मी बुद्धाकडे कसा वळलो ? - बी. आर. आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखनावरील सेन्सॉरशीपची 61 वर्षे ?

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची मूळ प्रस्तावना का गाळली ?

मी बुद्धाकडे कसा वळलो ? - बी. आर. आंबेडकर

     "मला नेहमी विचारला जाणारा एक प्रश्न म्हणजे- मी इतके उच्चस्तरीय शिक्षण कसे काय घेतले? दुसरा प्रश्न म्हणजे- बुद्ध धम्माकडे माझा कल कसा काय झुकला ? हे प्रश्न मला विचारले जातात, कारण मी ज्या समाजात जन्मलो तो भारतात ‘अस्पृश्य’ मानला जातो. ही प्रस्तावना पहिल्या प्रश्नाचे उत्तर देण्याची जागा नव्हे. पण दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर देण्यास या प्रस्तावनेची जागा उपयोगी ठरू शकेल.

     या प्रश्नाचे थेट उत्तर असे की, बुद्धांचा धम्म हा सर्वोत्तम आहे असे मी मानतो. अन्य कुणाही धर्माशी त्याची तुलनाच होऊ शकणार नाही. विज्ञान जाणणाऱ्या आधुनिक माणसाला जर धर्म हवाच असेल, तर त्याला स्वीकारार्ह असा एकच धर्म म्हणजे बुद्धांचा धर्म. हा जो विश्वास मी व्यक्त करतो आहे, तो गेल्या पस्तीस वर्षांत सर्व धर्माचा बारकाईने अभ्यास केल्याने दृढ झालेला आहे.

     मी बुद्ध धम्माच्या अभ्यासाकडे कसा वळलो याची हकिगत आणखी निराळी. ती जाणून घेणे वाचकांना आवडेल असे वाटते. ती हकिगत येथे सांगतो.

How did I turn to Buddha - Bhimrao Ramji Ambedkar - 61 years of censorship on Dr Babasaheb Ambedkars writings     माझे वडील सैन्यात अधिकारी होते, तरी त्याचबरोबर ते एक धार्मिक गृहस्थ होते. त्यांनी मला करडय़ा शिस्तीत वाढविले. वय जरी कमी असले तरी तेव्हाही मला वडिलांच्या धार्मिक जीवनाचरणात काही अंतर्विरोध जाणवत असत. माझ्या वडिलांचे वडील हे जरी रामानंदी होते, तरी माझे वडील कबीरपंथी होते. त्यामुळे जरी त्यांचा विश्वास मूर्तिपूजेवर नसला, तरीही ते अर्थात आमच्यासाठी म्हणून गणपतीपूजन करीत असत, हे मला आवडत नसे. पंथाच्या ग्रंथांचे त्यांचे वाचन होतेच. असे असले तरीही मी आणि माझे थोरले बंधू यांनी आमच्या बहिणी तसेच जमलेल्या अन्य मंडळींना रामायण आणि महाभारतातील काही भाग दररोज रात्री निजण्यास जाण्यापूर्वी वाचून दाखविलाच पाहिजे, यासाठी वडील आम्हास भाग पाडत असत. हा क्रम अनेकानेक वर्षे सुरू राहिलेला होता.

