जीव घेण्यासाठी आलेले मारेकरीच जेव्हा महात्मा ज्योतिबा फुले यांचे अंगरक्षक बनतात

     महात्मा जोतीराव फुले यांना 'महात्मा' का म्हटलं जायचं? ज्याप्रमाणे गौतम बुद्धांनी डाकू अंगुलीमालाचे हृदयपरिवर्तन करून त्याला बौद्ध भिक्खू बनवले त्याच प्रमाणे महात्मा फुले यांची हत्या करण्यासाठी आलेल्या दोन जणांनी महात्मा फुलेंना सामाजिक कार्यात साथ दिली. त्या दोघांपैकी एक जण महात्मा फुलेंचा अंगरक्षक बनला तर दुसरे गृहस्थ सत्यशोधक समाजाचे पंडित बनले आणि त्यांनी ग्रंथरचना देखील केली.

      महात्मा फुलेंनी महिला आणि वंचित, शोषित शेतकरी वर्गाच्या उत्थानासाठी आपले आयुष्य वेचले. हे करत असताना त्यांना आणि त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पुराणमतवादी लोकांचे बोलणे, टोमणे आणि प्रसंगी शिव्या खाव्या लागल्या. काही लोकांनी त्यांच्यावर शेण देखील फेकले पण हे दाम्पत्य आपल्या जीवितकार्यापासून ढळले नाही. जेव्हा आपल्या विरोधाचा काहीच परिणाम या दोघांवर होत नाही असे पाहून काही लोकांनी फुले यांना जीवे मारण्यासाठी दोन मारेकरी पाठवले होते.

जोतिबा फुले 'महात्मा' कसे बनले ?

खंडोबाची 'तळी' उचलणारा महात्मा फुलेंचा 'सत्यशोधक समाज' नेमका काय आहे ?

     दिवसभराचे काम आटोपून मध्यरात्री फुले आराम करत होते. त्याचवेळी त्यांना घरात असलेल्या खुडबुडीने जाग आली. घरात समईचा मंद प्रकाश होता त्यात त्यांना दोन अंधुक आकृत्या दिसल्या आणि त्यांनी मोठ्याने विचारले कोण आहे रे तिकडे. असे विचारताच त्या मारेकऱ्यांपैकी एकाने म्हटले 'तुमचा निकाल करावयास आम्ही आलो आहोत' तर दुसरा मारेकरी ओरडला 'तुम्हांस यमसदनास पाठवण्यासाठी आम्हांस धाडले आहे.'

     हे ऐकताच महात्मा फुलेंनी त्यांना विचारले, "मी तुमचा काय अपराध केला आहे, ज्यामुळे तुम्ही मला मारत आहात?" त्यावर ते दोघे उत्तरले की, तुम्ही आमचे काही वाईट केले नाही पण तुमचा निकाल लावण्यासाठी आम्हाला पाठवले आहे. महात्मा फुलेंनी त्यांना म्हटले, की मला मारून तुमचा काय फायदा? यावर ते म्हणाले, "तुम्हाला मारल्यास आम्हाला प्रत्येकी हजार रुपये मिळणार आहेत."

     हे ऐकताच महात्मा फुले म्हणाले, "अरे, वा! माझ्या मृत्यूने तुमचा फायदा होणार आहे, तर घ्या माझे डोके. ज्या गरीब जनतेची सेवा करण्यात मी सद्भाग्य आणि धन्यता मानली, त्यांनीच माझ्या गळ्यावरुन सुरी फिरवावी हे माझे सद्भाग्य होय. चला आटपा. माझे आयुष्य दलितांकरिताच आहे. कसे झाले तरी माझ्या मरणानेसुद्धा गरिबांचेच हित होत आहे."

