लोकसभा-2024 च्या निवडणूकीत महाराष्ट्रातील ओबीसी

ओबीसींच्या राजकीय प्रशिक्षणाची सुरूवात - (पुर्वार्ध) - प्रा. श्रावण देवरे

     हे मान्यच आहे की, महाराष्ट्रातील ओबीसी समाजघटक हा राजकारणात स्वतंत्रपणे उभा राहण्यात अनेक अडचणी आहेत. तो साधनहिन आहे, विविध जातीत, पक्षात व संघटनांमध्ये विखूरलेला आहे. महत्वाचे म्हणजे तो राजकीयदृष्ट्या प्रशिक्षित नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणावर आपला स्वाभिमानी ठसा तो उमटवू शकत नाही.

OBC in Maharashtra in Lok Sabha - 2024 elections     पण याचा अर्थ तो एकदमच मठ्ठ आहे किवा अजिबातच गंभीर नाही किंवा ओबीसी म्हणून अजिबातच जागृत नाही, असे म्हणता येत नाही. निदान 2024 च्या लोकसभा निवडणूकीत त्याने आपले राजकीय प्रशिक्षण सुरू केले आहे, असे म्हणायला जागा आहे. ओबीसींची झालेली जागृती जरांगे-केंद्रीत असल्याने ती सामाजिक-राजकीय स्तरावर गेली नसली तरी व्यक्तिगत स्तरावर निश्चितच परिणामकारक ठरलेली आहे

    म्हणजे जरांगेमुळे आपले सगळे ओबीसी आरक्षणच खतम झाले, याचा राग जेव्हढा जिव्हारी लागायला हवा होता, तेवढा तो तीव्रतेने लागला नाही. त्यापेक्षा जरांगेने आपल्या प्रिय ओबीसी नेत्याला दिलेल्या शीव्या व त्याने ओबीसी कार्यकर्त्यांची जाळलेली घरे, जरांगेसमर्थकांची गुंडगिरी इत्यादि व्यक्तीगत पातळीवरचे मुद्दे जास्त जिव्हारी लागलेत. अशा प्रकारे व्यक्तिगत पातळीवर प्रकरण आल्यावर टार्गेट करण्यासाठी माणसे शोधली जातात. त्यात घरातलीच माणसे सर्वप्रथम टार्गेट होत असतात, कारण ती जवळची असतात.

    घरात व घराबाहेर विषारी साप असतील तर सर्वप्रथम आपण घरातले विषारी साप मारत असतो. घर आतल्याबाजूने सुरक्षित झालं की मग आपण बाहेरचे साप शोधतो. 2024 च्या निवडणकीत नेमके हेच झाले. ज्यांनी मराठा-ओबीसी संघर्ष पेटविला, त्यांचा उद्देश व्यापक सामाजिक-राजकीय होता, तो त्यांनी साध्यही केला. परंतू त्यांनी धुर्तपणे या ओबीसी-मराठा संघर्षाला ‘जरांगे-भुजबळ’ अशा व्यक्तिगत पातळीवर आणून ठेवला आणी ओबीसी नेमका या षडयंत्राला बळी पडला.

    परंतू हेही नसे थोडके असे समाधान मानले पाहिजे कारण ओबीसी ताकद या निमित्ताने का होईना एकदाची सिद्ध झाली. या ताकदीचा पहिला मोठा झटका पंकजा मुंडे यांना बसला आहे. तो कसा ते आपण पाहू या!

    जरांगेच्या जाळपोळीच्या व गुंडगिरीच्या पार्श्वभुमीवर अंबड येथे जी पहिली ओबीसी महासभा भुजबळांनी घेतली, त्या सभेचं निमंत्रण असतांनाही पंकजा मुंडे या सभेस जाणीवपूर्वक गैरहजर राहील्यात. संयोजकांनी भुजबळांच्या आदेशाने पंकजा मुंडे यांचे फोटो सर्वत्र फ्लेक्स बोर्डवर लावलेले होते. निवडणूका तोंडावर असतांना आपल्याच जिल्ह्यात आपल्या मतदारसंघात एवढी मोठी महासभा ओबीसींची होत असतांना कोणता मुर्ख राजकारणी या सभेपासून लांब राहील? पण हा मुर्खपणा पंकजा मुंडेंना करावा लागला कारण त्यांचेवर फडणवीसांच्या आदेशाचा व जरांगेच्या दहशतीचा प्रभाव होता. भुजबळ वाजवीपेक्षा मोठे झालेत तर ते ओबीसी पक्ष काढून ब्राह्मण-मराठ्यांचे राजकारण नष्ट करू शकतात, या भीतीपोटी फडणवीस-जरांगेने पंकजा मुंडे यांना अंबड सभेपासून लांब राहायला सांगीतले. यासाठी एकाने चिक्की प्रकरणाची भीती दाखविली व दुसर्‍याने मराठा वोटबँकेची भीती दाखवीली.

    भुजबळांना एकटे पाडण्याचे प्रयत्न ब्राह्मण-मराठ्यांनी संयुक्तपणे केलेत. फडणवीसांनी पंकजा मुंडेंना रोखले, शरद पवारांनी बीडमधील त्यांचे आमदार संदिप क्षीरसागर यांना रोखले व अजित पवारांनी त्यांचे आमदार धनजय मुंडेंना रोखून धरले. संदिप क्षिरसागर हे तेच ओबीसी आमदार आहेत, ज्यांच्या घरावर जरांगे समर्थक गुंडांनी जीवघेणा हल्ला केला होता. घरातील क्षीरसागरांची बायको, आई व लहान मुलांना पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला होता.