     इंग्रजी चौथ्या इयत्तेची परीक्षा मी उत्तीर्ण झालो, त्या वर्षी माझ्या समाजातील लोकांना माझ्या अभिनंदनासाठी एक जाहीर सभा आयोजित करावी असे वाटत होते. अन्य समाजांतील तत्कालीन शैक्षणिक परिस्थितीच्या मानाने हा (इंग्रजी चौथी उत्तीर्ण) काही साजरा करावा असा प्रसंग नव्हता. पण एवढय़ा पातळीला पोहोचलेला आमच्या समाजातील मी पहिलाच मुलगा आहे, अशी या सभेच्या आयोजकांची भावना होती. त्यांना तेव्हा असे वाटत होते, की मी केवढी मोठी उंची गाठली आहे. ही मंडळी वडिलांकडे त्यांची संमती मागण्यासाठी गेली. असले काही केल्यास मुलगा शेफारेल म्हणून वडिलांनी परवानगी स्पष्टपणे नाकारली. परीक्षाच तर पास झाला, आणखी काय मोठे केले त्याने? (असे वडिलांचे म्हणणे.) हा प्रसंग साजरा करू इच्छिणाऱ्यांचा चांगलाच विरस झाला. परंतु त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत. माझ्या वडिलांचे वैयक्तिक मित्र दादा केळूसकर (कृष्णाजी अर्जुन केळूसकर) यांना भेटून या मंडळींनी दादांना मधे पडण्याची विनंती केली. दादांनी ती मान्यही केली. दादांशी भवती- न भवती झाल्यानंतर वडील बधले आणि ती सभा झाली. दादा केळूसकर अध्यक्ष होते. ते त्यांच्या काळातील साहित्यिक. त्यांचे भाषण झाल्यानंतर मला बक्षीस म्हणून त्यांनी बुद्धांच्या जीवनावर त्यांनी ‘बडोदे सयाजीराव प्राच्यविद्या माले’साठी (बरोडा सयाजीराव ओरिएण्टल सीरिज) लिहिलेल्या पुस्तकाची एक प्रत दिली. मी मोठय़ा कुतूहलाने ते पुस्तक वाचले आणि त्यामुळे हलून गेलो. फार प्रभावित झालो.

     बौद्ध वाङ्मयाशी आमचा परिचय वडिलांनीच का नाही करून दिला, असा प्रश्न मला पडू लागला. हा प्रश्न माझ्या वडिलांनाही विचारण्याचा निर्धार मी केला. एके दिवशी तो कृतीतही आणला. मी (त्यावेळी) माझ्या वडिलांना विचारले, की ब्राह्मण-क्षत्रियादी उच्च जातींचेच गोडवे गाऊन शूद्र-अस्पृश्यांच्या अधोगतीच्या कथाच वारंवार सांगणारे रामायण आणि महाभारतासारखे ग्रंथ वाचण्यावर ते का भर देतात? हा प्रश्न माझ्या वडिलांना आवडला नाही. ते एवढेच म्हणाले, ‘‘तू असले मूर्ख प्रश्न विचारूच नयेस. तुम्ही अद्याप मुलगे आहात (लहान आहात). तेव्हा सांगितले तेवढे तुम्ही ऐकले पाहिजे.’’ माझे वडील म्हणजे जणू रोमन पितृसत्ताधीश (पॅट्रिआर्क) होते. आणि पितृसत्तेच्या सर्वोच्च धाकाचा (पॅट्रिआ प्रोटेस्टास) अंमल आम्हा मुलांवर त्यांनी चालविला होता. मीच एकटा काय तो काहीशी मोकळीक घेऊन त्यांच्याशी बोलू लागलो होतो. आणि तोही एवढय़ाच कारणाने, की माझी आई माझ्या लहानपणीच दिवंगत झाल्याने आत्याच्या देखरेखीखाली मी वाढलो होतो. मग  काही काळाने मी त्यांना पुन्हा तोच प्रश्न विचारला. यावेळी नक्कीच माझ्या वडिलांनी मला उत्तर देण्याची तयारी केलेली होती. ते म्हणाले, ‘‘ मी तुम्हाला रामायण आणि महाभारत वाचण्यास का सांगतो याचे कारण (असे) आहे- आपण अस्पृश्यांमधील आहोत आणि म्हणून तुला त्याचा न्यूनगंड येईल, तो वाढू शकेल, हे स्वाभाविक आहे. रामायण आणि महाभारताचे महत्त्व (मूल्य) यात आहे की, ते ग्रंथ हा न्यूनगंड काढून टाकतात. द्रोण आणि कर्ण यांच्याकडे पाहा. ती लहान माणसे; पण कोठल्या उंचीला पोहोचली होती! वाल्मिकीकडे पाहा. तो मूळचा कोळी होता. पण तो रामायणाचा ग्रंथकर्ता झाला. अशा प्रकारे न्यूनगंड नष्ट करण्यासाठी मी तुम्हाला रामायण आणि महाभारत वाचावयास सांगतो.’’ माझ्या वडिलांच्या म्हणण्यात जोम आहे, हे मला दिसत होते. पण माझे समाधान नव्हते झाले. मी वडिलांना सांगितले की, मला महाभारतातील कोणतीच पात्रे आवडत नाहीत. मी म्हणालो, ‘‘मला भीष्म आणि द्रोणच काय, पण महाभारतातील कृष्णसुद्धा मनाला पटत नाही. भीष्म आणि द्रोण हे ढोंगी (ठरतात, कारण)- त्यांनी सांगितले एक आणि केले दुसरेच. कृष्णाचाही लबाडीवर विश्वास होता. त्याचे जीवनचरित्र लबाडय़ांनी भरलेले आहे. तितकीच अढी मला रामाबद्दलही आहे. शूर्पणखा प्रकरणात, वाली-सुग्रीव प्रकरणात  त्यांचे वर्तन पाहा. सीतेशीही ते अमानुष वागले.’’ ..यावर माझे वडील शांत राहिले आणि त्यांनी काही उत्तर दिले नाही. बंड झालेले आहे, याची कल्पना त्यांना आलेली होती.