satyashodhak Mahatma Jyotiba Phule     त्यांचे हे उद्गार ऐकून मारेकरी भानावर आले आणि त्यांनी महात्मा फुलेंची माफी मागितली. उलट ज्या लोकांनी मारण्यासाठी पाठवले आहे त्यांना मारण्याची आम्हाला परवानगी द्या, असं ते म्हणाले.यावर महात्मा फुलेंनी त्यांना समजावून सांगितले आणि सूडबुद्धी नसावी अशीच समज दिली. या प्रसंगानंतर हे दोघे महात्मा फुलेंचे सहकारी बनले. यातील एकाचे नाव होते रोडे तर दुसरे होते पं. धोंडिराम नामदेव.धनंजय कीर यांनी लिहिलेल्या महात्मा फुले यांच्या चरित्रात ही गोष्ट आपल्याला वाचायला मिळते.ही गोष्ट वाचल्यावर सहजच मनात विचार येतो की केवळ चार पाच वाक्य बोलून एखाद्या व्यक्तीच्या जीवावर प्रसंग आला असेल तर तो दूर कसा जाऊ शकतो. पण फुलेंचे पूर्ण चरित्र वाचल्यावर असे लक्षात येते, की ही चार-पाच वाक्य त्यांच्या जीवनाचे सार आहे. त्यांनी ती वाक्ये केवळ बोलली नाही तर त्यातला शब्द न् शब्द ते जगले आहेत. त्यांनी केवळ शोषितांसाठी आयुष्यच वेचले नाही तर त्यांचे विचार आजही तंतोतत लागू होतात आणि समाजाला दिशा देणारे आहेत.महात्मा फुलेंचे निधन होऊन 132 वर्षं झाली आहेत पण त्यांच्या विचारातला ताजेपणा, टवटवीतपणा अद्यापही कायम आहे. महात्मा फुले हे मानवतावादी विचारवंत तर होतेच पण त्याचबरोबर ते एक द्रष्टे कृषी तज्ज्ञ होते. त्यांच्या विचारांची कास धरून आपण पावले उचलली तर देशातल्या कृषी समस्यांची कोंडी सुटू शकते असा विश्वास तज्ज्ञ व्यक्त करतात. महात्मा फुले आणि त्यांचे शेतीविषयक विचार पाहण्याआधी आपण त्यांचे कार्य आणि त्याची पार्श्वभूमी समजून घेऊ.

     शिक्षणाचे महत्त्व ओळखणारे समाजसुधारक

     विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली

     गतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेले

     वित्ताविना शुद्र खचले,

     एवढे सारे अनर्थ एका अविद्येने केले

     महात्मा फुलेंनी शिक्षणाचे महत्त्व वेळीच ओळखले होते. आपल्या आजूबाजूला असलेला बहुजन समाज आणि स्त्रिया हे शिक्षणाच्या अभावामुळेच गुलामगिरीमध्ये खितपत पडले आहेत ही असं त्यांना वाटत असे.

     विद्या नसल्यामुळे दुर्धर प्रसंगाची मालिका बहुजन समाजावर कशी ओढवली आहे हे वरील ओळतून त्यांनी सुचवले आहे. या अनर्थाच्या मुळाशी अविद्या आहे असे निदान त्यांनी केले होते.महात्मा फुलेंचे शिक्षण आधी मराठी शाळेत झाले आणि नंतर ते मिशनऱ्यांच्या शाळेत झाले. त्यांच्या वडिलांचा म्हणजेच गोविंदरावांचा फुलांचा व्यवसाय होता. त्या काळी ब्राह्मणेतरांना शिक्षण घेतलेले काही सनातनी ब्राह्मणांना खुपत असे. त्यांनी जोतिबा फुलेंच्या वडिलांचे कान भरले आणि सांगितले जर आता तुमच्या मुलाने शिक्षण घेतले तर त्याचे मन शेती आणि बागकाम करण्यात लागणार नाही. तो उद्धट होईल.

