प्रिय,
भीमराया, (तुम्हास हे पत्र...) #Happiest_Birthday #Equality
तुमच्याकडे बघून डॉक्टर व्हावंसं वाटतं, सातत्याने सकस शिक्षण घ्यावं अन् द्यावं, हे चक्र डोक्यात फिक्स बसतं आणि या विचाराने अभ्यासासाठी जीव दिवसरात्र झपाटला जातो.तुम्ही अंधाऱ्या समाजाला प्रकाशाची आणि विवेकी वाट दाखवलीत. दिनदुबळ्यांचे आधार बनलात, कष्टकऱ्यांसाठी हक्काचा माणूस बनवलात.धर्म-जातीपलिकडे माणूस म्हणून जगणं शिकवलंत.एवढेच नाहीतर शिकवणीतून वाचनाचे,शिक्षणाचे बीज पेरलेत.तहानलेल्यांना पाणी दिलंत, भुकेलेल्यांना अन्न दिलंत.असे तुम्ही किती तरी लढे दिलेत,किती संघर्ष केलात हे मांडू तितके कमी आहे.पण समाजाने काय घेतलं ? समाजाने यातून फक्त घेतला तो जयघोष,निळ्या रंगातील झेंडा आणि राजकारण,वाद वगैरे वगैरे... किंबहुना आरक्षणाचे देखील राजकारण झाले. यात गरीब,कष्टकरी तसाच राहिला आणि उच्च समजला जाणारा माणूस सोन्याच्या,पैशाच्या जोरावर मिरवू लागला.
साहित्याला देखील लेबल लागलं.हे अमुक अमुक प्रकारचे साहित्य ही ओळख बनली.एकंदरीत तुम्हाला देखील एका चौकटीत बांधलं गेलं.डॉ.बाबासाहेब आंबेडकर = फक्त बौध्द धर्म हे समीकरण काळानुरूप समाजापुढे बिंबवलं गेलं .मग सुरू झाला संघर्ष यातून निर्माण झालं ते दैवतीकरण आणि विचारांची शून्यगत अवस्था! तुम्हाला देखील हे मान्य नसावं याची नक्कीच खात्री आहे.समाजाने तुम्हाला दैवतीकरणातून कधीच बाहेर काढलं नाही. जे तुम्ही सांगितलंत,शिकवण रूजण्यासाठी मेरेपर्यंत प्रयत्न केलेत.तेच उलट चित्र घडत गेलं आता देखील घडत आहे.पण लोकांनी विचारांचा प्रसार करण्याचा प्रयत्न देखील केला नाही.ज्यांनी विचारांचे बीज पेरले त्याचे झाडे वाढू दिलंच नाही.ते आंबेडकरवादी,ते बौद्ध,ते निळे झेंडेवाले,ते दलित, ते असलेच , ते तसलेच असं सारं काही अजूनही घडत आहे.कित्येक मंडळी याच जोरावर निवडणूक देखील निवडून आले.बघा हे असं सारं काही होतं आलं आहे.पण यात विचारांची जडणघडण आणि गुंफण फारच कमी आढळते. किती जणांनी संविधान वाचलं? किती जणांनी आरक्षण आणि धर्म समजून घेतला ? किती जणांना आंबेडकर समजले? याची गणती केली तर खूप कमी लोक समोर येतील.पण किती जणांनी निळ्या झेंड्यात गुंडाळून ठेवलं? किती जणांनी विशिष्ट लेबल लावून उल्लेख केला ? यांची संख्या नक्कीच जास्त आहे. अजूनही खूप जणांना संविधान दिवस माहिती नाही की तुमचा संघर्ष माहिती नाही. पण तुमचे दैवतीकरण मात्र नक्कीच माहिती असावं.१४ एप्रिल आणि ६ डिसेंबरला काय असतं हे देखील कित्येक जणांना माहिती नाही.ते त्याचं काही तरी असतं हेच लोक अजूनही उच्चारतात.हे तुम्हाला तरी पटतं का...
खरंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे फक्त एकाच धर्माशी आधारित नाहीत.तर ते साऱ्या जगाचे आहेत. भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांसाठी लढणारा माणूस होतात. समता, समानतेचा आणि शिक्षणाचे बीज पेरणारे समाजसुधारक होतात.असं बरंच काही असूनही माणूसकीने वागणारे उत्तम, हुशार, अभ्यासू माणूस होते. पण हे आता समाजाला नव्याने पटवून देण्याची गरज निर्माण झाली आहे. तुम्ही सारं काही देवून गेलात पण हात घेणारे कमी पडले की काय असं खूप जाणवतं. कित्येकदा वाटतं देणारे हात परत यावे आणि चांगले घेणारे हात वाढावेत. किमान विचार मंथन तरी व्हावं ही गरज आहे. खरंतर आजचा ही दिवस संपेल, काळ बदलेल, वर्षे सरतील पण 'डॉ.बाबासाहेब आंबेडकर' हे नाव कायम डोक्यात प्रकाश टाकत राहील. असंच रोज जगण्यातला आणि शिक्षणातला सुगंध दरवळत ठेवण्याची ताकद द्या. मोठ्या आदराने प्रेमाची मिठी ❤️????
तुमची,
प्रज्वली नाईक.
जयभीम ❤️