     अशा प्रकारे मी दादा केळूसकरांनी दिलेल्या पुस्तकाच्या साह्याने बुद्धाकडे वळलो. लहान वयातच बुद्धाकडे वळलो तरी रित्या मनाने वळलो नव्हतो. मला काही पाश्र्वभूमी होती. आणि बुद्धांच्या कथा मला माहीत झाल्यानंतर त्यांची (या पाश्र्वभूमीशी) तुलना करणे, त्यातील विरोधाभास पाहणे हे मला अगदी शक्य होते. बुद्ध आणि त्यांचा धम्म यांत मी रस घेऊ लागण्याची सुरुवात ही अशी आहे.

     हे पुस्तक (द बुद्ध अँड हिज धम्म)  लिहिण्याची प्रबळ इच्छा का झाली, याची आरंभकथा निराळी आहे. कलकत्त्याच्या (तत्कालीन उच्चार) ‘महाबोधी सोसायटीज् जर्नल’च्या संपादकांनी १९५१ सालच्या त्यांच्या वैशाख अंकासाठी मला एक लेख लिहावयास सांगितले. या लेखात मी असे म्हटले होते की, विज्ञानजागृती झालेल्या समाजाने स्वीकारावा असा बुद्ध धम्म हा एकमेव धर्म असून, तसे न झाल्यास ऱ्हास होऊ शकतो. मी असेही म्हटले होते की, आधुनिक जगाने स्वतस वाचविण्यासाठी (शांति आणि उन्नतीसाठी) स्वीकारावा असा बुद्ध धम्म हा एकमेव धर्म आहे. (लेखात असेही म्हटले होते की,) बुद्ध धम्माची वाटचाल धीम्या गतीने होते याचे कारण असे की, या धर्माचे वाङ्मय इतके अधिक आहे की कुणाला ते संपूर्ण वाचणे अशक्य वाटावे. या धर्माला ख्रिस्तीधर्मीयांच्या ‘बायबल’सारखा एकच एक ग्रंथ नाही, ही यामागील (प्रसारामागील) मोठी अडचण ठरते आहे. या लेखानंतर मला अनेकांनी पत्राने वा तोंडी असे सांगितले की, असा एखादा ग्रंथ तुम्हीच लिहा. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून मी हे कार्य हाती घेतले.