     त्यामुळे त्यांच्या वडिलांनी त्यांना शिक्षण थांबवण्यास सांगितले. पण तोपर्यंत जोतिबा फुले यांना इंग्रजी येऊ लागले होते. त्यांनी विविध वैचारिक ग्रंथांचे आणि राज्यक्रांत्यांचा अभ्यास केला होता. थॉमस पेनचे राइट्स ऑफ मॅन हे पुस्तक त्यांच्या वाचनात आले. त्यामुळे मानवाचे काही मूलभूत हक्क आहेत आणि ते मिळवणे हा आपला अधिकार आहे अशी जाणीव त्यांच्या मनात घर करू लागली होती. त्यांच्या मनात असलेल्या जाणीवेला ध्येयाचं स्वरूप मिळवून देणारा एक प्रसंग त्यांच्या आयुष्यात आला. एकदा त्यांना एका ब्राह्मण स्नेह्याच्या लग्नाचे निमंत्रण आले होते. ते मिरवणुकीतून चालत असता सनातनी ब्राह्मणांनी त्यांना ओळखले आणि त्यांच्या अंगावर खेकसले. त्यातला एक जण त्यांना म्हणाला, "तू जातिपातीची सगळी बंधने आणि रीतिरिवाज धुडकावून आमचा असा अपमान करतोस काय? तू आमच्या बरोबरीचा आहेस असं समजतोस की काय? अंस वागण्यापूर्वी तू शंभरवेळा विचार करावयास पाहिजे होतास. चल हट मागं अन् चालू लाग सर्वांच्या मागून."

     या बोलण्याचा 21 वर्षीय जोतिबांवर गंभीर परिणाम झाला. आपल्याला प्राण्यापेक्षा हीन वागणूक का मिळत आहे याचा त्यांना विचार केला. आपल्या हाती असलेली साधन संपत्ती, आपण ज्या समाजातून आलो आहोत त्या समाजाची पार्श्वभूमी या सर्व गोष्टींचा त्यांनी विचार केला आणि एक गोष्ट त्यांच्या ध्यानात आली ती म्हणजे शिक्षणाच्या अभावामुळे या दोन्ही वर्गात हे भेद निर्माण झाले आहेत.

     शिक्षण नसल्यामुळे शेकडो वर्षांच्या गुलामगिरीत अडकावे लागले आहे. शिक्षण केवळ एकाच वर्गापुरते मर्यादित आहे. इतरांना तर ते धर्मग्रंथ पाहायचा देखील अधिकार नाही. जर आपण शिक्षणाची दारं सर्वांसाठी खुली केली तर निश्चितच गुलामगिरीची बंधने झुगारून देता येतील असा विचार त्यांच्या मनात आला आणि त्यांनी समाजातील शोषितांसाठी कार्य करण्याचा निर्धार केला.

     पूर्ण विचारांती महिला शिक्षणाचे कार्य हाती घेण्याचा संकल्प त्यांनी केला. महिलांच्या शिक्षणाचे कार्य आपण का हाती घेतले याविषयी महात्मा फुलेंनी काय सांगितले याची एक नोंद आहे. त्यात ते म्हणतात, "स्त्रियांच्या शाळेने प्रथम माझे लक्ष वेधले. पूर्ण विचारांती माझे असे मत झाले की, पुरुषांच्या शाळेपेक्षा स्त्रियांच्या शाळेची अधिक आवश्यकता आहे. स्त्रिया आपल्या मुलांना त्यांच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षांत जे वळण लावतात त्यातच त्यांच्या शिक्षणाची बीजे असतात."हा विचार समोर ठेऊनच महात्मा फुलेंनी 1848 मध्ये आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन पुण्यात भिडेवाड्यात मुलींची शाळा सुरू केली. पुणे हा सनातनी लोकांचा बालेकिल्ला होता. मुलींसाठी शाळा काढली आणि त्यातही बहुजन वर्गातील मुली या ठिकाणी येत आहेत यामुळे सनातनी लोकांच्या अंगाचा तिळपापड झाला.

