बाळासाहेब आंबेडकर व हेमंत गोडसे वगैरे

लोकसभा - 2024 च्या निवडणूकीत ओबीसी - उत्तरार्ध

- प्रा. श्रावण देवरे

     ही लेखमाला मी आपसात भांडणासाठी लिहीत नाही आहे. ज्यांना असे वाटते की, मी आपल्याच लोकांच्या चूका दाखवित आहे, त्यांनी एक महत्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की, जो पर्यंत आपणच आपल्या चूका शोधून त्या चर्चेसाठी जाहीर केल्या नाहीत तर पुढच्या निवडणूकीत याच चूका वारंवार रिपीट होतील व शत्रूला फायदेशीर ठरतील.

Maharashtra OBC vs Prakash Yashwant Ambedka - Hemant Godse     पुर्वार्धात आपण पाहिले की, आपल्या थोड्याफार जागृत झालेल्या ओबीसींनी आपल्याच लोकांना धडा शिकविला. घरातील कुर्‍हाडीचे दांडे काढून फेकून दिल्यावर बाहेरून घाव घालणार्‍या कुर्‍हाडींना त्यांनी धडा शिकविला.

हेमंत गोडसे

     माननीय भुजबळसाहेबांचे नाशिकचे तिकीट कापण्यात सगळ्यात जास्त अग्रेसर होते माजी खासदार हेमंत गोडसे. ‘मराठ्यांना ओबीसीमधूनच आरक्षण दिले पाहिजे’, अशी मागणी करून खासदारकीचा राजीनामा देणार्‍या हेमंत गोडसेंना ओबीसी कसे सोडतील ?

     गोडसेंनी ओबीसींचा व भुजबळांचा नेहमीच द्वेष केलेला आहे. भुजबळांचे तिकीट दिल्लीहून जाहीर होताच काही गावात भुजबळांच्या विरोधात बॅनर झळकले ते गोडसेंच्या सांगण्यावरूनच! कृत्रिम पद्धतीने भुजबळविरोधी वातावरण गोडसेंनी तयार केले आणी RSS चे तथकथित सर्व्हेजीवी बुद्धिवंत या कृत्रिमतेला फसले, असे होणे शक्य नाही. '‘ओबीसी मतदार कुठे जात नाहीत, ते आपल्याच खिशात आहेत’’, असे गृहित धरून मराठा मतदारांसाठी संघ-भाजपाने भुजबळांचे तिकीट कापले. भुजबळांचे नाशिक लोकसभेचे तिकीट कापल्यानंतर ‘तुमच्या सर्वोच्च राष्ट्रीय ओबीसी नेत्याला आम्ही लढाई सुरू होण्या आधीच चीतपट केले’ असा अपमानास्पद मेसेज अप्रत्यक्षपणे देणार्‍या हेमंत गोडसेंना ओबीसी कसे सोडून देतील? हेमंत गोडसे एवढाच अपमान करून थांबले नाहीत, भुजबळ हे महायुतीचे एक दिग्गज नेते असुनही भुजबळांचा फोटो एकाही बॅनरवर गोडसेंनी छापला नाही. आम्हाला तुमच्या ओबीसी मतांची गरज नाही, अशी गुर्मी ते दाखवित होते. केवळ फडणवीसांच्या व अजित पवारांच्या आग्रहाखातर त्यांना गोडसेंच्या प्रचारसभेत सहभागी व्हावे लागले. भुजबळांच्या कृतीत काय आहे, त्यापेक्षा त्यांच्या मनात काय आहे, हे नाशिकच्या लोकांनी ओळखले आणी त्यांनी गोडसेंना निवडणूकीत चीतपट करून दाखविले.

बाळासाहेब प्रकाश आंबेडकर

     आणखी एक उमेदवार नेते माननीय बाळासाहेब प्रकाश आंबेडकर! यांनी तर सुरूवातीपासूनच ओबीसी-मराठा संघर्षात मराठ्यांची बाजू उचलून धरली आहे. जरांगेला पाठींबा देण्यासाठी धावत जाणारे हे एकमेव दलित नेते होत. हे नेते केवळ जरांगेला पाठींबा देऊन थांबले नाहीत, तर शिवाजी पार्कवरील जाहिर सभेत ओबीसी नेत्यांवर अप्रासंगिक टिका केली.

