम आणून आव्हाडांची नियोजनबद्ध लिंचींग सुरूय. आपल्याइतकी वैचारिक स्पष्टता आणि राजकीय शहाणपण असणारा समुह दुसरा नाही. तेव्हा जरा थंड घ्या!
आव्हाडांचा मनुस्मृतीविरोधाचा हेतू लक्षात घ्या. आणि चुकून घडलेल्या कृतीकडे दुर्लक्ष करा. -धम्मसंगिनी यांची पोस्ट) अशाप्रकारे सामंजस्य निर्माण करणाऱ्या समाजचिंतकांच्या भूमिकेमुळे समाजभान येत आहे.आपापसातील संघर्ष निवळले जाऊन समन्वय सहकार्य अधिक प्रभावी ठरत आहे.
ओबीसी भटके मराठा दलित आदिवासी अल्पसंख्यांक यांच्यात कलगीतुरा लावून अघोरी आनंदच मिळतो असे नाही, तर ओबीसी, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक यांच्यात बेकी निर्माण करुन उच्चजातवर्चस्व जोपासना करणे ही यामागील गोम आहे. हनुमान चालिसा नाट्य, मशिदीवरील भोंग्यांचा वाद उभा करण्याचा प्रयत्न करुन सामाजिक तेढ निर्माण करणे सोपे नाही. ओबीसी मधील आत्मभान जागृत होत असल्याने त्यांची खेळी फसली असताना आ.जीतेंद्र आव्हाड यांच्यावर चाललेली कोल्हेकुईदेखिल नवीन वाटण्याचे कारण नाही. तरीही सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक प्रशासकीय राजकीय आर्थिक क्षेत्रात उच्चजातवर्णी सर्वस्वी अधिसत्ता शाबूत ठेवणे जीवनाचे परमकर्तव्य मानणाऱ्या प्रतिगामी शक्तिपासून सावध राहावे लागेल.हीच आमच्या महामानवांची शिकवण, त्याचे सातत्याने विस्मरण होता कामा नये.
■ अनुज हुलके
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan, Mandal commission