     ही शाळा बंद करावी म्हणून त्यांना धमक्या येऊ लागल्या. त्यांच्या धमक्यांना जोतिबा भीक घालत नाहीत असे दिसल्यावर हे लोक जोतिबांच्या वडिलांकडे गेले. त्यांना सांगितले की जर तुम्ही ही गोष्ट थांबवण्यास सांगितली नाही तर आम्ही तुम्हाला वाळीत टाकू. जोतिबांच्या वडिलांनी त्यांना सांगितले एक तर घर सोड किंवा शाळा बंद कर. जोतिबांनी सांगितले की मी शाळा तर बंद करू शकत नाही, शेवटी त्यांना नाइलाजाने सावित्रीबाई यांच्यासोबत घर सोडावे लागले.

     आर्थिक अडचणींमुळे त्यांची ही शाळा बंद पडली पण त्यांनी 1851मध्ये चिपळूणकर वाड्यात पुन्हा मुलींची शाळा सुरू केली. सुरुवातीला या शाळेत 8 मुली होत्या आणि थोड्याच दिवसात त्यांची संख्या 48 झाली.

विधवा मातांसाठी बालहत्याप्रतिबंधक गृहाची स्थापना

     1856 मध्ये भारतात विधवा पुनर्विवाहाचा कायदा संमत झाला होता पण तरीदेखील विधवांनी पुनर्विवाह करणे बहुतांश समाजाला अमान्य होते. अत्यंत कमी वयातील मुलींचे विवाह वयाने अधिक असलेल्या गृहस्थाशी लावून दिले जात असत. त्यांचं निधन झालं की त्या मुलींवर वयात येण्यापूर्वीच विधवा होण्याची वेळ येत असे.

     कधी कुणी अशा मुलींच्या असहायतेचा फायदा घेत असे किंवा त्या मुलीमध्ये नैसर्गिकरीत्या शरीर संबंधांची इच्छा उत्पन्न होऊन ती मुलगी गरोदर होत असे. गरोदर झाल्यावर त्या मुलीसमोर आत्महत्या करण्याशिवाय किंवा ते भ्रूण पाडण्याशिवाय दुसरा पर्याय नसे. अशा मुलींसाठी फुले दांपत्याने 1863 मध्ये बालहत्याप्रतिबंधक गृहाची स्थापना केली होती. या ठिकाणी महिलांनी गुप्तपणे येऊन त्यांच्या प्रसुतीची सोय करण्यात आली होती. त्या मुलांचा सांभाळ करण्याची त्या महिलेची इच्छा असेल तर तसे देखील करता येत असे अन्यथा त्या मुलाचे संगोपन फुले दांपत्य करत असे. या बालहत्या प्रतिबंधकगृहासंबंधीची पत्रकं पुण्यात जागोजागी लावण्यात आली होती. 'विधवांनो, इथे येऊन गुप्तपणे आणि सुरक्षितपणे बाळंत व्हा. तुम्ही आपले मूल न्यावे किंवा इथे ठेवावे हे तुमच्या खुषीवर अवलंबून राहील. त्या मुलांची काळजी हा अनाथाश्रम घेईल.'

आपला हौद अस्पृश्यांसाठी खुला

1868 साली त्यांनी आपला घराचा हौद अस्पृश्यांसाठी खुला केला. पुण्यात पेशव्यांनी जागोजागी हौद बांधले होते, पण या हौदातून अस्पृश्यांना पाणी घेण्याची परवानगी नसे. उन्हाळ्यात सुद्धा पिण्याचे पाणी आणण्यासाठी अस्पृश्यांना पायपीट करावी लागत असे. ही गोष्ट फुलेंच्या मनाला पटली नाही आणि त्यांनी आपल्या घरातील हौद त्यांच्यासाठी खुला केला. याची तीव्र प्रतिक्रिया उमटून महात्मा फुलेंच्या विरोधाची लाटच उसळली. एव्हाना फुले यांना सनातन्यांच्या रोषाची सवय झाली होती. पण यावेळी त्यांनी फुलेंच्या नातेवाईकांना आणि जातीतील लोकांनाच वाळीत टाकण्याची धमकी दिली होती.