     भूजबळसाहेब हे प्रकाश आंबेडकरांचे मुख्य टार्गेट होते व आहेत. तरीही भुजबळसाहेबांनी प्रकाश आंबेडकरांना विनम्रपणे उत्तर दिले की, ‘माझे काही चूकले असेल तर माझे कान पीळा, परंतू ओबीसींच्या जीवावर का उठला आहात? ओबीसींनी तुमचं काय नुकसान केले आहे?’’ परंतू भुजबळांच्या या मोठेपणाची दखल आंबेडकरांनी घेतली नाही. या उलट जरांगेची वारंवार दखल घेत, ‘जरांगेने पाणी पीऊन उपोषण करावे’, ‘जरांगेने प्रकृतीला जपावे’, ‘जरांगेच्या जीवाला धोका आहे, ‘त्याला विषप्रयोग होऊ शकतो’, ‘त्याने एकांतात एकट्याने जेवण करू नये’, ‘जरांगेला खासदार बनवून लोकसभेत पाठवले पाहिजे’, अशी अनेक 'प्रेमपत्रे' लिहून जरांगेची जीवा-भावाने काळजी घेणारे प्रकाश आंबेडकर ओबीसी उपोषणकर्त्यांची साधी दखलही घेत नाहीत. जरांगे उपोषणाला बसताच तिकडे चंद्रपूरला रविंद्र टोंगे नावाचे ओबीसी लढवैय्ये उपोषणाला बसलेत. हे उपोषण जरांगेच्या उपोषणापेक्षा कितीतरी जास्त दिवस चालले.

     जरांगे समर्थक गुंडांनी जाळपोळ करून ओबीसी नेत्यांच्या व ओबीसी आमदाराच्या घरावर हल्ला केला, आमदाराची बायको, पोरे व म्हातार्‍या आई-वडिलांना जीवंत जाळण्याचा प्रयत्न केला, याचा साधा निषेधही प्रकाश आंबेडकरांनी केला नाही. ‘‘दलित ओबीसी हे लायकी नसलेले लोक आहेत, त्यांच्या हाताखाली आम्हा उच्चकूलीन मराठ्यांना काम करावे लागते’’, अशी लत्ताफळे उधळणार्‍या जरांगेच्या लाथा ज्यांच्या ढुंगणाला गोड लागत असतील त्यांनी त्या लाथा जरूर खाव्यात, परंतू जातीय दंगलीसदृश्य वातावरणात असत्याची बाजू घेऊन त्यात रॉकेल टाकणार्‍यांनी किमान फुलेआंबेडकरांचे नाव घेणे बंद केले पाहिजे.

     सर्वात महत्वाचा प्रश्न हा आहे की, ओबीसींनी प्रकाश आंबेडकरांचे असे कोणते नुकसान केले आहे, की जेणेकरून त्यांनी ओबीसींशी शत्रुत्व घ्यावे? याच प्रश्नाची दुसरी बाजू असा प्रश्न उपस्थित करते की, प्रकाश आंबेडकरांना मराठ्यांपासून असा कोणता फायदा झाला आहे की, त्यांनी ओबीसींच्या विरोधात मराठ्यांना डोक्यावर घेतलेले आहे? हे दोन्ही मुद्दे आपण विस्ताराने पाहू.