     टीका होण्याआधीच (भात्यातील बाण काढून घेण्यासाठी) मी हे स्पष्ट करू इच्छितो की, या पुस्तकात मूळचे माझे असे काही नाही. हे संकलन आहे. असेम्ब्ली प्लांट म्हणा. अनेक परींच्या ग्रंथांमधून या पुस्तकासाठी साधने जमविली आहेत. अश्वघोषाच्या ‘बुद्धचरित’ ग्रंथाचा मी विशेष उल्लेख करू इच्छितो. यातील काव्य हे निर्विवाद उत्कृष्ट आहे. काही प्रसंगांच्या वर्णनासाठी तर मी त्यातील भाषेची  (इंग्रजीमध्ये) उसनवारी केली आहे.

     माझे मूळ काम जर या पुस्तकात काही असेल तर ते एवढेच की, मी मुद्दय़ांची क्रमवार, संगतवार मांडणी केली आहे आणि त्यात सुलभता व स्पष्टता यावी याकडे पाहिले आहे. बुद्ध धम्माच्या अभ्यासकांना काही बाबी डोकेदुखीसारख्या वाटतील, त्यांबद्दल मी पुस्तकाच्या विषयप्रवेशात (इंट्रोडक्शन) लिहिलेले आहे.

     मला या कामी मदत करणाऱ्यांचे आभार व्यक्त करणे आता उरले आहे. साकरुली गावचे श्री. नानकचंद रत्तू आणि नांगल खुर्द- जिल्हा होशियारपूर, पंजाब येथील राहणारे प्रकाश चंद यांनी माझे हस्तलिखित ‘टाइप’ करून दिले, याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. विशेषत:  नानकचंद रत्तू यांनी प्रसंगी स्वतच्या ढासळत्या प्रकृतीचीही काळजी न करता, तसेच आर्थिक अपेक्षा न ठेवता, केवळ माझ्यावरील प्रेमापोटी हे काम केले. त्यांच्या श्रमाचे मोल करता येणार नाही.

     मी या पुस्तकाची जुळवाजुळव सुरू केली तेव्हापासून आजारी असून आताही आजारीच आहे. या गेल्या पाच वर्षांच्या काळात माझ्या प्रकृतीत बरेच चढउतार झाले. काही वेळा तर माझी परिस्थिती अशी होती की डॉक्टर माझ्याशी जणू मालवत्या ज्योतीशी बोलावे तसे बोलत. या मालवत्या ज्योतीला पुनप्र्रकाशित करण्याचे कार्य माझी पत्नी तसेच माझ्यावर उपचार करणारे डॉ. मालवणकर यांच्या वैद्यकीय कौशल्यामुळे होऊ शकले. मी त्यांचा सर्वथैव आभारी आहे. त्यांनीच मला हे कार्य तडीस नेण्यात मदत केली आहे. संपूर्ण पुस्तकाच्या मुद्रितशोधनात विशेष रस घेणारे श्री. एम. बी. चिटणीस यांचेही आभार.

     मी हेही सांगू इच्छितो की, हे पुस्तक तीन पुस्तकांपैकी एक असून त्या तीन पुस्तकांमुळे बुद्ध धम्माच्या योग्य आकलनास मदत होईल. अन्य दोन पुस्तके (१) ‘बुद्ध व कार्ल मार्क्‍स’ आणि (२) ‘प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती’ अशी आहेत. त्यांपैकी काही भाग लिहून झाले असून, तीही लवकरच प्रकाशित होतील."

– बी. आर. आंबेडकर

‘द बुद्ध अ‍ॅण्ड हिज धम्म’ हा डॉ. आंबेडकरांनी लिहिलेला अखेरचा ग्रंथ. त्यास 61 वर्षे होत आहेत. सरकारने पुनर्प्रकाशित केलेल्या डॉ. आंबेडकरांच्या समग्र खंडांमध्येही त्याचा अंतर्भाव आहे. डॉ. आंबेडकरांनी या ग्रंथास लिहिलेली प्रस्तावना या ग्रंथात समाविष्ट केलेली नाही. डॉ. आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ती प्रसिद्ध करीत आहोत..