'गुलामगिरी'चे लेखन आणि सत्यशोधक समाज

     पुरोहित वर्गाच्या धमक्यांना जोतिबा भ्यालेच नाहीत, उलट पुराणमतवादी लोकांचा समाजावर का पगडा आहे याचे विश्लेषण करणारा एक ग्रंथ लिहिला. या पुस्तकाचे नाव 'गुलामगिरी'. या पुस्तकाचा उल्लेख डॉ. सदानंद मोरे यांनी 'मॅग्नम ओपस' म्हणजेच 'महाकृती' असा केला आहे.

     धार्मिक गुलामगिरीच्या बेड्या तोडून सर्व समाज जात-पात मुक्त होईल अशी आशा महात्मा फुलेंना होती. 'गुलामगिरी'च्या सुरुवातीला जी अर्पणपत्रिका आहे ती त्यानुसार हा ग्रंथ अमेरिकेच्या लोकांना अर्पण केला आहे. अमेरिकेतील कृष्णवर्णियांची दास्यत्यवातून सुटका केल्याबद्दल त्यांनी हा ग्रंथ अमेरिकन लोकांना अर्पण केला आहे.गुलामगिरी ही अर्पणपत्रिका अशी आहे, 'युनैटेड स्टेट्स मधील सदाचारी लोकांनी गुलामांस दास्यत्वापासून मुक्त करण्याच्या कामांत औदार्य, निरपेक्षता, व परोपकार बुद्धी दाखवली यास्तव त्यांच्या सन्मानार्थ हे लहानसे पुस्तक- त्यांस परम प्रीतिने नजर करितो, आणि माझे देश बांधव त्यांचा त्या स्तुत्य कृत्याचा कित्ता, आपले शूद्रबांधवास ब्राह्मणलोकांच्या दास्यत्वापासून मुक्त करण्याच्या कामांत घेतील अशी आशा बाळगतो.'

     या अर्पणपत्रिकेबाबत डॉ. सदानंद मोरे त्यांच्या 'विद्रोहाचे व्याकरण' या पुस्तकात म्हणतात, "जोतीरावांच्या मनात अमेरिकेतील समतायोद्धांविषयी अपार आदर असल्यानेच त्यांनी आपली कृती त्यांना अर्पण केली. पण मुद्दा हिंदुस्थानातील गुलामीचा होता. जोतीरावांनी लावलेल्या इतिहासाच्या सरणीप्रमाणे येथील शूद्रातिशूद्र समाजाला आर्यांनी म्हणजेच ब्राह्मणांनी गुलाम केले होते. जोतीरावांची अशी अपेक्षा आहे की या ब्राह्मणांनी अमेरिकेतील गोऱ्यांचे अनुकरण करून शूद्रांतिशूद्रांची गुलामगिरी संपुष्टात आणावी.
'गुलामगिरी' निमित्त करण्यात आलेल्या विचारमंथनाचेच पुढचे पाऊल म्हणजे सत्यशोधक समाज आहे असे देखील म्हटले जाते.

     डॉ. मोरे म्हणतात, "गुलामगिरीमधील सैद्धान्तिक विविचेनास अनुसरून प्रत्यक्ष कृती करण्यास जोतीरावांनी उशीर केला नाही 24 सप्टेंबर 1873 या दिवशी सत्यशोधक समाजाची स्थापना झाली."

     बहुजन समाजाला जात-पात आणि धार्मिक रूढी परंपरातून मुक्त करण्यासाठी या समाजाची स्थापना करण्यात आली होती. बुद्धीप्रामाण्यवाद, विवेक आणि सत्य हे या संघटनेचे मुख्य आधारस्तंभ होते.