     भुजबळांच्या ओबीसी महासभा आपल्यालाही फायदेशीर ठरतील असा विचार करून भाजपाचे खासदार रामदास तडस (वर्धा) व कपिल पाटील (भिवंडी) यांनी भुजबळाच्या सभांचे आयोजन केले, मात्र ऐनवेळी फडणवीसांनी डोळे वटारल्याने दोन्ही सभा स्वतः आयोजकांनीच जाणीवपूर्वक फेल केल्यात.

    ज्या आमदार-खासदारांनी जाणीवपूर्वक भुजबळांना एकटे पाडण्याचा व सभा फेल करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याविरोधात भुजबळसाहेबांनी एका ब्र शब्दाने सुद्धा नाराजी व्यक्त केली नाही. परंतू भजुबळांना मानणारा ओबीसी समाजघटक राजकीयदृष्ट्या थोडासा का होईना जागृत झालेला असल्याने, त्याने आपल्या साहेबांच्या मनात ‘नेमके’ काय आहे ते ओळखले व त्याप्रमाणे त्यांनी लोकसभा निवडणूकीत करून दाखवले. बीड लोकसभा मतदरसंघातील वंजारेतर ओबीसी जाती पंकजा मुंडेंवर नाराज होत्या, कारण पंकजा मुंडे या अंबडच्या ओबीसी महासभेला गैरहजर राहील्या व भुजबळांना एकटे पाडण्याचा प्रयत्न केला होता.

    ओबीसी विरुद्ध मराठा संघर्षाचे केंद्र बीड मतदारसंघ असल्याने तेथील मराठा मतदारांनी त्वेषाने व मोठ्या संख्येने मराठा उमेदवार बजरंग सोनवणेंना मतदान केले. परंतू तेवढ्याच त्वेषाने ओबीसी मतदारांनी पंकजा मुंडेंना मतदान केले नाही. बीड लोकसभा मतदारसंघातील एकूण 8 लाख ओबीसी मतदारांनी त्वेषाने मतदान केले असते तर बजरंग सोनवणे यांचा (6 लाख, 83 हजार, 950 मतातील) 7 हजारांचा लीड कुठल्या कुठे वाहून गेला असता व पंकजा मुंडे किमान दिड लाखांच्या लीडने निवडून आल्या असत्या. पण हे केव्हा घडले असते? जर पंकजा मुंडे त्वेषाने बीडच्या सभेला गेल्या असत्या व भुजबळांच्या पाठीशी आक्रमकपणे उभ्या राहील्या असत्या, तर ओबीसी मतदारांनीही त्याच त्वेषाने मतदान करून पंकजा मुंडे यांना निवडून दिले असते. भुजबळांनी माननीय गोपीनाथ मुंडे यांच्या दोस्तीची आठवण ठेवत समता परिषदेच्या कार्यकर्त्यांना पंकजा मुंडेंच्या प्रचारासाठी कामाला लावले. सावता परिषदेचे कल्याणराव आखाडे व समता परिषदेचे सुभाष राऊत हे पंकजा मुंडेंच्या प्रचारात सहभागी झाले नसते तर पंकजा मुंडेंचं डिपॉझिटच जप्त झाले असते.

    भुजबळांच्या सभा आयोजित करून स्वतःच त्या सभा फेल करणारे भाजपाचे खासदार रामदास तडस (वर्धा) व कपील पाटील (भिवंडी) या दोघांना ओबीसी मतदारांनी धूळ चारली. भुजबळांना एकटे पाडणारे आमदार *धनंजय मुंडे व संदिप क्षिरसागर* यांची दमछाक विधानसभा निवडणूकीत कशी होणार आहे, हे पाहणे रंजक ठरेल.

    दुसरे एक ओबीसी नेते महादेव जानकर! जरांगेच्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी धावत जाणारे एकमेव ओबीसी नेते जानकर आहेत. भुजबळांच्या महासभांना उपस्थिती देऊन त्यांनी ही चूक दुरूस्त करण्याचा प्रयत्न केला, मात्र ‘‘आपण जरांगेला पाठींबा देण्याची चूक केली’’, अशी कबूली त्यांनी कधीच दिली नाही. ओबीसी समाजाची माफी मागण्याची फार मोठी संधी त्यांना ओबीसी महासभांनी दिली होती, मात्र या संधीचं सोनं त्यांना करता आले नाही. एकाही ओबीसी महासभेत जानकरांनी जरांगेच्या विरोधात ब्र शब्दही काढला नाही. जानकरांची ओबीसीनिष्ठा नेहमीच डळमळीत राहीलेली आहे. एकीकडे आपल्या रासप पक्षाला ओबीसींचा पक्ष म्हणायचे आणी दुसरीकडे आपला पक्ष ओबीसींचा शत्रू असलेल्या भाजपच्या दावणीला बांधून मंत्रीपद मिळवायचे. स्वतंत्र ओबीसी उमेदवार म्हणून निवडणूक लढवायची आणी ओबीसींचे कट्टर शत्रू असलेल्या मोदींची सभा घ्यायची. एकीकडे स्वतःला ओबीसी नेता म्हणायचं आणी तिकडे ओबीसींचा शत्रू असलेल्या जरांगेला पाठींबा द्यायचा, अशी डबल ढोलकीवाली संधीसाधू निष्ठा ओबीसी मतदारांनी ओळखली आणी त्यांनी परभणी लोकसभा निवडणूकीत जानकरांना धडा शिकवला.

     उत्तरार्ध.. तो पर्यंत जयजोती! जयभीम!! सत्य की जय हो!!!

*-प्रा. श्रावण देवरे, संस्थापक - अध्यक्ष, *ओबीसी राजकीय आघाडी, *संपर्कः 88301 27270 *ईमेलः obcparty@gmail.com

obc, Mahatma phule, Bahujan, Mandal commission, Savitri Mata Phule
Share on Twitter
Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209