{ ही प्रस्तावना नागपुरच्या समता सैनिक दलाने 1993 मध्ये प्रकाशित केलेल्या मराठी अनुवादात [ अनुवादक-प्रा.देवीदास घोडेस्वार ] छापलेली आहे- प्रा.हरी नरके }

उपोद्घाताची कथा..

     ‘द बुद्ध अ‍ॅण्ड हिज धम्म’ हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अखेरचा इंग्रजी ग्रंथ त्यांचे महापरिनिर्वाण झाल्यानंतर डॉ. आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सिद्धार्थ महाविद्यालयाने १९५७ साली प्रकाशित केला. त्यात ‘उपोद्घात’ म्हणून डॉ. आंबेडकरांनी लिहिलेला मजकूर पहिल्या आवृत्तीत छापला नव्हता.

     १९९२ साली महाराष्ट्र शासनाने आंबेडकर वाङ्मयाचा ११ वा खंड म्हणून हा ग्रंथ पुनर्मुद्रित केला. त्यातही डॉ. आंबेडकरांच्या हातचा उपोद्घात समाविष्ट केलेला नाही. पण भगवानदास यांनी सप्टेंबर १९८० मध्ये प्रकाशित केलेल्या ‘रेअर प्रीफेसेस’ या इंग्रजी पुस्तिकेत १५ मार्च १९५६ या तारखेस डॉ. आंबेडकरांनी तयार केलेला उपोद्घात छापलेला आढळतो. उपोद्घाताच्या या पहिल्या मसुद्यात डॉ. आंबेडकरांनी ५ एप्रिल १९५६ रोजी काही दुरूस्त्या केल्या. ५ डिसेंबर १९५६ च्या रात्री- म्हणजे मृत्यूपूर्वी काही तास आधी डॉ. आंबेडकरांनी काही किरकोळ दुरूस्त्या करून मसुद्यास अंतिम रूप दिले. डॉ. आंबेडकरांच्या पत्नी डॉ. सविता आंबेडकर यांनी आत्मकथेत हा उपोद्घात छापलेला आहे. (‘डॉ. आंबेडकरांच्या सहवासात’- सविता आंबेडकर- १९९०.. पृ. २७९-२८३)

     ६ डिसेंबर १९५६ रोजी डॉ. आंबेडकरांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी भदंत आनंद कौसल्यायन दिल्लीतील डॉ. आंबेडकरांच्या निवासस्थानी गेले तेव्हा मेजावर ‘द बुद्ध अ‍ॅण्ड हिज धम्म’ या ग्रंथाचा डॉ. आंबेडकरांनी दुरूस्त केलेला उपोद्घात (भूमिका) त्यांना आढळला. (‘बोधि-द्रुम के कुछ पन्ने’- भदंत आनंद कौसल्यायन.. १९८६, पृ. ४८)

     डॉ. आंबेडकरांनी हस्ताक्षरात दुरूस्त केलेला मूळ इंग्रजी उपोद्घात उपलब्ध असतानाही डॉ. आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सूत्रधारांनी तो पहिल्या आवृत्तीत आणि नंतरच्या आवृत्त्यांत, तसेच हिंदी व मराठी अनुवादातही छापला नाही.