     ईश्वर आणि भक्तामध्ये मध्यस्थाचे काही काम नाही. असे म्हणत त्यांनी पुरोहिताचे महत्त्व नाकारले. भिक्षुक वर्ग शेतकऱ्यांकडून दक्षिणा लाटतो आणि त्या वर्गाला मानसिक दास्यतेत ठेवतो याविरुद्ध जोतिबांनी सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून आवाज उठवला होता.

     जुने पारंपरिक विधी नाकारल्यानंतर सत्यशोधक समाजाने लग्न, वास्तुशांती, अंत्यविधीसाठी पर्यायी विधी सांगितले होते. सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते ते विधी पार पाडत असत यासाठी ते कुठलीही दक्षिणा आकारत नसत.
महात्मा फुले आणि सध्याचा शेतकरी

     महात्मा फुलेंनी 1883 मध्ये शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ लिहिला आहे. शेतकऱ्यांची स्थिती नोकरशाही, सावकारी, बाजाराची व्यवस्था, जातिव्यवस्था, नैसर्गिक संकटे यामुळे कशी विदारक झाली आहे हे सांगितले आहे. महात्मा फुलेंनी शेतकऱ्यांचा आसूडमध्ये शेतकऱ्यांबाबत ज्या समस्या मांडल्या आहेत त्या आज देखील काही प्रमाणात आढळून येतात. महात्मा फुलेंनी सांगितलेल्या उपाययोजना अंमलात आणल्यास शेतकऱ्यांची स्थिती बदलू शकते, असे शिवाजी विद्यापीठाचे निवृत्त प्राध्यापक डॉ. अशोक चौसाळकर यांना वाटतं. चौसाळकर यांनी 'महात्मा फुले आणि शेतकरी चळवळ' हे पुस्तक लिहिले आहे.

     बीबीसी मराठीला चौसाळकर यांनी सांगितले, "किफायतशीर शेती होणे ही तेव्हाची देखील गरज होती आणि आताची देखील गरज आहे. शेती किफायतशीर करण्यासाठी त्याला जोडधंद्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर पाण्याचे नियोजन होणे अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक शेतकऱ्याला तोटी द्या म्हणजेच पाण्याचे योग्य वितरण करा असं महात्मा फुले सांगत.

     "सावकारशाही, सरकारी खात्यातील भ्रष्टाचार आणि एकूणच शेतकऱ्यांना नागवणं हे त्याकाळी होतं आणि आता देखील आहे.

     महात्मा फुलेंना कौशल्यविकसनाचे महत्त्व पटले होते याविषयी चौसाळकस सांगतात, "महात्मा फुलेंनी सांगितले होते की शेतकऱ्यांच्या मुलांनी सुतारकाम आणि लोहारकाम शिकले पाहिजे. त्यासाठी त्यांनी विलायतेला देखील जाऊन तिथून काम शिकून आले पाहिजे असे फुले सांगत. याबाबत चौसाळकर सांगतात की, शेती काळानुरुप बदलावी, शेतकऱ्यांच्या मुलांना कौशल्ये विकसित करून आपले हक्क बजावले पाहिजे, असे फुले सांगत,"

शेतकऱ्यांना पहिल्यांदा तत्त्वज्ञान उपलब्ध करून दिले

     महात्मा फुले आज कसे प्रासंगिक आहेत याबाबत किसान पुत्र आंदोलनाचे डॉ. अमर हबीब सांगतात की, "महात्मा फुलेंचं सर्वांत मोठं योगदान हे आहे की त्यांनी शेतकऱ्यांना पहिल्यांदा तत्त्वज्ञान उपलब्ध करून दिले. शेतकऱ्यांचा आसूड त्यांनी लिहिलं आणि पहिल्यांदा असा लिखित स्वरूपातील दस्तावेज शेतकऱ्यांना मिळाला, ज्यात त्यांचं दुःख व्यक्त झालं आहे."