*1) प्रकाश आंबेडकरांनी त्यांच्या आधीच्या व आताच्या पक्षातर्फे अनेक मराठ्यांना व अनेक ओबीसींना तिकीटे दिली आहेत. परंतू, आजवर मराठ्यांनी एकही आमदार प्रकाश आंबेडकरांच्या तिकीटावर निवडून दिलेला नाही.
*2) ओबीसींनी मात्र आतापर्यंत पाच ओबीसी आमदार प्रकाश आंबेडकरांना दिलेले आहेत.
*3) मराठ्यांमध्ये अनेक विद्वान, सिलिब्रिटी, एक्टर, आहेत. परंतू त्यापैकी एकही विद्वान वा सिलीब्रिटी प्रकाश आंबेडकरांना मान्यता देत नाही.
*4) ओबीसी विद्वान प्रदिप ढोबळे व प्रा. श्रावण देवरे यांनी सातत्याने प्रकाश आंबेडकरांच्या बाजूने लिहीले आहे, बोलले आहेत. एक तरी मराठा विद्वान दाखवा ज्याने प्रकाश आंबेडकरांसाठी लेखणी झिजवली आहे.
*5) प्रकाश आंबेडकरांच्या विनंतीला मान देऊन प्रा. श्रावण देवरे याने अनेक वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांचा निवडणूकीत प्रचार केला आहे. असा एकतरी मराठा बुद्धिवंत दाखवा ज्याने प्रकाश आंबेडकरांच्या उमेदवारांचा प्रचार केलेला आहे.
*6) ओबीसींमधील मान्यवर सिलीब्रिटी माननीय निळूभाऊ फुले (ओबीसी-माळी), सुप्रसिद्ध किर्तनकार बाबा महाराज सातारकर (ओबीसी-नाभिक), 'रामनगरी फेम' राम नगरकर (नाभिक) आदिंनी आपले एक्टिंग करियर पणाला लावून तुम्हाला तनमनधनाने साथ दिली आहे.
*7) असा एक तरी मराठा एक्टर, मराठा किर्तनकार वा मराठा कलाकार दाखवा ज्याने आपले करियर धोक्यात टाकून प्रकाश आंबेडकरांसोबत महाराष्ट्रभर फिरला आहे.
*8) अकोला मतदारसंघ इतर सर्व मतदारसंघांप्रमाणेच ओबीसी बहुल आहे. प्रकाश आंबेडकरांचा कथित ‘अकोला पॅटर्न’ हा केवळ ओबीसी मतदारांवर विसंबून आहे.
*9) प्रकाश आंबेडकरांचे मराठा-प्रेम इतके नतद्रष्ट आहे की ते त्यासाठी स्वतःच्या पायावर कुर्‍हाड मारून घेतात. अकोला जिल्ह्यातील बाळापूर विधानसभा मतदारसंघातून माननीय बळीराम सिरसकर (ओबीसी-माळी) हे प्रकाश आंबेडकरांच्या पक्षातर्फे सतत दोनवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. 2019 साली ते हॅटट्रीक करणार होते. परंतू ओबीसी सिरसकरांचे तिकीट कापून ते कट्टर जातीयवादी असलेल्या मराठ्याला देण्यात आले. हमखास निवडून येत असलेल्या सीटवर मराठ्याला तिकीट दिले आणी हा मराठा तिसर्‍या क्रमांकावर फेकला गेला.
*10) अनेक ओबीसी जातींचे नेते व कार्यकर्ते मराठा-ब्राह्मणांच्या दहशतीला झुगारून तुमच्या सोबत महाराष्ट्रभर काम करीत फिरत होते. त्यात कल्याण दळे (ओबीसी-नाभिक), बालाजी शिंदे (ओबीसी-धोबी), डॉ. दिलीप घावडे (ओबीसी-माळी), प्रकाश राठोड (ओबीसी-वंजारी), डॉ. बी. डी. चव्हाण (ओबीसी-बंजारा), अनंतकुमार पाटील (ओबीसी-धनगर), वामनराव हराळ (ओबीसी-धनगर), हनुमंतराव उपरे (ओबीसी-भावसार), लक्ष्मन माने (ओबीसी-कैकाडी), अशोकराव सोनवणे (ओबीसी-कुंभार) अशी शेकडो नाही, हजारो नावे मला येथे लिहीता येतील. आपल्या ऐन तारुण्यात व ऐन उमेदीच्या काळात हे हजारो ओबीसी कार्यकर्ते व नेते तुमच्यासोबत फुलेआंबेडकरी राजकीय चळवळ उभी करण्यासाठी राब-राब राबत होते. परंतू नेतृत्त्वाच्या न्युनगंडापायी तुम्ही या हजारो ओबीसींचं सोनं करण्याऐवजी त्यांची अक्षरशः माती केली.
*11) ओबीसींनी तुमच्यावर व तुमच्या पक्षावर अनेक उपकार केले आहेत, त्याची परतफेड तुम्ही त्यांचे आरक्षण नष्ट करून केली आहे. ओबीसी आरक्षण नष्ट करायला जेवढा जरांगे जबाबदार आहे, तेवढेच तुम्हीही जबाबदार आहेत.
*12) जरांगेला तुम्ही खासदार बनवण्यापासून मराठ्यांचा बाबासाहेब बनवण्यापर्यंत मजल मारली. संपूर्ण दलित शक्ती तुम्ही जरांगेच्या पाठीशी उभी केली. छटाकभर जरांगेला तुम्ही मणभर मोठा केला. तुम्ही केलेल्या या उपकाराची परतफेड म्हणून या जरांगेने अकोला मतदारसंघात येऊन तुमच्यासाठी एकजरी सभा घेतली असती तरी तुम्ही निवडून आला असता. जरांगेवर तुम्ही केलेल्या अनंत उपकाराची परतफेड जरांगेला अशा पद्धतीने करता आली असती, परंतू जरांगे ‘दलित-ओबीसींना लायकी नसलेले लोक’ म्हणत असल्याने तो प्रकाश आंबेडकरांसाठी सभा घेण्याचा व त्यांना निवडून आणण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

     अशा प्रकारे ओबीसींचे आरक्षण नष्ट करायला मदत करणार्‍या दलित-ओबीसी-मराठा उमेदवारांना ओबीसींनी धुळ चारली, हे ओबीसींचे राजकीय प्रशिक्षण सुरू झाल्याचे लक्षण आहे. हे राजकीय प्रशिक्षण लवकरच उच्चशिक्षणात परिवर्तीत होईल व विधानसभेच्या निवडणूकीत त्याची गोड-फळे दिसायला लागतील, यात मला शंका वाटत नाही.
तो सोनियाचा दिन अवश्य दिसेल, तो पर्यंत जयजोती! जयभीम!! सत्य की जय हो!!

- प्रा. श्रावण देवरे, संस्थापक-अध्यक्ष, ओबीसी राजकीय आघाडी, संपर्कः 88301 27270 ईमेलः obcparty@gmail.com

obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan, Mandal commission, Bharatiya Janata Party, Republican Party of India
Share on Twitter
Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209