     डॉ. आंबेडकरांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी डॉ. सविता ऊर्फ माईसाहेब आणि डॉ. आंबेडकरांचे एकुलते एक पुत्र यशवंत ऊर्फ भय्यासाहेब यांच्यामधील गृहकलह वाढीस लागला. डॉ. आंबेडकरांच्या हयातीतच त्यांचा पुत्र आणि त्याची सावत्र आई यांच्यामध्ये तेढ निर्माण झाली होती. ‘डॉ. आंबेडकरांचे आकस्मिक निधन झाले ते त्यांच्यावर विषप्रयोग केला गेल्यामुळे..’ असे आरोप केले जाऊ लागले. हा आरोप म्हणजे डॉ. आंबेडकरांच्या भक्तगणांपैकी एका गटाने पद्धतशीररीत्या डॉ. सविता (माईसाहेब) आंबेडकरांविरुद्ध चालवलेल्या मोहिमेचा भाग होता. डॉ. आंबेडकरांचा मृत्यू नैसर्गिक होता किंवा नाही, याविषयी संसदेतही प्रश्न विचारण्यात आल्यामुळे भारत सरकारने या प्रकरणाची चौकशी केली. डॉ. आंबेडकरांचा मृत्यू विषप्रयोगामुळे किंवा कटकारस्थानामुळे झाला नसून तो नैसर्गिक होता, असा या चौकशी अहवालाचा निष्कर्ष होता.

     ही पाश्र्वभूमी लक्षात घेतली तर डॉ. आंबेडकरांनी इंग्रजीत लिहिलेला उपोद्घात ‘द बुद्ध अ‍ॅण्ड हिज धम्म’ या ग्रंथात समाविष्ट करण्याऐवजी संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष न्या. आर. आर. भोळे यांनी पहिल्या आवृत्तीच्या प्रस्तावनेत त्यातील एक-दोन परिच्छेदांचा आधार घेऊन बाकी महत्त्वाचा मजकूर का गाळला असावा, याचे काहीसे स्पष्टीकरण देता येते.

     मूळ इंग्रजी उपोद्घातामध्ये ऋणनिर्देश करताना डॉ. आंबेडकरांनी लिहिले होते, ‘या ग्रंथाच्या लेखनाचे काम सुरू केले तेव्हा मी आजारी होतो आणि आजही आजारीच आहे. गेल्या पाच वर्षांत माझ्या प्रकृतीत बरेच चढउतार झालेले आहेत. काही वेळा माझी प्रकृती इतकी चिंताजनक झाली होती, की ‘मालवती प्राणज्योत’ अशा शब्दांत माझ्याबद्दल डॉक्टर बोलत असत. ही मालवती प्राणज्योत आजतागायत तेवत राहिली ती माझी पत्नी व डॉ. मालवणकर यांच्या कौशल्यामुळे. डॉ. मालवणकर माझ्यावर वैद्यकीय उपचार करीत असतात. माझी पत्नी व डॉ. मालवणकर या दोघांचाही मी अत्यंत ऋणी आहे. त्यांनीच मला ग्रंथलेखनाचे काम पूर्ण करण्यास मदत केली.’

     डॉ. सविता ऊर्फ माईसाहेब आंबेडकर यांच्या आठवणींनुसार, ५ डिसेंबर १९५६ च्या रात्री- म्हणजे निधन झाले त्याआधी काही तासच अगोदर डॉ. आंबेडकरांनी टंकलिखित उपोद्घातात भर घातली होती.. तीही त्यांच्या हस्ताक्षरात. गृहकलह लक्षात घेता डॉ. आंबेडकरांनी लिहिलेला उपोद्घात १९५७ सालच्या पहिल्या आवृत्तीत समाविष्ट केला गेला असता तरच ते नवल ठरले असते. मात्र, चौकशी अहवालाचे निष्कर्ष जाहीर झाल्यावरही तो उपोद्घात नंतरच्या आवृत्त्यांत, तसेच अनुवादात छापला गेला नाही हे गैरच झाले असे अभ्यासकांना वाटते.

- पद्माकर कांबळे

Satyashodhak, dr Babasaheb Ambedkar, Bahujan, Gautama Buddha, Buddhism
Share on Twitter
Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209