     महात्मा फुलेंची मध्यवर्ती संकल्पना ही सृजक होती असं हबीब यांना वाटतं. ते सांगतात, "महात्मा फुलेंची मध्यवर्ती संकल्पना ही सृजक होती. त्यामुळे शेतकरी आणि महिला याबाबत ते सतर्क होते. शेतकरी आणि स्त्री यांना केंद्रबिंदू मानणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी त्यांनी शोधून काढली आणि त्यांच्यावर पोवाडा लिहिला. जो सृजक आहे त्याच्या समस्या सोडवाव्यात अशी त्यांची भूमिका होती."

वरवरच्या सुधारणा नकोत समस्यांचे मुळापासून निराकरण करावे

     ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक आसाराम लोमटे सांगतात की महात्मा फुलेंनी 'शेतकऱ्यांच्या आसूड' या पुस्तकात शेतकऱ्याच्या विदारक परिस्थितीचे वर्णन केले आहे. महात्मा फुले केवळ प्रश्न मांडून थांबले नाहीत तर त्यांनी उपाय देखील सुचवल्याचं लोमटे सांगतात.

     "महात्मा फुले केवळ शेतकऱ्यांची दु:स्थिती सांगून थांबत नाहीत तर त्यावर ' शेतकऱ्यांचा आसूड'च्या शेवटच्या प्रकरणात उपायही सुचवतात. शेती सुधारणेचा एक मूलभूत कार्यक्रमच जोतीरावांनी दिलेला आहे." लोमटे पुढे सांगतात, "डोंगरदऱ्यात तलाव तळी बांधणे, प्रयोगशील शेतकऱ्यांना बक्षिसे देणे, शेतकऱ्यांच्या मुलांमध्ये उद्यमशीलता वाढीला लावण्यासाठी विविध व्यवसायांचे प्रशिक्षण देणे, शेतातील पाणी बाहेर जाणार नाही यासाठी बांध तयार करणे, डोंगर टेकड्यांमध्ये तलाव तळी निर्माण करणे, सर्व नदी- नाल्यांमध्ये साचलेला गाळ शेतकऱ्यांना मोफत देणे, अन्य देशातील उत्तम प्रकारचे शेळ्या-मेंढ्यांचे वाण आपल्याकडे आणून त्यांची पैदास वाढवणे, जलसंधारणाची कामे हाती घेणे, पाणलोट क्षेत्रांचा विकास करणे असे अनेक उपाय महात्मा फुले यांनी सांगितले आहेत. शेतकऱ्यांवर नाहक बसवले जाणारे कररूपी भुर्दंड रद्द करावेत अशी सूचनाही त्यांनी केली आहे.

     "शेतमालाच्या विक्री प्रक्रियेतील दलालीबाबत जोतीरावांनी अत्यंत कडक शब्दात विवेचन केले आहे. एखाद्या शेतकऱ्याने जर गाडीभर भाजीपाला विकण्यासाठी आणला तर दलाल आणि वेगवेगळ्या स्वरूपाचे कर याच्या कचाट्यातून त्याच्या हाती काहीच उरत नाही. उलट गाडी भाडे अंगावर येते आणि त्या शेतकऱ्याला घरी जाऊन मुलाबाळांपुढे शिमगा करावा लागतो.

     "हे त्यांनी नोंदवलेले निरीक्षण आजही महत्त्वाचे वाटते. शेतीत केवळ वरवरच्या सुधारणा करून चालणार नाही तर शाश्वत उपाय अवलंबावे लागतील असे त्यांचे मत होते," असं लोमटे सांगतात.

     28 नोव्हेंबर 1890 रोजी महात्मा फुलेंचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतरही त्यांचे कार्य सावित्रीबाई फुले यांनी चालू ठेवले. सत्यशोधक समाजाच्या अनेक शाखा गावोगाव निघाल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तर त्यांना गुरुस्थानी मानत असत, तर 1932 साली महात्मा गांधी यांनी महात्मा फुलेंना 'खरा महात्मा' असे म्हटले होते.

Satyashodhak, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan, Savitri Mata Phule
Share on Twitter
Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209